Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीरामविजय - अध्याय ३ रा

श्रीरामविजय - अध्याय ३ रा
अध्याय तिसरा - श्लोक १ से ५०
श्रीगणेशाय नमः ॥ तुम्ही संत श्रोते भाविक ॥ कविमुद्रारत्नपरीक्षक ॥ श्रोता देखोनि मृगांक ॥ वक्ता सोमकांत पाझरे ॥१॥
तुम्ही बोधसमुद्रींचीं मुक्तें पवित्रें ॥ कीं चैतन्यनभींची दिव्य नक्षत्रें ॥ की वैराग्यवनींचीं सुमनें विचित्रें ॥ संतरूपें विकासलीं ॥२॥
निवडलीं रामकथामृतपात्रें ॥ की ज्ञानभरित पिकलीं क्षेत्रें ॥ कीं भजनपंथींचीं सरोवरें ॥ संतरूपें भरिलीं हो ॥३॥
कीं भवजलदजालप्रभंजन ॥ अज्ञानतिमिरच्छेदक चंडकिरण ॥ जो कां मदगजविदारक पंचानन ॥ मत्सरकाननदहन जो ॥४॥
रामविजय ग्रंथ वैरगर ॥ साहित्यरत्नें निघती अपार ॥ हीं तुम्ही अंगिकारावीं वारंवार ॥ कासयासी प्रार्थावें ॥५॥
कमळकोशींचा मकरंद बरा ॥ हें नलगे सांगावें भ्रमरा ॥ राजहंसासी घे मुक्तचारा ॥ ऐसें किमर्थ प्रार्थावें ॥६॥
शीतळ होई चंद्रमंडळा ॥ कासया सांगावें वेळोवेळां ॥ मित्रासी प्रकाश आगळा ॥ पाडीं कासया म्हणावें ॥७॥
संतांसी धरा क्षमा शांती ॥ ऐसें वदे तोचि मंदमती ॥ प्रेमळासी करीं भक्ती ॥ सांगावें नलगेचि हें ॥८॥
तैसे पंडित तुम्ही ज्ञानघन ॥ करा सुरस रामकथाश्रवण ॥ हें वारंवार म्हणतां दूषण ॥ वक्त्यासी झगटेल ॥९॥
असो पूर्वाध्यायीं कथा निश्र्चिती ॥ सांगितली रावणाची उत्पत्ति ॥ कौसल्या दशरथ अयोध्येप्रति ॥ नेऊनि विधीनें स्थापिलीं ॥१०॥
सूर्यवंशभूषण अद्भत ॥ अयोध्यापति राजा दशरथ ॥ ज्याची पट्टराणी विख्यात ॥ कुशल बहुत कौसल्या ॥११॥
सुमित्रा कैकयी स्वरूपवंत ॥ दोघींस वरी राव दशरथ ॥ आणीक सातशें परिणीत ॥ भोगांगना सुंदरा ॥१२॥
ज्ञानकळा कौसल्या सती ॥ सुमित्रा केवळ सद्भक्ती ॥ कैकयी ते कपटप्रकृती ॥ रजतमयुक्त सर्वदा ॥१३॥
केवळ विवेक मूर्तिमंत ॥ तोचि अजसुत दशरथ ॥ जो परमयोद्धा रणपंडित ॥ धनुर्विद्या सर्व जाणे ॥१४॥
अंधारामाजी शब्द उठतां ॥ तेथेचि बाण मारी अवचिता ॥ धन्य त्याची हस्तकुशलता ॥ वीर दशरथाऐसा नसे ॥१५॥
परी पोटीं नसे पुत्रसंतान ॥ तेणें राजेंद्र असे उद्विग्न ॥ पुत्राविण शून्य सदन ॥ बोलती शास्त्रज्ञ पंडित ॥१६॥
शरीर जैसें प्राणाविण ॥ तारुण्याविण पंचबाण ॥ दयेविण व्यर्थ ज्ञान ॥ शांतीवांचून वैराग्य ॥१७॥
संपत्ति जैशी धर्मेविण ॥ पंडितावांचून सभासदन ॥ कीं करणीविण व्यर्थ ज्ञान ॥ दीपेंविण मंदिर जेंवी ॥१८॥
कीं वेदांतज्ञानावांचून ॥ कोरडी व्युत्पत्ति व्यर्थ ज्ञान ॥ कीं सत्पात्रावांचून दान ॥ कीं स्नेहेंविण बंधु जैसा ॥१९॥
कीं जळेंविण वापिका ॥ कीं नृपाविण नगर देखा ॥ कीं नासिकाविण मुखा ॥ शोभा जैसी न येचि ॥२०॥
कीं फळेंविण तरुवर ॥ कीं रामस्मरणाविण मंदिर ॥ तैसा पुत्राविण वंश पवित्र ॥ सर्वथा पावन नव्हेचि ॥२१॥
असो राजा दशरथ ॥ संततीलागीं चिंताक्रांत ॥ सदा विपिनें गहन हिंडत ॥ मृगयामिषेंकरोनियां ॥२२॥
नावडे छत्रसिंहासन ॥ नावडे चातुर्यकळा गायन ॥ बहुत केले प्रयत्न ॥ परी संतान नव्हेचि ॥२३॥
तों दशरथें स्वप्न देखिलें ॥ दोघे पुरुष आपण वधिले ॥ आणि एके स्त्रियेसी मारिलें ॥ अपराधेंविण तत्त्वतां ॥२४॥
गजबजोनि उठला त्वरित ॥ कोणासी न बोले मूकवत ॥ वसिष्ठगृहास जाऊन त्वरित ॥ नमोनि स्वप्न सांगतसे ॥२५॥
गुरु बोले हें दुष्ट स्वप्न ॥ तीन श्र्वापदें येईं वधोन ॥ मग याची शांति करून ॥ दोषनिवारण करावें ॥२६॥
गुरुआज्ञेनें ते दिवशी ॥ राजेंद्र निघाला मृगयेसी ॥ वासरमणि गेला अस्तासी ॥ परी श्र्वापद न सांपडे ॥२७॥
पडला अत्यंत अंधकार ॥ एकला हिंडे नृपवर ॥ धनुष्यासी लावून शर ॥ शोधी कांतार तेधवां ॥२८॥
तों एका सरोवराचे तीरीं ॥ राजा गुप्त बैसे वृक्षावरी ॥ कानाडी ओढूनि ते अवसरीं ॥ कर्णीं ऐके सांचोल ॥२९॥
तों ते मार्गीं श्रावण ॥ आला मायबाप घेऊन ॥ दिवसा बहुत विघ्नें आणि उष्ण ॥ म्हणोनि रात्रीं गमन करी ॥३०॥
दोघें वृद्धें खांदीं घेऊनी ॥ श्रावण तीर्थें हिंडे मेदिनी ॥ त्या सरोवराचे तीरीं येऊनी ॥ उभा राहिला नावेक ॥३१॥
तों तीं वृद्धें म्हणती श्रावणा ॥ आम्हां करवी उदकपाना ॥ ऐकतां ऐसिया वचना ॥ कावड खालीं ठेविली ॥३२॥
हातीं कमंडलु घेऊन ॥ जीवनांत प्रवेशला श्रावण ॥ दशरथें सांचोल ऐकोन ॥ निर्वाण बाण सोडिला ॥३३॥
सपक्ष बाण हृदयीं भेदला ॥ हातींचा कमंडलु खालीं पडला ॥ देह भूमीवरी टाकिला ॥ प्राण चालिला श्रावणाचा ॥३४॥
म्हणे कोणे सभाग्याचा बाण ॥ करीत आला रामस्मरण ॥ हृदय निवालें संपूर्ण ॥ केलें पावन मजलागीं ॥३५॥
ऐकोनि मनुष्याचें वचन ॥ नृपवर जवळी आला धांवोन ॥ तंव तो पडिलासे श्रावण ॥ रामस्तवत करीतचि ॥३६॥
मग म्हणे कर्म पापकारी ॥ पडली हत्त्या मजवरी ॥ श्रावण म्हणे राया न करीं ॥ खेद कांहीं सर्वथा ॥३७॥
माझीं मायबापें वृद्धें दीन ॥ तयांसी करवीं उदकपान ॥ मग मी सोडीन प्राण ॥ सत्य जाण राजेंद्रा ॥३८॥
दोघें वृद्धें अत्यंत पाहीं ॥ त्यांचे सेवेसी कोणी नाहीं ॥ दशरथ गहिंवरला हृदयीं ॥ शोकाकुलित जाहला ॥३९॥
श्रावण म्हणे दशरथा ॥ उदक दोघां पाजूनि त्वरिता ॥ मग हे सांगावी वार्ता ॥ नाहीं तरी प्राण त्यागिती ॥४०॥
उदक नेतां अयोध्याराणा ॥ वृद्धें म्हणती बा रे श्रावणा ॥ तंव तो न बोलेचि वचना ॥ कांही केलिया सर्वथा ॥४१॥
कांरे श्रावणा न बोलसी ॥ उदक मागितलें येवढे निशीं ॥ बा रे म्हणोनि कोपलासी ॥ शीणलासी पाडसा ॥४२॥
उदयाचळीं मावळेल मित्र ॥ शेष सांडील भूभिभार ॥ तीव्र तपेल रोहिणीवर ॥ तरी क्रोध अणुमात्र न ये तूतें ॥४३॥
जैसें गंगेचें निर्मळ जीवन ॥ तैसें श्रावणा तुझें मन ॥ तान्हया कां रे न बोलसी वचन ॥ राजा ऐकोनि गहिंवरे ॥४४॥
मग अजराजपुत्र बोलिला ॥ म्यां अवचितां श्रावण वधिला ॥ तंव तिहीं धरणीवर देह टाकिला ॥ प्राण जाहला कासाविस ॥४५॥
आठवोनि श्रावणाचे गुण ॥ दोघें आक्रंदती दीनवदन ॥ ऐसा पुत्र हें त्रिभुवन ॥ शोधितांही न सांपडे ॥४६॥
आहा रे पुत्रा श्रावणा ॥ गंभीरा गुणनिधाना ॥ आमुचे प्राण करिती प्रयाणा ॥ श्रावणा वदन दावीं कां ॥४७॥
या ब्रह्मांडमंडपांत ॥ श्रावणाऐसा नाहीं सुत ॥ जैसीं लक्ष्मी आणि वैकुंठनाथ ॥ तैसीं भावित मातापिता ॥४८॥
जो न करी मातृपितृभजन ॥ जळो त्याचें ब्रह्मज्ञान ॥ तो षट्शास्त्रें आला पढून ॥ तरी त्याचें दर्शन न व्हावें ॥४९॥
त्याचें जप तप अनुष्ठान ॥ दान अध्ययन श्रवण मनन ॥ कळा चातुर्य व्यर्थ ज्ञान ॥ जैसें भाषण मद्यपियाचें ॥५०॥
 
अध्याय तिसरा - श्लोक ५१ से १००
तेणें अभ्यासिल्या चौसष्टी कळा ॥ त्या अवघ्याचि जाहल्या विकळा ॥ जयासी मातापित्यांचा कंटाळा ॥ त्या चांडाळा न शिवावें ॥५१॥
माता पिता गुरु देव जाण ॥ चारी दैवतें समसमान ॥ तोचि परम ज्ञाता जाण ॥ न मोडी वचन श्रेष्ठाचें ॥५२॥
म्हणोनि पुत्र एक श्रावण ॥ आठवूनि तयाचे गुण ॥ दोघें पडली मूर्च्छा येऊन ॥ जावया प्राण एकवटले ॥५३॥
मग तीं शाप देती प्राण जातां ॥ म्हणती तुझाही पुत्र पुत्र करितां ॥ प्राण जाईल रे दशरथा ॥ आम्हां ऐसाचि तात्काळ ॥४४॥
मग तिहीं सोडिला प्राण ॥ रायें केलें तिघांचें दहन ॥ उत्तरकार्य संपादून ॥ अयोध्येसी परतला ॥५५॥
मनांत हर्ष मानी नृपवर ॥ मज शाप जाहला तो केवळ वर ॥ यांचे शापें तरी पुत्र ॥ हो कां सत्वर मजलागीं ॥५६॥
अयोध्येसीं आला दशरथ ॥ वसिष्ठासी सांगितला वृत्तांत ॥ पुढें द्वादश वर्षेंपर्यंत ॥ दुष्काळ पडला पृथ्वीवरी ॥५७॥
न वर्षे कदा बलाहक ॥ अत्यंत तीव्र तपे अर्क ॥ धन्य तृण जीवन सकळिक ॥ नाहीं निष्टंक पृथ्वीवर ॥५८॥
गायी ब्राह्मण पीडिले बहुत ॥ दैत्यगुरु परम कापट्यवंत ॥ तेणें जलद आकर्षिले समस्त ॥ वृष्टी एकाक्ष होऊं नेदी ॥५९॥
वृष्टी जाहलिया परिपूर्ण ॥ सुखी होती गोब्राह्मण ॥ ते करितील महायज्ञ ॥ सुरांस पूर्ण बळ तेणें ॥६०॥
वृषपर्वा दैत्येंद्र थोर ॥ त्यासी साह्य जाहला शुक्र ॥ निर्जरभारांसहित शक्र ॥ युद्ध करीत तयांसीं ॥६१॥
बहुत दिवस जाहला संग्राम ॥ परी शुक्र कपटी पूर्ण परम ॥ मेघ वर्षो नेदी अधम ॥ सुत्रामा चिंताक्रांत बहुत ॥६२॥
वज्रधरासी म्हणे अंगिरासुत ॥ अयोध्येचा राजा दशरथ ॥ तो प्रतापार्क रणपंडित ॥ जिंकील दैत्य क्षणमात्रें ॥६३॥
मग मातली आणि विजयरथा ॥ मूळ पाठविलें दशरथा ॥ मातली सांगे समूळ वार्ता ॥ अनावृष्टिकारणें जें ॥६४॥
ऐकोनि दैत्यप्रताप अद्भुत ॥ तत्काळ रथीं बैसला दशरथ ॥ तों कैकयी रायास प्रिय अत्यंत ॥ काय बोलत तेधवां ॥६५॥
म्हणे मी समागमें येईन ॥ आणि संग्राम तुमचा पाहीन ॥ राजा म्हणे तूं सुकुमार पूर्ण ॥ युद्धकंदन ते स्थानीं ॥६६॥
येरी म्हणे तुम्हीं जवळी असतां ॥ मज भय नाहीं सर्वथा ॥ ऐसे तिचे बोल ऐकतां ॥ घेतली रथावरी तेधवां ॥६७॥
निराळमार्गें रथ तेवेळीं ॥ घेऊनि जात चपळ मातली ॥ देवदैत्यांच्या रणमंडळीं ॥ रथ अकस्मात उतरला ॥६८॥
वैकुंठीहूनि विनतासुत ॥ क्षीराब्धितटीं उतरे अकस्मात ॥ तैसा राजा दशरथ ॥ सुरसमुदायांत उतरला ॥६९॥
अजपुत्र देखानि पाकशासन ॥ देता जाहला क्षेमालिंगन ॥ दशरथ धनुष्य चढवून ॥ उभा ठाकला रणांगणीं ॥७०॥
बाणापाठीं बाण सोडित ॥ जैसे शब्दामागें शब्द येत ॥ कीं मेघधारा वर्षत ॥ शर सोडित त्या रीतीं ॥७१॥
जैशा मेघाबाहेर निवडोनी ॥ निघती कल्पांतसौदामिनी ॥ तैसा एकेक बाण तूणीरांतुनी ॥ वोढोनि काढी दशरथ ॥७२॥
दैत्यांचीं शिरें अकस्मात ॥ गगनीं उडतीं असंख्यात ॥ जैसे वृक्षावरोनि पक्षी उडत ॥ प्रातःकाळीं एकदांचि ॥७३॥
माघारले दैत्यभार तेव्हां ॥ तों पुढें आला वृषपर्वा ॥ कपटकळा युद्धमावा ॥ नानाप्रकारें दावित ॥७४॥
तरी दशरथबाणसामर्थ्ये ॥ कापट्यविद्या न चले तेथें ॥ जैसें मूर्खाचें वाग्जाळ समस्त ॥ उच्छेदी पंडित एकशब्दें ॥७५॥
जैसा मंत्रवादी महामती ॥ त्यापुढें भूतचेष्टा न चालती ॥ तैशा दशरथापुढें युद्धगती ॥ कदा न चालती तयाच्या ॥७६॥
देखोनि शरथाचा प्रताप तेव्हां ॥ विरथ जाहला वृषपर्वा ॥ पाठी देऊनि तेधवां ॥ निघता जाहला सवेग ॥७७॥
घृतें शिंपिला वैश्र्वानर ॥ तैसा क्रोधायमान जाहला शुक्र ॥ रथीं बैसोनियां शर ॥ सोडिता जाहला प्रतापें ॥७८॥
जातेवेदास्त्र ते अवसरीं ॥ सोडिता जाहला देवांवरी ॥ अयोध्याधीशें झडकरी ॥ जलदास्त्र ते अवसरीं ॥
सोडिता जाहला देवांवरी ॥ अयोध्याधीशें झडकरी ॥ जलदास्त्र प्रेरिलें ॥७९॥
शुक्रें वातास्त्र सोडिलें अद्भुत ॥ येरें आड घातले पर्वत ॥ वात कोंडिला समस्त ॥ दैत्यगुरूनें देखिलें ॥८०
मग सोडिले वज्रास्त्र ॥ पर्वत फोडिले समग्र ॥ दशरथें सोडिलें माहेश्र्वर ॥ देखोनि वज्रास्त्र विरालें ॥८१॥
शुक्र परम क्रोधायमान ॥ काढिला एक निर्वाण बाण ॥ रथाचा आंख छेदून ॥ टाकिता जाहला तेधवां ॥८२॥
आंख छेदितां अकस्मात ॥ खालीं पडावा जों दशरथ ॥ तों कैकयी देखानि धांवत ॥ घालोनि हात आंख धरी ॥८३॥
पर्वताकार रथ थोर ॥ दंडावरी घेतला भार समग्र ॥ वीरश्रीरंगें नृपवर ॥ समाचार नेणे तो ॥८४॥
दशरथें सोडिला निर्वाणबाण ॥ तोडिला कवीचा स्यंदन ॥ अश्र्वांसहित कुटके करून ॥ रणमंडळीं पाडिला ॥८५॥
विरथजेव्हां जाहला शुक्र ॥ दशरथें काढिला सूर्यमुख शर ॥ म्हणे याचें छेदीन शिर ॥ कापट्यमुकुटा सहित पैं ॥८६॥
मागुतीं विचारी अजनंदन ॥ शुक्र तरी केवळ ब्राह्मण ॥ याचा रक्षोनियां प्राण ॥ मुकुटमात्र छेदावा ॥८७॥
निमिष न लागतां गेला बाण ॥ मुकुट पाडिला तळीं छेदून ॥ भयभीत भृगुनंदन ॥ पळता जाहला तेधवां ॥८८॥
देव करिती जयजयकार ॥ पळूं लागला दैत्यभार ॥ जैसा महावात सुटतां समग्र ॥ भूस उडे अंबरीं ॥८९॥
रायें कोदंडासी घातली गवसणी ॥ तूणीर ठेविला आवरण घालोनी ॥ जैसा कुंडामाजी दैदीप्य अग्नि ॥ आच्छादित याज्ञिक ॥९०॥
दशरथ पाहे सावधान ॥ कैकयीनें हात घालून ॥ धरिला असे महास्यंदन ॥ वर्तमान कळलें तें ॥९१॥
आश्र्चर्य करी नृपवर ॥ आजिचें युद्ध अनिवार ॥ आम्हांसी जयलाभ समग्र ॥ कैकयीनें दीधला ॥९२॥
जैसें घर पडतां अकस्मात ॥ निजबळें उचली बळवंत ॥ तैसा कैकयीनें आजि रथ ॥ सांवरिला रणांगणीं ॥९३॥
खालीं उतरून दशरथ ॥ प्रियेलागीं आलिंगित ॥ म्हणे दोन वर मागें त्वरित ॥ जे कां अपेक्षित मानसीं ॥९४॥
कैकयी आनंदली थोर ॥ म्हणे मी जेव्हां मागेन वर ॥ तेव्हां मज द्यावे साचार ॥ म्हणोनि भाष घेतली ॥९५॥
महायुद्धीं जय पूर्ण ॥ कैकयीस यावया काय कारण ॥ काय होतें तीस वरदान ॥ तेंचि कारण ऐक पां ॥९६॥
पितृगृही कैकयी असतां ॥ एक तापसी आला अवचितां ॥ तयासी प्रार्थोनियां माता ॥ राहविती जाहली कैकयीची ॥९७॥
ऋषि बैसला अनुष्ठानातें ॥ माता निरोपी कैकयीतें ॥ उपकरण सामग्री लागेल यातें ॥ ती सिद्ध करोनि देईंजे ॥९८॥
पुष्पें धूप दीप आरती ॥ सिद्ध करोनि देत ऋषीप्रति ॥ येरू प्राणायाम करूनि निश्र्चितीं ॥ ध्यानीं जाहला निमग्न ॥९९॥
तंव कैकयीनें घेऊनि मस ॥ लाविली ऋषीच्या मुखास ॥ ध्यान जाहलिया तो महापुरुष ॥ स्वमुख करें पुशीतसे ॥१००॥
 
अध्याय तिसरा - श्लोक १०१ से १५०
तो हस्तास लागलें काळें ॥ कर्तृत्व कुमारीचें कळलें ॥ ऋषीनें शापिलें ते वेळे ॥ वदन काळें तुझें हो कां ॥१॥
तुजवरी अपेश येईल प्रचंड ॥ जगांत होईल काळें तोंड ॥ पुत्रद्वेष करिशील उदंड ॥ नसतें बंड वाढविशी ॥२॥
मातेनें समाचार ऐकोन ॥ वेगीं धरिले ऋृषीचें चरण ॥ स्वामी कैकयी बाळ अज्ञान ॥ नेणोनि कर्म हें केलें ॥३॥
कांहीं द्यावें जी वरदान ॥ मग ऋषि कृपाळु होऊन ॥ म्हणे संगा्रमीं पतीलागून ॥ जय देईल महारणीं ॥४॥
पूजासामुग्री दिधली समस्त ॥ तरी हा हस्त होईल यशवंत ॥ त्या वरें यासमयीं अद्भुत ॥ जय प्राप्त कैकयीतें ॥५॥
असों इंद्र आणि बृहस्पती ॥ दशरथाचें यश वानिती ॥ वस्त्रें भूषणें अमरपती ॥ देता झाला रायातें ॥६॥
वस्त्राभरणें अद्भुतें ॥ दिव्यमणि दीधला कैकयीतें ॥ येरीनें घातला वेणीतें ॥ परम प्रकाशवंत जो ॥७॥
तों देवआचार्य बोले वचन ॥ रायासी काय आहे पुत्रसंतान ॥ दशरथ म्हणे पुत्रवदन ॥ देखिलें नाहीं अद्यापि ॥८॥
सुरगुरु म्हणे राया वरिष्ठा ॥ त्रिभुवनपति येईल तुझिया पोटा ॥ ज्याचें ध्यान लागलें नीलकंठा ॥ सनकादिक भक्तांसी ॥९॥
जो मायाचक्रचाळक ॥ अनंत ब्रह्मांडांचा नायक ॥ जो कमलोद्भवाचा जनक ॥ तो पुत्र देख तुझा राया ॥११०॥
जो वेदशास्त्रांचा जिव्हार ॥ जो आदिमायेचा निजवर ॥ तो पुराणपुरुष अगोचर ॥ तुझा पुत्र होईल कीं ॥११॥
विभांढकाचा पुत्र श़ृंगऋषी ॥ हरणीगर्भसंभूत तेजोराशी ॥ त्यासी आणावें नानासायासीं ॥ पुत्रेष्टि करावया ॥१२॥
त्यास नाहीं मनुष्यदर्शन ॥ देखिलें नाहीं स्त्रियांचें वदन ॥ त्यास शब्दविषयें मोहून ॥ करोनि गायन आणावा ॥१३॥
शक्र म्हणे देवललना ॥ पाठवाव्या तया वना ॥ रंभा उर्वशी शुभानना ॥ ज्यांचे गायना मदन भुले ॥१४॥
दशरथें इंद्रगुरूची आज्ञा ॥ घेऊनी आला अयोध्याभुवना ॥ आनंद जाहला सकळ जनां ॥ पर्जन्यवृष्टि जाहली ॥१५॥
असंभाव्य पिकली मेदिनी ॥ दुष्काळ गेला मुळींहूनी ॥ जैसीं विष्णुसहस्रनामें करूनी ॥ महापापें संहारती ॥१६॥
इकडे वीणा टाळ मृदंग ॥ झल्लरी किंकिणी उपांग ॥ देवांगना घेऊन उपभोग ॥ वना सवेग चालल्या ॥१७॥
विभांडकऋषि तपोधन ॥ नित्य उषःकाळीं उठोन ॥ करावया जात अनुष्ठान ॥ जान्हवीतीराप्रति जाय ॥१८॥
मागें आश्रमीं एकला पुत्र ॥ उंच बांधोनियां गोपुर ॥ त्यावरी श़ृंगी तो परम चतुर ॥ वेदाध्ययन करितसे ॥१९॥
गज व्याघ्र सावजें बहुत ॥ देखतां होय भयभीत ॥ म्हणोनि उंच स्थळ बांधोनि सत्य ॥ त्यावरी सुत बैसविला ॥१२०॥
विभांडकऋषि अनुष्ठान करून ॥ दोन प्रहरां येत परतोन ॥ परमानंदें पुत्र देखोन ॥ अध्ययन सांगें तयातें ॥२१॥
चारही वेद मुखाद्रत ॥ सकळ शास्त्री पारंगत ॥ यागविधि कर्में समस्त ॥ करतलामलक तयातें ॥२२॥
असो विभांडक गेला स्नाना ॥ तो समय पाहोन देवांगना ॥ वेगीं पातला तया वना ॥ सर्व संपत्ति घेऊनियां ॥२३॥
वरी बैसला ऋषिनंदन ॥ तंव त्याणीं आरंभिलें गायन ॥ जें ऐकतां भुले पंचबाण ॥ स्वरूपलावण्य तयांचें ॥२४॥
जैशा केवळ सौदामिनी ॥ मंडित दिसती वस्त्राभरणीं ॥ ज्यांचीं स्वरूपें पाहोनी ॥ सुधापानी वेधले ॥२५॥
टाळ मृदंग सुस्वर ॥ गायन ऐकून ऋृषिपुत्र ॥ वरोनि पाहे सादर ॥ स्वरूप सुंदर न्याहाळोनी ॥२६॥
तंव नेत्रकटाक्ष हावभाव ॥ दाविती नानापरीचें लाघव ॥ श्रृंगीनें देखतांचि अपूर्व ॥ भय वाटे मानसीं ॥२७॥
गायन ऐकतां सुस्वर ॥ संतोष वाटे अपार ॥ म्हणे धरावया साचार ॥ पातले कोण न कळे हें ॥२८॥
भयेंकरून ते वेळां ॥ श्रृंगी वायुवेगें पळाला ॥ सवेंचि विलोकी परतोनि डोळां ॥ सुंदर स्वरूप तयांचे ॥२९॥
विभांडक अनुष्ठान करून ॥ आश्रमासी येत परतोन ॥ देवांगना जाती तेथोन ॥ शापभयें ऋषीच्या ॥१३०॥
म्हणती विभांडकासी कळेल ॥ तरी आम्हां तत्काळ शापील ॥ यालागीं दोन प्रहर होतां सकळ ॥ जाती वेगेंकरूनियां ॥३१॥
असो पिता आला आश्रमासी ॥ श्रृंगी सांगे तयापासीं ॥ म्हणे येथें आले होते तापसी ॥ उपमा ज्यांसी असेना ॥३२॥
मी तयांसी देखोनी ॥ पळालों देहलोभेंकरूनी ॥ आतां न ये ते दुसरेनी ॥ खंती मनीं वाटतसे ॥३३॥
विभांडक म्हणे पुत्रासी ॥ जरी आश्रमा आले संत ऋषी ॥ तरी आपण अतिथ्य करावें तयांशीं ॥ पूजाविधीकरूनियां ॥३४॥
असो प्रातःकाळीं विभांडकमुनी ॥ गेला अनुष्ठानालागुनी ॥ श्रृंगी चिंता करी मनीं ॥ म्हणे कधीं नयनी देखेन तयां ॥३५॥
विसरला लेखन पठण ॥ ज्ञान ध्यान आणि मनन ॥ लागलें मनीं स्त्रियांचें ध्यान ॥ अनर्थ पूर्ण स्त्रीसंगे ॥३६॥
ज्यानें स्त्री न देखिली स्वप्नीं ॥ त्यानें ती विलोकितां नयनीं ॥ गेला सर्व विसरोनी ॥ अनर्थ कामिनी तपासी ॥३७॥
मग ज्यांस अखंड स्त्रीचिंतन ॥ ते कैसे तरतील जन ॥ मूर्तिमंत भवाब्धि कामिन ॥ भुलवी सज्जन जाणते ॥३८॥
स्त्री केवळ अविद्येचा पसारा ॥ महाअनृत्या अविचारा ॥ सकळ असत्याचा थारा ॥ भय न धरी पापाचें ॥३९॥
स्त्री अनर्थाचें गृह सबळ ॥ कीं कलहाचें महामूळ ॥ कीं विषवल्लीच केवळ ॥ स्त्रीरूपें विस्तारली ॥१४०॥
स्त्री कामाची विशाळ दरी ॥ कीं ते क्रोधव्याघ्राची जाळी खरी ॥ कीं ते पापसमुद्रलहरी ॥ कीं ते भाजने असत्याचें ॥४१॥
कीं ते दुःखवृक्षाचें श्रेष्ठ फळ ॥ कीं ते मोहाचा पर्वत सबळ ॥ तें मत्सरवनचि केवळ ॥ किंवा भ्रांति अवतरली ॥४२॥
कीं दंभचि मूर्तिमंत विरूढला ॥ कीं अहंकार स्त्रीगड बांधिला ॥ कीं मूर्खत्व सकळ त्या स्थळा ॥ मिरास करूनि राहिलें ॥४३॥
कीं स्त्री मूर्तिमंत भवव्याधी ॥ कीं षडूर्मींची भरली नदी ॥ कीं सकळ विकारांची मांदी ॥ यात्रेसी आली त्या ठायां ॥४४॥
कवणें निर्मिली हे कुऱ्हाडी ॥ सबळ पुण्यवृक्ष तोडी ॥ कीं अविश्र्वासाची बेडी ॥ जिवाच्या पायीं ठोकिली ॥४५॥
कीं स्वर्गमोक्षअर्गळा सत्य ॥ दर्शनें पुरुषाचें चित्त चोरित ॥ स्पर्शबळें वीर्य हरित ॥ आसुरी प्रत्यक्ष कामिनी ॥४६॥
कौटिल्यदंभसंयुक्त ॥ क्षमाशौचविवर्जित ॥ महामंत्राचें सामर्थ्य ॥ क्षणें हरित न कळेचि ॥४७॥
गौडी माध्वी पैष्टी तीन्ही ॥ मदिरा ऐशा प्रकट जनीं ॥ चौथें मद्य तें कामिनी ॥ दुर्गंधी नाहाणी पापाची ॥४८॥
काय विद्या काय तप ॥ कायसें ध्यान काय जप ॥ कासया ज्ञान खटाटोप ॥ हरिलें सर्व स्त्रियांनीं ॥४९॥
जिव्हा दग्ध परान्नें पाहीं ॥ हस्त दग्ध प्रतिग्रहीं ॥ मग दग्ध स्त्रीचे ठायीं ॥ करूनि काय जप तप ॥१५०॥

अध्याय तिसरा - श्लोक १५१ से २००
व्यर्थ करिती पुरश्र्चरण ॥ स्त्रियेनें हरूनि नेलें मन ॥ करूं बैसतां जो ध्यान ॥ तों ध्यानीं चिंतन स्त्रियेचें ॥५१॥
काय अध्ययन काय कीर्तन ॥ व्यर्थ गेले पुराणश्रवण ॥ काय करूनि धर्म दान ॥ स्त्रियांनीं मन हरियेले ॥५२॥
स्त्री स्वरूपाची धरोन दिवी ॥ महानरकाची वाट दावी ॥ सज्ञानीयासही भुलवी ॥ वनीं हिंडवी विषयांचिया ॥५३॥
कीं काळें दूती पाठविली देखा ॥ चाळवूनि नेत महानरका ॥ दुराविलें मोक्षसुखा ॥ अधःपातीं पाडिलें ॥५४॥
आतां असो हा अनुवाद ॥ जरी कृपा करील ब्रह्मानंद ॥ तरीच तुटेल भवबंध ॥ हृदयीं बोध ठसावे ॥५५॥
जरी कृपा करील जगज्जीवन ॥ तरी हरिरूप दिसे जन वन ॥ कैचा पुरुष नपुंस कामिन ॥ व्यापिलें पूर्ण श्रीरामें ॥५६॥
नर नारी मिथ्याभास ॥ अवघा ओतला पुराणपुरुष ॥ जैं कृपा करील सर्वेश ॥ ब्रह्मानंद स्वामी पैं ॥५७॥
असो आतां श़ृंगीऋषी ॥ म्हणे कधीं येतील ते तापसी ॥ तों अकस्मात त्या समयासी ॥ रंभा ऊर्वशी पातल्या ॥५८॥
उत्तम स्वरूपें मंजुळ गायन ॥ सुंदर मुख आकर्णनयन ॥ श़ृंगीलागीं खुणावून ॥ कामभाव दाविती ॥५९॥
नानापक्वान्नें अमृतफळें ॥ श़ृंगीस देती बहु रसाळें ॥ मग तो उतरोनि खालें ॥ जवळी येवोनि बैसला ॥१६०॥
तयांसी पुसे आवडीकरून ॥ सांगा तुमचीं नामखूण ॥ हीं गलंडें काय म्हणोन ॥ वक्षःस्थहीं तूमच्या पैं ॥६१॥
येरी गदागदां हांसती ॥ तुझिया माथां श़ृंग निश्र्चिती ॥ म्हणोनि श़ृंगऋषि म्हणती ॥ तुजलागीं ऋषिपुत्रा ॥६२॥
आमचें नांव गलंडऋषि ॥ बहु सुख असे आम्हांपाशीं ॥ येरं म्हणे ते दाखवा आम्हांसी ॥ चवी कैसी पाहों पा ॥६३॥
त्या म्हणती जी तत्वतां ॥ कामासन तुज शिकवूं आतां ॥ तों मदनें मोहिलें ऋषिसुता ॥ आसक्त सुरतालागीं होय ॥६४॥
मग तो म्हणे मी तुम्हांधीन ॥ जिकडे न्याल तिकडे येईन ॥ मग त्यांनीं विमानीं बैसवून ॥ आणियेला अयोध्येसी ॥६५॥
दशरथें करूनि नमस्कार ॥ केला बहुत आदर ॥ म्हणे महाराज तुम्ही बहु थोर ॥ दर्शन आम्हां दीधलें ॥६६॥
मग पाळककन्या आपुली ॥ श़ृंगऋषीस दीधली ॥ लग्नसोहळा ते वेळीं ॥ चार दिवस जाहला ॥६७॥
मग ऋषि मेळविले बहुत ॥ जे शापानुग्रहसमर्थ ॥ वसिष्ठ मुख्य आचार्य जेथ ॥ न पडे पदार्थ न्यून कांहीं ॥६८॥
इकडे ज्ञानी पाहे विभांडकमुनी ॥ तों स्त्रियांनीं सुत नेला चाळवुनी ॥ परम क्रोधाविष्ट होऊनि ॥ अयोध्येसी पातला ॥६९॥
तों ऋषिवेष्टित देखिला कुमर ॥ जैसा नक्षत्रीं वेष्टिला रोहिणीवर ॥ कीं किरणीं वेष्टिला दिवाकर ॥ तैसा स्वसुत देखिला ॥१७०॥
स्नुषा देखोनि नयनीं ॥ विभांडक निवाला मनीं ॥ दशरथ लागला ऋषिचरणीं ॥ आनंदेंकरून तेधवां ॥७१॥
विभांडक आनंदें बहुत ॥ नृपासी आशीर्वाद देत ॥ तुज होतील चौघे सुत ॥ जे कां समर्थ त्रिभुवनीं ॥७२॥
असो यज्ञमंडपीं श़ृंगीं आपण ॥ सकळ ऋषिमंडळ घेऊन ॥ स्वाहाकारासी अवदान ॥ मंत्रयुक्त टाकित ॥७३॥
पूर्णाहुतीचिये काळीं ॥ प्रत्यक्ष प्रकटला ज्वाळामोळी ॥ जैसा सूर्य उगवे उदयाचळीं ॥ प्रातःकाळीं अकस्मात ॥७४॥
चत्वारिश़ृंग द्विमूर्धन ॥ सप्तपाणी त्रिचरण ॥ देखतां यज्ञनारायण ॥ ऋषिजन सुखावले ॥७५॥
हातीं पायसताट भरून ॥ श़ृंगीपाशीं देत कृशान ॥ म्हणे अविलंबें पिंड करून ॥ तिघी राणियांस देइंजे ॥७६॥
बहु त्वरा करावी ये क्षणीं ॥ विलंबें होय कार्यहानी ॥ पोटा येईल कैवल्यदानी ॥ क्षीरसागर विहारी जो ॥७७॥
ऐसें बोलोनि तये काळीं ॥ गुप्त जाहला ज्वाळामाळी ॥ श़ृंगीनें वसिष्ठाजवळी ॥ पायसपात्र दीधलें ॥७८॥
वसिष्ठें करूनि तीन विभाग ॥ राणियांस देत सवेग ॥ कौसल्येसी श्रेष्ठ भाग ॥ देता जाहला ऋषि तो ॥७९॥
दुजा सुमित्रेप्रति देत ॥ तिजा कैकयीकरीं घालित ॥ देखोनि ऐसें अद्भुत ॥ क्रोध आला कनिष्ठेते ॥१८०॥
म्हणे मी रायासी प्रियकर ॥ म्यां रथचक्रीं घालोनि कर ॥ रणीं विजयी केला नृपवर ॥ इंद्रादिक देवांदेखतां ॥८१॥
वयेंकरूनि वृद्ध फार ॥ ते ज्येष्ठ नव्हे साचार ॥ जियेमाजी गुण थोर ॥ तेच श्रेष्ठ जाणिजे ॥८२॥
केतकीचें लघु पत्र ॥ त्या मानिती सर्वत्र ॥ इतर पत्रें दिसती थोर ॥ परि चतुर न मानिती ॥८३॥
अमोलिक लहान रत्न ॥ काय करावे थोर पाषाण ॥ मृगेंद्राची आकृति लहान ॥ थोर वारण कासया ॥८४॥
जवादिबिडालांचें वृषण सुवास ॥ लहान परी आवडी श्रीमंतांस ॥ रासभाचें थोर बहुवस ॥ न शिवे कोणी तयांतें ॥८५॥
मज आधीं न देतां मान ॥ काय करावा भाग मागून ॥ म्हणोनि कैकयी रुसोन ॥ अधोवदन बैसली ॥८६॥
मग बोले वसिष्ठ मुनी ॥ विघ्न होईल येच क्षणी ॥ तों करींचा पिंड झडपोनी ॥ घारीनें नेला अकस्मात ॥८७॥
हाहाकार जाहला ते अवसरीं ॥ निमिष न लागतां गेला घारी ॥ कैकयी पडे धरणीवरी ॥ आक्रंदत तेधवां ॥८८॥
म्हणे माझें पूर्वकर्म गहन ॥ मज कैंचें पुत्रसंतान ॥ अभाग्यासी निधान ॥ जिरेल कोठून सांग पां ॥८९॥
परम चिंताक्रांत दशरथ ॥ कौसल्येकडे विलोकित ॥ मग कैकयीचें समाधान करीत ॥ पट्टमहिषी तेधवां ॥१९०॥
कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ अर्ध विभाग काढोनी ॥ देत्या जाहल्या ते क्षणीं ॥ पूर्ण पिंड कैकयीतें ॥९१॥
जैशा भागीरथी आणि मंदाकिनी ॥ तैशा कौसल्या सुमित्रा दोघीजणी ॥ मत्सर अणुमात्र मनीं ॥ न करिती स्वप्नीं सर्वथा ॥९२॥
जे अत्यंत कुटिल देख ॥ तयांसि स्वप्नींही नाहीं सुख ॥ न कदां मानिती कोणी लोक ॥ सदा अपेशपात्र ते ॥९३॥
असो वसिष्ठें दीधलें तीर्थ ॥ तिघीही पिंड प्राशन करीत ॥ कैकयीच्या कंठीं पिंड अडकत ॥ कासाविस जाहली ते ॥९४॥
मग वसिष्ठें शिंपितां तीर्थ ॥ अंतरीं पिंड उतरत ॥ आनंदला राजा दशरथ ॥ दानें देत अपार ॥९५॥
वस्त्राभरणें उदंड दक्षिणा ॥ देवोनि गौरविलें ब्राह्मणां ॥ सकळ ऋषि पावले स्वस्थाना ॥ श़ृंगीआदिकरूननि ॥९६॥
तिघी राण्या जाहल्या गर्भस्थ ॥ आनंदला राजा दशरथ ॥ म्हणे माझे भाग्य उदित ॥ दिसतें पुढें येथोनी ॥९७॥
घारीनें जो पिंड झडपिला ॥ त्याचा वृत्तांत काय जाहला ॥ श्रोतयांनीं आक्षेप केला ॥ कथा समूळ सांगा पां ॥९८॥
तरी केसरीनामें वानर ॥ त्याची स्त्री अंजनी सुंदर ॥ ऋष्यमूकपर्वतीं घोर ॥ तप करीत बैसली ॥९९॥
सात सहस्र वर्षेपर्यंत ॥ मौन धरोनि शुचिष्मंत ॥ आराधिला उमाकांत ॥ प्रसन्न जाहला तपांतीं ॥२००॥
 
अध्याय तिसरा - श्लोक २०१ से २५०
म्हणे अंजनी माग इच्छित ॥ येरी म्हणे देईं अक्षय सुत ॥ परम प्रतापी यशवंत ॥ महाभक्त वज्रदेही ॥१॥
मग बोले उमावर ॥ अकरावा जो मी महारुद्र ॥ तुझे उदरीं अक्षय अवतार ॥ धरितों अंजनी जाणपां ॥२॥
ऐकें शुभवदने अंजनी ॥ तूं अंजुळीपात्र पसरुनी ॥ बैसें सावध माझे ध्यानीं ॥ अंतर्द्दष्टि करूनियां ॥३॥
सुटेल अद्भुत प्रभंजन ॥ साक्षात लोकप्राणेश आपण ॥ प्रसाद देईल आणोन ॥ तो तूं भक्षी अविलंबें ॥४॥
स्वस्थळा गेला शूलापाणी ॥ ध्यानस्थ बैसली अंजनी ॥ नयन झांकोनि निजमनीं ॥ ब्रह्मानंदें उचंबळे ॥५॥
तंव कैकयीहातींचा पिंड झडपोनी ॥ घारी नेत असतां गगनीं ॥ तों चंडसमीरें ते क्षणीं ॥ पिंड मुखींचा आसुडिला ॥६॥
तो अंजनीच्या करांत ॥ आणोन घातला अकस्मात ॥ तो तत्काळ ती भक्षित ॥ शिवस्मरण करोनियां ॥७॥
घारी ते देवांगना वहिली ॥ नृत्य करितां चांचरी गेली ॥ मग विधीनें शापिली ॥ घारी होई म्हणोनी ॥८॥
मग ते सुवर्चसा नामें देवांगना ॥ लागे कमलोद्भवाचे चरणा ॥ विधि म्हणे दशरथ राणा ॥ अयोध्येचा नृपवर ॥९॥
त्याच्या मखसमयीं पिंड झडपितां ॥ उद्धरशील तूं तत्त्वतां ॥ अंजनीकरीं पिंड पडतां ॥ निजस्थाना येसी तूं ॥२१०॥
असो घारी ब्रह्मवरेंकरूनी ॥ उद्धरोनि पावली स्वस्थानीं ॥ इकडे नवमास भरतां अंजनी ॥ प्रसूत जाहली तेधवां ॥११॥
ऋृषिपत्न्या पाहती ते वेळां ॥ बळिया तो बाळ जन्मला ॥ कीं वासरमणी प्रगटला ॥ वानरवेषें दैदीप्य ॥१२॥
विद्युत्प्राय कुंडलें झळकती ॥ गंडस्थळीं पडली दीप्ती ॥ दृढ कौपीन निश्र्चिती ॥ कटीप्रदेशीं मौंजी झळके ॥१३॥
तळपतसे यज्ञोपवीत ॥ ऐसे वानररूप अद्भुत ॥ मुखीं पुच्छाग्रीं आरक्त ॥ वर्णं दिसत प्रवालसम ॥१४॥
क्षुधाक्रांत परम बाळ ॥ चहूंकडे पाहे चंचळ ॥ तों अंजनी उतावेळ ॥ फळें गेली आणावया ॥१५॥
रुदन करी क्षुधित बाळ ॥ आरक्त दिसे सूर्यमंडळ ॥ म्हणे हें दिसे उत्तम फळ ॥ उडे चपळ मारुती ॥१६॥
पिंजारल्या रोमावळी ॥ सिंहनादें गर्जे निराळीं ॥ दिग्गजांचीं बैसलीं टाळीं ॥ आंदोळली वसुंधरा ॥१७॥
स्फुरण दाटलें थोर ॥ गाजवी पुच्छाचा फडत्कार ॥ मागें आंगवातें तरुवर ॥ उन्माळोनि जाती आकाशीं ॥१८॥
चपळ पदद्वय तसेच हस्त ॥ प्रतापें झेंपावे गगनांत ॥ उड्डाणावर उड्डाण घेत ॥ जात आदित्यं लक्षोनीयां ॥१९॥
कीं उर्वींवरोनी सुपर्ण ॥ जाय वैकुंठपीठ लक्षून ॥ तैंसाचि अंजनीहृदयरत्न ॥ भानुमंडळा आटोपी ॥२२०॥
मनोवेगासी मागें टाकुनी ॥ हनुमंत वेगें जात गगनीं ॥ तों लोकप्राणेश धांवुनी ॥ धरीन म्हणे स्वपुत्रा ॥२१॥
परम तीव्र सूर्यमंडळ ॥ तेजें आहाळेल माझें बाळ ॥ म्हणून धरूं पाहे अनिळ ॥ परी तो चपळ नाटोपे ॥२२॥
मग हिमाचलाचे शीतलांबुकण ॥ मागून शिंपी प्रभंजन ॥ हनुमंत मुख पसरोन ॥ सूर्याजवळी पातला ॥२३॥
तों ते दिवशीं सूर्यग्रहण ॥ राहू आला मुख पसरोन ॥ मारुतीस क्रोध आला दारुण ॥ सिंहिकासुत देखतां ॥२४॥
म्हणे मी अत्यंत क्षुधित ॥ फळ भक्षावया आलों येथ ॥ हा कोण आला अकस्मात ॥ ग्रासाआड माझिया ॥२५॥
सबळ पुच्छघायेंकरून ॥ फोडिले राहूचें वदन ॥ भिरकाविला पायीं धरून ॥ मूर्च्छा येऊन पडला तो ॥२६॥
जैसा शुंडादंडेकरून देख ॥ महागज विदारी बिडालक ॥ कीं भुजंगाचे कवेंत मूषक ॥ अकस्मात सांपडला ॥२७॥
राहूचे कैवारें केत ॥ कपीवरी धांवला उन्मत्त ॥ जैसा केसरीपुढें जंबुक येत ॥ आपलें मरण विसरूनियां ॥२८॥
केतु देखतांचि हनुमंतें ॥ तेथेंचि मर्दिला मुष्टिघातें ॥ आंग चुकवोनि वेगें बहुतें ॥ पळता जाहला केतु पैं ॥२९॥
राहु आणि केत ॥ इंद्रापाशी आले धांवत ॥ अशुद्धें नाहालें जेंवीं पर्वत ॥ सिंदूरेंकरून माखलें ॥२३०॥
आक्रोशें बोलती दोघेजण ॥ तूं सुरेश सहस्रनयन ॥ आम्हांवरी कोप धरून ॥ हें कां विघ्न धाडिलें ॥३१॥
नवा पुच्छराहु करून ॥ आम्हांवरी दीधला पाठवून ॥ आश्र्चर्य करी शचीरमण ॥ म्हणे हें कर्तृत्व कोणाचें ॥३२॥
कोणी केली विपरीत करणी ॥ त्यास संहारावया वज्रपाणी ॥ त्रिदशसमुदाय घेऊनी ॥ वायुवेगें धांविन्नला ॥३३॥
राहु पुढें पुढें धांवत ॥ मागें देवांसहित अमरनाथ ॥ तों इकडे अंजनीसुत ॥ सूर्य ग्रासूं धांवतसे ॥३४॥
चळाचळां कांपे मित्र ॥ म्हणे कैंचा आला हा अमित्र ॥ दिनमान सांडोनि दिनकर ॥ पळों न लाहे सर्वथा ॥३५॥
प्रतापरुद्र मारुती ॥ सूर्यमंडळ धरिलें हातीं ॥ हें फळ नव्हे निश्र्चिती ॥ म्हणोनि पुढती टाकिलें ॥३६॥
जैसा केवळ वडवानळ ॥ तैसेंच दैदीप्यमान सूर्यमंडळ ॥ फळ नव्हे म्हणोनि अंजनीबाळ ॥ टाकिता जाहला पूढती पैं ॥३७॥
माघारा पाहे परतोन ॥ तो राहु आला शक्रास घेऊन ॥ पुढती क्रोध आला दारुण ॥ म्हणे आतां न सोडीं यासी ॥३८॥
साह्य करू अमरपती ॥ मजवरी आला पुढती ॥ जैसे शलभ मिळूनि येती ॥ कल्पांतविजू धरावया ॥३९॥
ऐसें बोलत वायुनंदन ॥ राहुवरी लोटला येऊन ॥ इंद्रादेखतां ताडण ॥ राहुसी केलें बहुसाल ॥२४०॥
जैसा पर्वत पडे अकस्मात ॥ तैसा राहुसी दे मुष्टिघात ॥ ग्रहपूजा यथासांग तेथ ॥ वायुसुतें मांडिली ॥४१॥
राहु आक्रोशें फोडी हांका ॥ म्हणे काय पाहसी अमरनायका ॥ शक्रें ऐरावती देखा ॥ अकस्मात प्ररिला ॥४२॥
जिकडे धांवे ऐरावत ॥ तिकडे भारें उर्वीं लवत ॥ कीं दुसरा मेरु मुर्तिमंत ॥ शक्राचें वाहन जाहला ॥४३॥
तो सबळ लोटला ऐरावती ॥ चपळ धांवला वीर मारुती ॥ जैसा वज्रघात पर्वतीं ॥ तैसा कुंभस्थळीं ताडिला ॥४४॥
धाकें ऐरावत तो पळे ॥ पाकशासन निजबळें ॥ ऐरावत आकळितां नाकळे ॥ रान घेतलें भयेंचि ॥४५॥
जैसी दुर्बळाची स्त्री नष्ट बहुत ॥ ती न मानी त्याचा वचनार्थ ॥ तैसा इंद्रासी ऐरावत ॥ नाटोपेचि सर्वथा ॥४६॥
असो विवेक करूनि बहुत ॥ काम क्रोध आवरिती महंत ॥ तैसा सहस्राक्षें ऐरावत ॥ पुढती समोर आणिला ॥४७॥
मागुता धांवे पवनसुत ॥ धरी ऐरावताचे चारही दंत ॥ उलथोनि खालीं पाडित ॥ शक्रासहित तेधवां ॥४८॥
हस्तचपेटें हनुमंतें ते वेळी ॥ किरीट शक्राचा पाडिला भूतळीं ॥ सकळ देवसेना ते काळीं ॥ भयभीत जाहली ॥४९॥
इंद्राची झोटी मोकळी ॥ मागुती ऐरावत आकळी ॥ हनुमंतावरी बळेंचि घाली ॥ गज न घाली पाऊल पुढें ॥२५०॥
 
अध्याय तिसरा - श्लोक २५१ से २८९
गज पळे रानोरान ॥ परम घाबरला सहस्रनयन ॥ तों यम हस्तीं दंड घेऊन ॥ हनुमंतावरी धांविन्नला ॥५१॥
यमें दंड प्रेरावा जों ते वेळां ॥ तो मारुती अंगावरी कोसळला ॥ मुष्टिघात हृदयीं दीधला ॥ यम पाडिला धरणीवरी ॥५२॥
वक्षःस्थळीं वळंघोनि हनुमंत ॥ पुढती मुष्टिघ्ज्ञात प्रेरित ॥ हातींचा दंड हिरोनि घेत ॥ तेणेंचि ताडित तयासी ॥५३॥
यमें धरिले मारुतीचे चरण ॥ म्हणे मी तुजला अनन्य शरण ॥ हस्त जोडूनियां वरुण ॥ स्तुति करीत मारुतीची ॥५४॥
कुबेर धांवोन ते समयीं ॥ लागे हनुमंताचे पायीं ॥ तों ऐरावतारूढ लवलाहीं ॥ शक्र वेगें पातला ॥५५॥
ऐसें देखोनि ते अवसरीं ॥ मारुती धांवे शचीवरावरी ॥ ऐरावतसीस पुच्छीं धरी ॥ पृथ्वीवरी आपटावया ॥५६॥
पुच्छ धरूनि भोवंडीं गज ॥ पृथ्वीसहित कांपती दिग्गज ॥ अवनीवरी देवराज ॥ वज्रासह पाडिला ॥५७॥
बळें गज आपटिला धरणीं ॥ देवांस मांडली महापळणी ॥ कडे कपाटीं जाउनी ॥ महायोद्धे दडाले ॥५८॥
म्हणती पृथ्वी गेली रसातळा ॥ एकचि हाहाकार जाहला ॥ तो अमरेंद्रें ते वेळां ॥ आव धरिला पुढती पैं ॥५९॥
वज्र बळें भोंवंडित ॥ मुखावरी ताडिला हनुमंत ॥ तेणें मूर्च्छना दाटली बहुत ॥ पडे वायुसुत पृथ्वीवरी ॥२६०॥
कनकाद्रीवरून कोसळला ॥ पर्वतदरीमाजी पडला ॥ लोकप्राणेश धांविन्नला ॥ सुत धरिला पोटासी ॥६१॥
कासाविस वायुनंदन ॥ विकळ पडला अचेतन ॥ वायु रडे स्फुंदस्फुंदोन ॥ पुढें घेऊन हनुमंता ॥६२॥
म्हो दुर्जन हा अमरेंद्र ॥ तान्हयावरी घातलें वज्र ॥ परम निर्दय पुरंदर ॥ करीन संहार तयाचा ॥६३॥
माझिया तान्हयाचा जातां प्राण ॥ आटीन सकळ त्रिभुवन ॥ जैसे प्रल्हादाकारणें दैत्य संपूर्ण ॥ श्रीनृसिंहें आटिले ॥६४॥
वायुआधीन सकळांचे प्राण ॥ आकर्षिले न लागतां क्षण श्र्वासोच्छ्वास कोंडून ॥ केलें त्रिभुवन कासाविस ॥६५॥
मग इंद्र विरिंचि सकळ सुरवर ॥ रमावर आणि उमावर ॥ सकळ प्रजा ऋृषीश्र्वर ॥ शरण आले वायूतें ॥६६॥
पोटासी धरूनि हनुमंत ॥ वायु दीर्घस्वरें रडत ॥ तों ब्रह्मादिदेव समस्त ॥ प्राणनाथें देखिले ॥६७॥
हनुमंत कडेवरी घेउनी ॥ वायु उभा राहे ते क्षणीं ॥ तिन्ही देव देखानि नयनीं ॥ नमस्कार करी तेधवां ॥६८॥
मग बोले कमळासन ॥ पुत्राचा कैवार घेऊन ॥ अवघे जन निर्दाळून ॥ टाकिशी काय प्राणेशा ॥६९॥
येरू म्हणे न उठतां माझा सुत ॥ इंद्रासीं आटीन देवांसहित ॥ ऐकोनि हांसे इंदिरानाथ ॥ वर देतसे संतोषोनी ॥२७०॥
पूर्ण पिंडाचा हनुमंत ॥ यासी स्वप्नींही नाहीं मृत्य ॥ ब्रह्मकल्पपर्यंत ॥ चिरंजीव पुत्र तुझा ॥७१॥
मग बोले कर्पूरगौर ॥ माझिये तृतीय नेत्रींचा वैश्र्वानर ॥ क्षणें जाळील चराचर ॥ परी यासी बाधे ना ॥७२॥
माझी त्रिशूळादि आयुधें तत्त्वतां ॥ तीं न रुतती हनुमंता ॥ मग विरिंचि होय बोलता ॥ निजवरदान ऐका तें ॥७३॥
माझें ब्रह्मास्त्र आणि पाश ॥ कदा न बाधितील यास ॥ म्यां जीं शस्त्रें निर्मिलीं बहुवस ॥ तींही यास न बाधितीं ॥७४॥
मग इंद्रही वदे सवेग वर ॥ माझें यासी बाधे वज्र ॥ हा वज्रदेही साचार ॥ अक्षय अभंग सर्वदा ॥७५॥
हनुवटीस झगडलें वज्र ॥ यास हनुमंत नाम साचार ॥ कुबेर म्हणे बहुत असुर ॥ क्षय पावती हस्तें याच्या ॥७६॥
मग वदे वरदान ॥ यास काळदंड न बाधी पूर्ण ॥ याचे करिती जे नामस्मरण ॥ त्यांसी बंधन न करीं मी ॥७७॥
मग बोले रसाधिपति ॥ अभंग असो यास शक्ति ॥ कधीं श्रम न पावे मारुती ॥ युद्ध करितां बहुसाल ॥७८॥
दिव्य कमळांची सुमनमाळ ॥ न सुके लोटतां बहुकाळ ॥ ती विश्र्वकर्में तात्काळ ॥ गळां घातली मारुतीच्या ॥७९॥
समस्तीं देऊन वरदाना ॥ गेले आपुले स्वस्थाना ॥ वायूनें हनुमंत तें क्षणा अंजनीजवळ अणिला ॥२८०॥
मारुतीस हृदयीं धरोनि ॥ स्फुंदस्फुंदोनि रडे जननी ॥ मुखामाजी स्तन घालुनी । वदन कुरवाळी वेळोवेळां ॥८१॥
रामविजय ग्रंथ सुरस ॥ त्यामाजी हनुमंतजन्म विशेष ॥ श्रवण करिती जे सावकाश ॥ ग्रहपीडा त्यांस न होय ॥८२॥
हनुमंतजन्मकथन ॥ निजभावें करितां श्रवण ॥ दुष्ट ग्रहविघ्नें दारुण ॥ न बाधिती कदाही ॥८३॥
पुढें रसाळ कथा बहुत ॥ डोहळे पुसेल राजा दशरथ ॥ अजन्मा जन्मेल रघुनाथ ॥ तोच कथार्थ अवधारा ॥८४॥
जैसें जों जों क्षेत्र पिकत ॥ तों तों कणसें घनदाट दिसत ॥ तैसे प्रसंगाहून प्रसंग बहुत ॥ रसभरित असती पैं ॥८५॥
जयासी नाहीं पुत्रसंतान ॥ त्यानें करावें विजयावर्तन ॥ संतति संपत्ति परिपूर्ण ॥ सदा नांदती त्याचे गृहीं ॥८६॥
येथोनि श्रीरामचरित्रकथा गहन ॥ श्रोतीं परिसावी सावधान ॥ तेणें ब्रह्मानंद ठसावोन ॥ कैवल्यपद पाविजे ॥८७॥
ब्रह्मानंदा श्रीरघुवीरा ॥ विषकंठहृदया परात्परा ॥ वेदवंद्या श्रीधरवरा ॥ दीनोद्धारा जगद्रुरो ॥८८॥
स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ श्रवण करोत पंडित चतुर ॥ तृतीयाध्याय गोड हा ॥२८९॥
॥ श्रीरामसमर्थ ॥

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Ayodhya:रामललासाठी 1100 किलोचा पंचधातूचा दिवा पोहोचणार