Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Monday, 13 January 2025
webdunia

ऋतुगंध धनुर्मास ...

ऋतुगंध धनुर्मास ...
, बुधवार, 18 डिसेंबर 2019 (15:30 IST)
सूर्य धनू राशीत असतो, या काळाला धनुर्मास असे म्हणतात. या मासात प्रत्येक दिवशी सूर्योदयापूर्वी  देवाला महानैवेद्य करून ब्राह्मणांसह भोजन करावे, असे सांगितले आहे आणि तेवढे शक्य नसल्यास निदान एक दिवस तरी तसे करावे असे म्हटले आहे.
 
दक्षिणेत तमिळ प्रदेशात मात्र हा मास अशुभ समजून त्या मासात अशुभ निवारणासाठी ते लोक ग्रहशांती व जपजाप्य करतात. धनुर्मासाची कथा आहे, ती अशी-
 
ब्रह्मादि देवांनी विष्णूला प्रार्थना केली की, तू आम्हाला दैत्यांच्या त्रासातून सोडव. त्या प्रार्थनेनुसार विष्णूने धनुष्य घेऊन दैत्यांचा नाश केला. ही घटना सूर्य धनू राशीत असताना घडली आणि म्हणून याला धनुर्मास किंवा धुंधर्मासस ही संज्ञा मिळाली.
 
धुंधुरास शब्द ऐकल्यावर धुंधुरास म्हणजे काय? हा प्रश्र्न अनेकांना पडला असेल. आजच मुलांना धुंधुरास म्हणजे काय ते सांगण्यासाठी लिहायलाच पाहिजे. सूर्य धनू राशीत भ्रणम करतो तो म्हणजे धनुर्मास ऊर्फ 'धुंधुरमास'. आुर्वेदानुसार मकर संक्रमणाच्या आधी हेमंत ऋतूमध्ये येणार्‍या या धनुर्मासात सामान्य लोकांचा जठराग्री (भूक) भल्या पहाटे जागृत होतो. त्यामुळे या महिन्यात पहाटे उठून या ऋतूमध्ये मिळणार्‍या भाज्या, बाजरीसारखी धान्ये खायचे महत्त्व फार आहे. हे खाणं इतर ऋतूंमध्ये पचायला जड असलं तरी या महिन्यात / ऋतूमध्ये मात्र 'राजस' मानलं गेलंय. वर्षभर खाण्यातून मिळणारी 'एनर्जी' आपल्याला फक्त या एका महिन्यातल्या खाण्यातून मिळवता येते, एवढं याचं प्रचंड महत्त्व पूर्वजांकडून सांगितलं गेलंय.
 
अग्रीला इंधन हवे असते. ते मिळाले नाही तर तो विझून जातो. जठराग्रीचे इंधन म्हणजे अन्न. अग्नी प्रदीप्त झाल्यावर ते त्याला मिळालेच पाहिजे. न मिळेल तर तो रस, रक्त इत्यादी धातूंचा नाश करतो. आणि थकवा जाणवू लागतो, वजन कमी होते.
 
हे सर्व टाळायचे असेल तर अग्नीला त्या त्या वेळी इंधन पुरवले पाहिजे. म्हणून धनुर्मासात प्रातःएव म्हणजे सूर्योदय झाल्याबरोबर आहार करणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले.
 
हा झाला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून विचार. याला आता आपल संस्कृतीत कसे बसवले तेही पाहाण्यासारखे आहे. इंद्र, वरुण, अग्नी, सूर्य अशा अनेक देवतांमुळे आपल्याला भोग्य पदार्थ उपलब्ध होत असतात, म्हणून आपण भोग घेण्यापूर्वी थोडा त्यांना अर्पण करावा. त्यांनीच दिलेले भोग त्यांना न देता जो स्वतः उपभोगतो तो स्तेन म्हणजे चोर ठरतो. धनुर्मासात सकाळी सकाळी कितीही कडकडून भूक लागली असली तरी ताजे गरम अन्न आधी सूर्याला अर्पण करावे, म्हणजे नैवेद्य दाखवावा आणि मग भक्षण करावे अशी परंपरा आहे.
 
धनुर्मास हे महिनाभर आचरण्याचे व्रत आहे. किमान गारठा असेपर्यंत आणि सकाळी भूक लागते आहे तोवर तरी निश्चितच आचरावे.
 
आरोग्यशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचा सुंदर मेळ धुंधुरमासव्रतात दिसतो.
 
या काळात पहाटे आणि रात्री शिशिर ऋतूतली बोचरी थंडी असते. दुपारी मात्र हळूहळू ऊन तापायला लागते. धनुर्मासात पहाटे उठून व्यायाम करायचा आणि सकाळी लवकर भरपेट जेवावचे. ते सुद्धा काय तर लोणच्याचा गोळा घातलेली, तीळ लावलेली बाजरीची भाकरी, वांगे, उसावरची पापडी, वरणा-मटार यांची लेकुरवाळी भाजी, मुगाच्या डाळीची खिचडी आणि त्यावर तूप. पचायला तुलनेने हलका, परंतु थंडीने आलेली रूक्षता कमी करणारा स्निग्ध आहार. पण सध्या फास्टफूडच्या जमान्यात होतं कसं की, भोगीच्या दिवसापुरता कसा तरी नाक मुरडत आपण हा मेनू जेवणात चालवून घेतो, पण व्यायामाचं काय? छे हो, थंडीमध्ये पहाटे पहाटे उठणार कोण? मस्त पांघरूण गुरफटून झोपायला कसली मज्जा येते!
 
आपल्याला पळणे, आसने करणे अशा व्यायामापेक्षा जिममध्ये वर्कआउट करायला जास्त आवडते. तिथल्या इन्स्ट्रक्टरने दिलेले डाएट फॉलो करणे महत्त्वाचे वाटते. फालतू प्रथा कोणी पाळायच्या? शाळा-कॉलेजातल्या मुलांची वजने आणि आरोगच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत हे मात्र खरे. भारतातील तरुण वयातल्या मधुमेहींची संख्या वाढली आहे, असे संशोधनाचे आकडे सांगत आहेत...!
 
विठ्ठल जोशी

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्राचे संत आणि थोर गरिबांचे जनक समाज सुधारक संत श्री गाडगे महाराज