Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Hanuman Story जेव्हा हनुमानाला डास या रूपात यावे लागले...

Hanuman Story जेव्हा हनुमानाला डास या रूपात यावे लागले...
Hanuman Story शंभर योजन इतकं विशाल सागर पार करून आकाशात उडणारे हनुमानजी लवकरच लंका नगरीजवळ पोहोचले. तिथले दृष्य खूप मनमोहक होते. आजूबाजूला विविध प्रकारची सुंदर झाडे होती. सुंदर फुले बहरली होती. विविध प्रकारचे पक्षी आनंदात किलबिलाट करत होते. थंड, मंद, सुगंधी वारा वाहत होता. ते एक अतिशय सुंदर दृश्य होते. पण श्री हनुमानजींचे मन या नैसर्गिक मोहात पडले नाही कारण त्यांची योजना तर लंकेत प्रवेश करण्याची होती.
 
हनुमानजींनी विचार केला की रावणाने माता सीताजींना कुठे लपवून ठेवली आहे ते शोधावे लागेल, त्यासोबतच या ठिकाणाविषयीच्या इतर महत्त्वाच्या गोष्टीही जाणून घ्याव्यात. संपूर्ण सैन्यासाठी येथे राहण्याची जागा, पाणी आणि फळे इत्यादीची सोय देखील मला करावी.
 
हनुमानजींना वाटले की रावणाचा किल्ला दुरून पाहिल्यावर अत्यंत दुर्गम वाटतो. त्यामुळे युद्धाच्या दृष्टिकोनातून त्यातील प्रत्येक बारकावे शोधून काढणेही आवश्यक आहे, परंतु या शहरात खर्‍या स्वरूपात आणि तेही दिवसाच्या उजेडात येणे ही मोठी चूक ठरेल. म्हणूनच रात्री सर्वजण झोपलेले असताना सूक्ष्म रुपातच या शहरात प्रवेश करणे माझ्यासाठी योग्य ठरेल.
 
रात्रीच्या वेळी हनुमानजींनी डासाइतका छोटा वेश धारण करून आणि मनात भगवान श्री रामचंद्रजींचे स्मरण करून लंकेत प्रवेश केला. आजूबाजूला राक्षस-भुतांचा पहारा होता. हे शहर चांगलेच वसले होते. रस्ते आणि चौक सर्वच सुंदर होते. त्याच्या आजूबाजूला समुद्र होता. संपूर्ण शहर सोन्याने बनवले होते. ठिकठिकाणी सुंदर बागा आणि जलाशय बांधण्यात आलेले होते.
 
हनुमानजी अत्यंत काळजीने पुढे जात होते परंतु लंकेचे रक्षण करणाऱ्या लंकिनी राक्षसीने त्यांना ओळखले. तिने हनुमानजींना विचारले, "अरे! चोरासारखा लंकेत घुसणारा तू कोण? लंकेत घुसणारे चोर हे माझे भक्ष्य आहेत हे तुला माहीत नाही का? मी तुला खाण्याआधी तू तुझे गुपित सांग, तू इथे का आला आहेस?
 
हनुमानजींनी विचार केला की मी तिच्याशी कोणत्याही प्रकारचा वाद घातला तर आवाज ऐकून अनेक राक्षस येथे जमा होतील. म्हणून त्यांनी डाव्या हाताच्या मुठीने तिच्यावर प्रहार केला. त्या आघाताने ती बेशुद्ध झाली आणि तिच्या तोंडातून रक्त वाहत जमिनीवर पडली. पण लवकरच ती पुन्हा उभी राहिली.
 
ती म्हणाली, “वानर वीर! आता मी तुला ओळखले आहे. तुम्ही भगवान श्री रामचंद्रजींचे दूत हनुमान आहात. मला खूप आधी ब्रह्मदेवाने सांगितले होते की, त्रेतायुगात हनुमान नावाचा एक वानर सीतेचा शोध घेत लंकेत येईल. त्याच्या मारहाणीने मी बेशुद्ध होईल. असे झाल्यावर समजून घ्या की रावण लवकरच सर्व राक्षसांसह मारला जाणार आहे. शूर रामदूत हनुमान, आता तू निर्भयपणे लंकेत प्रवेश कर. ब्रह्माजींच्या कृपेने मला श्री रामदूताचे दर्शन मिळाले हे माझे मोठे भाग्य आहे.
 
यानंतर हनुमानजी सीताजींच्या शोधात पुढे सरसावले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रामरक्षा स्तोत्र मराठी अर्थासहित Ram Raksha Stotra