Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

What is sutak? सुतक म्हणजे काय? सुतक कसे आणि किती‌ दिवस पाळायचे असते?

What is sutak? सुतक म्हणजे काय? सुतक कसे आणि किती‌ दिवस पाळायचे असते?
, मंगळवार, 11 एप्रिल 2023 (16:47 IST)
सुतक ही हिंदु धर्मातली एक प्रथा आहे. घरातील एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्याच्या क्षणापासून सुतक सुरू होतं. सुतकाचे काही नियम असतात जे त्या घरात पाळले जातात. नात्यातल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर काही दिवस सुतक पाळले जाते. नाते किती जवळचे आहे यावर सुतकाचे दिवस अवलंबून असतात. ही सर्व माहिती पंचांगात असते. बाहेरगावच्या माणसाठी मृत्यूची वार्ता समजल्यानंतर सुतक सुरू होते. सुतक म्हणजेच अशौच, मृत माणसाबद्दल धरावयाचा विटाळ. सुतकालाच अशौच असेही म्हटले जाते. व्यक्तीच्या निधनानंतर 1 ते 13 दिवस अशौच पाळण्याची प्राचीन प्रथा आहे. 
 
सुतक कसे पाळावे नियम
सुतकामध्ये घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जाऊ नये.
कुठल्याही देवळात जाऊ नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घेण्यास हरकत नाही.
आपला जो नित्यक्रम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडून इतर नाम जप, किर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही.
नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही. मात्र ज्याने अग्नी दिला आहे, त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नयेत व दहा दिवस घराबाहेर जाऊ नये.
सुतकामध्ये पलंग, गादीवर झोपू नये.
दररोज आंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लाऊ नये.
अत्तर किंवा सेंट वापरू नये.
नवीन वस्त्र परिधान करू नये. बाकी नित्याचे व्यवहार चालू ठेवावेत.
दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून आंघोळ करावी, सूतकातील सर्व कपडे धुवावीत आणि घरात गोमूत्र शिंपडावे.
अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली किंवा गंध लावावे.
या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा व तेराव्या दिवशीचे विधी करावे.
चौदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकऱ्यांना, नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नवीन टोपी घालावी. खांद्यावर टॉवेल किंवा उपर्णे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जाऊन गाभाऱ्यात तुपाचे निरांजन लावून ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे, अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व उपर्णे तेथेच काढून ठेवावे. लावलेले निरांजन घरी आणू नये.
 
या लोकांना सुतक नसते
मरणाच्या इच्छेने उपवास करून देह ठेवणे, शस्त्राने, विष पिऊन, पाण्यात बुडी घेऊन, फाशी घेऊन, पर्वतावरून किंवा उंचावरून उडी मारून इ. कारणाने मृत असता किंवा आत्महत्या केली असता अशौच नाही म्हणजे सुतक नसतं.
तसेच गुरुहत्या करणारा वगैरे अशा प्रकारच्या व्यक्तीचे दाहकर्म करू नये अथवा त्याचे शौचही पाळू नये. नास्तिक, नीच कर्म करणारे, पितृकर्म न करणारे अशा लोकांकडे जेवण सुद्धा करू नये तसेच पाणी सुद्धा पिऊ नये. 
 
आधार : निर्णयसिंधू, गरूड पुराण
 
विविध ठिकाणी आपल्या परंपरेनुसार पाळले जाणारे नियम
व्यक्तीचे निधन झालेल्या घरातील कोणत्याही स्त्री व पुरूषाने तिलक किंवा टिकली लावू नये.
घरामध्ये दहा दिवस काळा चहा सोडून काहीही बनवत नाही.
शेजारील किंवा इतर नातेवाईक अन्न आणून देतात ते ग्रहण केलं जातं.
घरात अन्न शिजवणारे त्यात फोडणी घालत नाही.
सुतकामध्ये केस व दाढी कापत नाही.
सुतक घरासोबत भावकी तसेच आडनाव बंधूनाही असत.
सुतकात घरातील सदस्य बाहेर पडत नाही.
दहाव्या दिवशी दशक्रिया विधी असतो ज्यात पिंडाला कावळा शिवला म्हणजे निधन झालेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळाली असे मानले जाते.
दहावा झाल्यानंतर सुतक फिटलं जातं.
दहाव्याच्या विधीला निधन झालेल्या व्यक्तीच्या घरातील पुरूष व्यक्तींचा टक्कल केला जातो.
दहावा झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी तेरावा विधी केला जातो.
तेराव्या विधीला नातेवाईकांना बोलावतात आणि गोडधोड खायला केलं जातं.
या दिवशी मयत व्यक्तीच्या कुटुंबातील पुरूष सदस्यांना गंध लावून त्या परिवाराच सुतक संपत.
स्त्रियाही दहाव्या किंवा तेराव्यानंतर टिकली किंवा गंध लावायला सुरू करतात.
 
पार्थिव स्मशानात पोहोचवून आलेले लोक घरी गेल्यावर अंघोळ का करतात
शास्त्रात सांगितले आहे की मृतात्म्याभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते. निधनामुले वातावरणातील सकारात्मकता, चैतन्य लोप पावलेलं असतं तसेच स्मशानातही होणारी कार्यं ही नकारात्मक प्रभाव पाडत असतात. येथे मृत व्यक्तीचं स्थूल शरीर जरी दहन होत असलं तरी सूक्ष्म शरीर काही काळ या ठिकाणीच वास्तव्य करून राहत ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. या ऊर्जेचा मनावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच अंत्यदर्शनामुळे मनावर एक प्रकारचे मृत्यूचे सावट आलेलं असतं. या सर्व विचारांना तसेच भावनांना मनातून काढण्यासाठी स्नान करण्याची पद्धत आहे. स्नान केल्यावर आपोआप शूचिर्भूत झाल्यासारखे वाटते त्यामुळे अंत्यदर्शनानंतर स्नान करायची पद्धत आहे.
 
तसेच यामागील वैज्ञानिक कारण बघितले तर मृतदेह हळूहळू सडण्यास सुरूवात होते आणि त्यामुळे वातावरणात अनेक प्रकारचे सूक्ष्म किटाणू पसरतात. स्मशानातील वातावरणातही अशा किटाणूंची संख्या कितीतरी पटीने वाढलेली असते. या किटाणूंचा संसर्ग होऊन त्याचे आपल्या शरीरावर घातक परिणाम होऊ नये यामुळे स्नान करून स्वच्छ होणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Mangalwar Upay: हनुमान चालिसामध्ये दडले आहे, रोग-दोष निवारणाचे रहस्य!