सप्तपदी नंतर शेवटची विधी आहे झाल. हा खूपच भावनिक प्रसंग असतो. या विधी मध्ये एका वेताच्या मोठ्या टोपलीत कणकेचे हळद घालून बनवलेले 16 दिवे वाती घालून तेवत ठेवतात. याला झाल म्हणतात. या टोपलीत नैवेद्यासाठी शिजवलेले अन्न ठेवतात. त्याचा तात्पर्य आहे की आता वधूचे अन्नोदक या घरातून उठले आहे. आणि आता या पुढे ती सासरचे अन्न ग्रहण करणार आहे.
या विधीमध्ये गुरुजी काही मंत्रोच्चार करतात. आणि वधूचे आईवडील वधूच्या वडीलधाऱ्यांना बसवतात आणि त्यांच्या डोक्यावर कापड ठेऊन झाल ठेवतात. आणि आता आम्ही आमची मुलगी तुमच्या घरात दिली आहे. तिची जबाबदारी आता तुमच्यावर आहे. तिचा नीट सांभाळ करावा. असे सांगतात. नंतर झालीच्या स्वरूपात मुलीची जबाबदारी वराच्या वडीलधाऱ्यांच्या डोक्यावर ठेवतात.
झाल झाल्यावर मुलीची सासरला पाठवणी होते. जन्मदात्या आई वडिलांची लाडाची लेक सासरी जाण्यासाठी निघताना हा क्षण खूपच भावनिक असतो. आपली लेक आपले घर कायमचे सोडून सासरी जायला निघते. या वेळी आई-वडिलांचे कंठ दाटून येते. वधूकडील नातेवाईकांचे डोळे पाणावतात. मुलीला सासरी पाठवण्यापूर्वी वधूची आई वधूची मालत्याने ओटी भरते. गौरीहारच्या ठिकाणी सुपलीचे पाच वाण ठेवले असतात.
ते सौभाग्याचे वाण वधू आपल्या आईला आणि जवळच्या महिला वर्गाला देते. नंतर आंबा शिंपडण्याची विधी होते आणि गौरीहारच्या पूजे मधील अन्नपूर्णा आणि बाळकृष्ण आणि गौरीहारातील एक खांब वधूला सासरी नेण्यासाठी देतात. नंतर मुलीची पाठवणी केली जाते.