Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काचेचे तळे...

hindu dharma
नऊ-दहा वर्षापूर्वीची गोष्ट. संत सावता माळी यांच्या अरण येथील मंदिराच्या सभामंडपात बसलो होतो. उंच छत, प्रत्येक लाकडी खांबाला वरच्या बाजूस लावलेल्या विविध देवदेवतांच्या व संतांच्या तसबिरी. काही खांबांवर मात्र कोणी भेट दिलेले आरसे लटकावले होते. छताला ठराविक अंतरांवर काचेच्या हंडय़ा टांगलेल्या होत्या. टळटळीत दुपारची वेळ असल्याने फारशी वर्दळ नव्हती. माणसांच्या गोंगाटात तीर्थे हरवत चाललेली असताना येथे मात्र निरामय शांतता होती. या शांततेत चिमण्यांचा कलकलाट भारी सुखद वाटत होता. ते जीव ते केवढे? पण कलकलाट तेवढाच असावा. तरीही तेथे शांतता असल्याने सारे वातावरण चिमण्यांनी आपल्या कब्जात ठेवले होते. चिमणांचे अनेक परिवार तेथे सुखेनैव नांदत होते. उंच लाकडी खांबाला लावलेल्या अनेक संतांच्या तसबिरी त्यांना अभय देत होत्या. काही तसबिरींच्या   पाठीमागे काडी काडी जमवून वसविलेली घरटीही तेथे होती. कुणी या घरटय़ांना मोडीत काढत नाही, याचा विश्वास त्यांच्या अंत:करणात बरीच वर्षे रुजला होता. टाळमृदंगाच्या साथीने येथे भजन-कीर्तने ऐकत ऐकत आपले इवलेसे जीवन सुखाने कंठणार्‍या, देव आणि संत यांच्या आश्रने राहिलेल्या चिमणंचा आवाज हरिनामाने रंगून गेला होता. अचानक कलकलाट वाढला आणि त्या सभामंडपाच्या उंच छताखाली पाचसहा चिमण्या भिरभिरू लागल्या. एकमेकींना चोची मारून कंटाळल्यावर धपापत छातीने आपल्या आपल्या घरटय़ाच्या दिशेने त्यांची  उड्डाणे घेतली. त्या संतांच्या तसबिरीच्या लाकडी चौकटीवर स्थिरावल्या. अधूनमधून मान खाली झुकवत त्यांनी संतचरणांचे दर्शन घेतले. शांत झाल्या. तो आरसा होता. त्या आरशाच्या मागे तिने घरटे केले होते. त्यामुळे तिला मान झुकवूनही संतदर्शनाऐवजी आपलेच प्रतिबिंब दिसत होते. चिवचिव चालूच होती. आपणच निवडलेल्या काचेच्या अंगणात तिचे संतापलेले भावविश्व सहजासहजी स्थिर काही होईना..!! आता त्या चिमणीला राग अनावर झाला. ती त्या आरशात पाहात पाहात आणखी संतापली आणि तिने आरशावर आपली चोच मारायला सुरुवात केली. सभोवताली निर्माण झालेल्या काही शांत क्षणांमध्ये तिची चोच आरशावर आपटून होणारा खटखट आवाज येऊ लागला. ती चिमणी जो जो आरशात पाहात असे, तो तो तिला राग येत होता. आपल्या काचेच्या तळ्यात हे कोण नवीन आले? या भावनेने ती जोरजोरात चोची मारत राहिली. त्या मंदिराच्या शांत सभामंडपात आता तिचा एकटीचा चिवचिवाट आणि तिने आरशावर मारलेल्या चोचीचा खटखट आवाज मात्र घुमत राहिला. 
 
आपल्याच प्रतिबिंबाला आपण समजू शकत नाही. ही त्या चिमणीची केवढी मोठी समस्या होती? इतर चिमण्यांनी मान खाली झुकविली की संतांचे दर्शन घडत होते. त्यामुळे त्यांचे मूलस्वरूप त्या प्रतिमेत विरघळून जात होते जणू..!! आणि या चिमणीला मात्र स्वत:च्याच   संतापलेल्या चेहर्‍याचे दर्शन घडत होते. परंतु तो चेहरा आपलाच आहे, हे मात्र ती समजून घेत नव्हती. कारण बुद्धीला मळभ चढले की जीव आत्मभान विसरतो. 
 
जीवन असेच काहीसे असते. आपण बर्‍याचदा आपल्या भोवती काचेचे तळे निर्माण करतो. त्यात अडकून जात राहतो. काचेचा तो बिलोरी स्वभाव आपल्याला भुरळ पाडत राहतो. आपण आपल्याच रंगरूपात अडकतो. आपल्या मनासारखे घडते तेव्हा हे काचेचे तळे आपणास सुखावते. एखादी मनाविरूद्ध घटना घडते तेव्हा या काचेच्या तळ्यात उमटणारी प्रतिबिंबे आपलीच आहेत. हे मात्र आपण विसरत जातो. 
स्वत:लाच चोची मारत राहतो. या तळ्याबाहेर एक सामंजस्याचे आकाश वसते, हे संतविचारानेच समजते.
 
दीपक कलढोणे 

Share this Story:

Follow Webdunia marathi