Publish Date: Mon, 21 Dec 2015 (12:27 IST)
Updated Date: Mon, 21 Dec 2015 (12:32 IST)
मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. ‘जसजसे एका माध्यमातून दुसर्या माध्यमात जावे, तसतसे काळाचे परिमाण पालटते’, हे आता अंतरिक्षयात्री चंद्रावर जाऊन आले, तेव्हा त्यांना आलेल्या अनुभवावरून सिद्धही झाले आहे. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो. कर्क संक्रांतीस उत्तरायण पूर्ण होते आणि दक्षिणायनास प्रारंभ होतो, म्हणजेच देवांची रात्र चालू होते. कर्क संक्रांत आषाढ मासात येते; म्हणूनच आषाढ शुद्ध एकादशीस ‘शयनी एकादशी’ म्हटले आहे; कारण ‘त्या दिवशी देव झोपी जातात’, अशी समजूत आहे. कार्तिक शुद्ध एकादशीस देव झोप घेऊन उठतात; म्हणून तिला ‘प्रबोधिनी (बोधिनी, देवोत्थानी) एकादशी’ असे म्हणतात. वस्तूतः दक्षिणायन सहा मासांचे असल्यामुळे देवांची रात्रही तेवढीच असायला हवी; पण बोधिनी एकादशीपर्यंत चारच मास पुरे होतात. याचा अर्थ असा की, एक तृतीयांश रात्र शिल्लक आहे, तोच देव जागे होतात आणि आपले व्यवहार करू लागतात.’ ‘नवसृष्टीनिर्मिती हे ब्रह्मदेवाचे कार्य चालू असतांना पालनकर्ता श्रीविष्णु निष्क्रिय असतो; म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटले जाते. तेव्हा श्रीविष्णु क्षीरसागरात शयन करतो, असे समजतात. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णुप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’
महत्त्व : देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते -
वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः ।
व्रतेन न चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।
अर्थ : प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.’