ज्ञानेश्वर महाराजांना वाळीत टाकले तेव्हा त्यांच्या मनात आलेले विचार:
१) माझा जन्म कोठे व्हावा,कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत, हे माझ्या हाती नव्हते, त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्या ऐवजी मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो.
२) मी स्त्री व्हावे की पुरूष, काळा की गोरा, माझ्या शरिराची ठेवण, सर्व अवयव ठिकठाक असणे, हे देखील माझ्या हाती नव्हते. मात्र जे काही मिळालेय त्याची निगा राखणे, योग्य ती काळजी घेणे, हे माझ्या हाती आहे.
३) माझ्या आई वडिलांची सांपत्तिक स्थिती, सामाजिक स्थान, त्यांचा स्वभाव, हे देखील माझ्या हाती नव्हते. त्यामुळे ते कसेही असले तरी त्यांचे माझ्यावर प्रेम आहे हे मी सदैव लक्षात ठेवावे.
४) सगळ्यांनाच सगळी सुखं मिळत नाहीत. हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात देखील काही दु:खं असणारच आहेत. ती दु:खं कोणती असावीत हे देखील ठरवण्याचा माझा अधिकार नाही. त्यामुळे माझ्या दु:खांचे भांडवल न करता, मी त्या दु:खांचे निराकरण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करत राहीन.
५) माझ्या आसपास असलेल्या लोकांनी, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांनी, माझ्याशी कसे वागावे हे मी ठरवणे माझ्या हाती नसले, तरी मी त्यांच्याशी प्रेमपूर्वक वर्तन करणे नक्कीच माझ्या हाती आहे. संयम, मृदु भाषा, मंगल कामना हे माझ्या हाती आहे.
६) माझ्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, परिस्थिती, यावर माझे अनेकदा नियंत्रण नसते. मात्र त्या वेळी सकारात्मक विचार अन् योग्य वर्तन नक्कीच माझ्या हाती आहे.
७) हे विश्व मी निर्माण केलेले नाही. किंवा हे विश्व कसे असले पाहिजे, या माझ्या मताला देखील काही किंमत नाही. तेव्हा, हे असे का? ते तसे का? असे का नाही? वगैरे प्रश्न विचारत राहून वैतागण्या ऎवजी, जे चूक आहे, अयोग्य आहे, ते किमान मी तरी करणार नाही हे मला ठरवता येईल. हे ही नसे थोडके !
८) कधीतरी मला कोणत्या तरी प्रकारचे दु:ख मिळणार आहे याची जाणीव ठेवून, मी माझ्या आसपासच्या दु:खी माणसांची जमेल तशी मदत केली पाहिजे.
९) आज जरी यश, सुख, समृद्धी माझ्या पायाशी लोळण घेत असली, तरी उद्या अथवा केव्हाही हे सर्व नष्ट होऊ शकते याची सतत जाणीव ठेवून, मी अहंकाराला दूर ठेवले पाहिजे.
१०) मला जे मिळू शकले नाही, त्याबाबत दु:ख करत रहाण्या ऐवजी, जे काही मिळाले आहे, त्या बाबत मी आभारी असले पाहिजे. जग अधिक चांगले, सुंदर करण्यासाठी हातभार लावण्याची संधी मला जेव्हा जेव्हा मिळेल, तेव्हा ती संधी मी गमावता कामा नये.