देव नवसाने पावत नाही, तो भक्तीने पावतो.
मानव देह क्षणभंगुर आहे. तो पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे उत्पन्न होतो व फुटूनही जातो, तरी सुद्धा संतांनी ''दुर्लभो मानुषोदेहो'' असे म्हणून त्याची प्रशंसा केली आहे. कारण मानव देहातच धर्म अर्थ काम व मोक्ष प्राप्त करण्याचे सामर्थ्य आहे. मानवालाच भगवंताची भक्ती करता येते. आईवडीलांनी असा दुर्लभ देह आम्हाला दिला. पण आम्ही त्यांचे कधी आभार मानित नाही. आम्ही त्यांना कधी सकाळ संध्याकाळ नमस्कार करीत नाही. इतकेच काय पण आम्ही त्यांच्या म्हातारपणी सुद्धा त्यांची सेवा करीत नाही. आई वडील तर साक्षात परमेश्वर आहेत. त्यांची सेवा न करण्यावर भगवंत कधीत कृपा करणार नाही. त्यांच्या अशीर्वादाने, कृपेच्या अमृतवर्षानेच आपली जीवन वेळ फलते फुलते. पुंडलीकाचे उदाहरण बोलके आहे त्याच्या पितृभक्तीने विठ्ठलाला अवतार घ्यावा लागला. म्हणून दुर्लभ देहाला व्यर्थ न जाऊ देता ज्यांनी तो दिला त्या आईवडीलांचे सतत स्मरण ठेवावे. त्यांच्याप्रती नम्रता, विनयता व प्रेमभाव ठेवावा.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी