Article Hinduism Marathi %e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%ae%e0%a4%be 110062500018_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वटसावित्री पौर्णिमा

ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर

वटसावित्री पौर्णिमा
MHNEWS
सुवासिनी स्त्रियांनी सौभाग्यवृद्धीसाठी करायचे हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला करतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे त्रिरात्रव्रत करावे, असे सांगितलेले आहे. तीन दिवस उपवास करणे अशक्य असेल, त्यांनी फक्त पौर्णिमेच्या दिवशी उपवास करावा. सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री, नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत. या व्रताचा विधी असा -

नदीकाठची वाळू आणून पात्रात भरावी. तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवाव्या. मग त्यांची षोडशोपचार पूजा करावी. त्यानंतर अर्घ्य द्यावे. मग पुढील मंत्राने सावित्रीची प्रार्थना करावी -

सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी।
तेन सत्येन मां पाहि दु:खसंसारसागरात् ।।
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते ।
अवियोगास्तवथाS स्माकं भूयाज्जन्मनि जन्मनि ।।

पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनींसह सावित्रीची कथा श्रवण करावी.

या व्रतात सावित्रीच्या मूर्तीची पूजा सांगितलेली असली, तरी रूढी मात्र वेगळी आहे. सावित्रीचा पती सत्यवान वडाच्या झाडाखाली गतप्राण झाला आणि पुन्हा तिथेच सजीव झाला, या संकेताला अनुसरुन स्त्रिया या दिवशी वडाचीच पूजा करतात. त्यासाठी त्या वटवृक्ष असेल त्या ठिकाणी जाऊन वडाच्या मुळांशी पाणी घालतात आणि त्याला प्रदक्षिणा घालून सुताचे वेष्टण करतात. नंतर त्याची पूजा करतात. नंतर त्याच्या मुळाशी असलेल्या सावित्री-ब्रह्मदेव, सत्यवान-सावित्री, धर्मराज व नारद यांच्या प्रतिमांचे पूजन करतात व प्रार्थना करतात.

वड जवळपास नसले, तर वडाची फांदी कुंडीत रोवून किंवा वटसावित्रीचे चित्र भिंतीवर चिकटवून त्याची पूजा करण्याचीही प्रथा आहे. पूजेनंतर सुवासिनींनी सौभाग्यवायने देतात.

webdunia
MHNEWS
व्रताचे उद्यापन करताना ज्येष्ठ शुद्ध द्वादशीला अल्पाहार करतात. त्रयोदशीच्या दिवशी व्रताचा संकल्प करतात. वटवृक्षाच्या मुळाशी किंवा घरी चंदनाने काढलेल्या सर्वतोभद्र मंडलावर कलश मांडतात आणि त्याच्यावर सात धान्यांनी भरलेले वेळूचे शिप्तर ठेवतात. त्याच्या जवळच चांदीचा वटवृक्ष, लाकडांचा भारा, कुर्‍हाड व चांदीचा रथ मांडतात. रथात चांदीचा पलंग मांडून त्याच्यावर ब्रह्मा, सावित्री, सत्यवान, त्याची पत्नी सावित्री, यमधर्म आणि नारद यांच्या सुवर्णाच्या प्रतिमा ठेवतात. सुवर्णाच्या प्रतिमा शक्य नसल्यास मातीच्या प्रतिमा ठेवतात व त्यांची पूजा करतात. रात्री सावित्रीचे चरित्रकथन, नृत्य, गीत, इ. कार्यक्रम करतात. चवथ्या दिवशी आचार्यद्वारा हवन व यथाशक्ती चोवीस, सोळा, बारा आणि आठ दांपत्यांची पूजा करतात. गोदान, शय्यादान व प्रतिमादान देऊन आणि ब्राह्मण भोजन घालून व्रताची समाप्ती करतात.


Share this Story:

Follow Webdunia marathi