स्वतयाचे कुळी दिपको दिव्य झाला॥
हरिभक्ती लागोनि तारी समस्ता।
नमस्कार माझा सद्गुरू एकनाथा॥
संत एकनाथ षष्ठीस नाथषष्ठी म्हणतात. शके १५२१ ला फाल्गुन षष्ठीस नाथांनी समाधी घेतली. नाथांच्या आयुष्यात या षष्ठीला फार महत्त्व आहे. जनार्दन स्वामींचा जन्म, जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन, नाथांना जनार्दन स्वामींचा अनुग्रह, जनार्दन स्वामींची समाधी आणि नाथांची समाधी या सगळ्या गोष्टी एका तिथीला झाल्या. नाथांनी संसार करून परमार्थ केला. नाथांचे एकनाथी भागवत ही भागवताच्या ११व्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे. ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे काम एकनाथांनी केले. स्पृश्य-अस्पृश्य भेद नाथांनी कधीही मानला नाही. सर्व प्राणीमात्र एक आहेत असे नेहमी मानले. काशीहून रामेश्वराला न्यायच्या कावडीतले पाणी तहानलेल्या गाढवाला पाजले. नाथषष्ठीनिमित्त पैठणला भागवत भक्तांचा प्रचंड मेळावा जमतो. 'भानुदास एकनाथ' अशा भजन कीर्तनाने आणि नामघोषांच्या गदारोळाने पैठणचा आसमंत दुमदुमून जातो.
आपली महाराष्ट्र भूमी एवढी भाग्यवान आहे की तिच्या संतपरंपरेत कधी खंडच पडला नाही. तेराव्या शतकात ज्ञानदेवांनी भागवत धर्माच्या इमारतीचा पाया रचला आणि या मंदिरातील स्तंभाचे काम नाथांनी केले. म्हणून तर कवी आनंदाने सांगतात ''जनाईनी एकनाथ। स्तंभ दिला भागवत''
पंधराव्या शतकात जन्मलेले नाथ हे चमत्कारच होत. पाचशे वर्षांपूर्वी नाथांनी जे कार्य केले ते आज करण्याचे धारिष्ट आपल्याकडे नाही. लहानपणीच मातृपितृ छत्र हरवलेले नाथ, आजोबा चक्रपाणी यांच्याकडे मोठे होत होते. कर्नाटकातल्या पांडूरंगाची मूर्ती पंढरीला आणणार्या संत भानुदासांचे ते पणतू होते. या बाळाला बालवयातच खर्या ज्ञानाची ओढ लागली होती. त्यासाठीच घराचा त्याग करून पैठणहून देवगडला जनार्दन स्वामींजवळ आले. त्यांची ज्ञानावरची जाज्वल्य निष्ठा जाणून जनार्दनस्वामींनी त्याला आपला शिष्य मानले व नाथगुरुंची सेवा करून ज्ञान प्राप्त करीत राहिले. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव या बरोबरच नाथांनी योगविद्येचाही अभ्यास केला. देवगडच्या वायव्येस असलेल्या शूलभंजन पर्वतावर त्यांनी सहा वर्षे तपश्चर्या केली. एवढा ज्ञानप्राप्तीवर नाथ परमार्थ साधना करू शकले असते. परंतु, संतजनामध्ये नाथांचे स्थान आगळेवेगळे आहे. त्यांनी प्रत्यक्ष कृतीने समाजाला दाखवून दिले की प्रपंच व परमार्थ या गोष्टी काही परस्परविरोधी नाहीत. प्रपंचाकडे पाठ फिरवून परमार्थाची वाट धरणे ही गोष्ट चूक आहे. त्याचप्रमाणे परमार्थबुद्धीने प्रपंच करावा हे नाथांना समाजाला सांगायचे होते, पण केवळ उपदेशक नव्हते तर ते एक कर्ते सुधारक होते. 'आधी केले मग सांगितले' या वाक्यानुसार जे पटेल, भावेल ते त्यांनी स्वतः प्रथम आचरले. मग यासाठी वाटेल तो ताप सहन करावा लागला तरी तो सहन करण्याची नाथांची तयारी होती.
नाथांना मातृभाषेविषयी विलक्षण प्रेम होते. गिर्वाण भाषेपेक्षा ती तसूभरही कमी नाही असे ते मानत. अमृताते पैजा जिंकण्याचे सामर्थ्य ज्ञानदेवांनी मांडले हे त्यांना जाणवत होते. म्हणून आपल्या भोवतालच्या सार्या अज्ञानी जनांना सूज्ञ करण्यासाठी नाथांनी भागवत मराठीत आणले.
गीर्वाण भाषा देवे केली। आणि मराठी काय चोरे आणली?
असा त्यांचा रोकडा सवाल होता. नाथांना सारी माणसे सारखीच वाटत. त्यांना माणसामाणसातील भेद मान्य नव्हता. रडणारे हरिजनाचे बालक पाहिल्यावर ते बालक आहे एवढीच भावना त्यांच्या जवळ उरली होती. त्यांनी त्या बालकाला उचलून घेतले. गणू महाराच्या घरी ते भोजनास गेले. प्रत्यक्ष श्राद्धादिवशी गावातील महारांना स्वतः घरात नेऊन नाथांनी त्यांना जेवू घातले. भुकेल्यांची आर्तता त्यांनी जाणली. नाथांची भूतदया केवळ मानवापुरती सीमित नव्हती ती प्राणीमात्रावरही ओसंडत होती. तहानलेल्या गाढवालाही पाणी पाजून नाथांनी शांत केले. आजच्या शतकात आपण जे करू शकत नाही ते नाथांनी पाचशे वर्षांपूर्वी केले मग नाथ थोर सुधारक नाहीत का?
नाथांनी भागवत भारूडे, वाघ्या, जोगवा, जोशी जागल्या ही नाथांची मराठी रचना, काव्यासाठी त्यात आजही एकमेव आहे. वाङ्मय क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केलेले हे मराठीतले पहिले संपादक आहेत. ज्ञानेश्वरी हा नाथांचा आवडता ग्रंथ. १५व्या शतकापर्यंत हा ग्रंथ आपले पाठ घुसवून नुसता बुजबुजून गेला होता. नाथांनी जुन्या प्रती शोधून काढल्या व भाष्यशास्त्राच्या साह्याने ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली असे अपाठ घुसविण्याचे वामकृत्य करणार्यांना नाथ बजावतात
''ज्ञानेश्वरीसाठी। जो करील मर्हाठी। तेणे अमृताचे ताटी। जाण नरोटी ठेवीले॥'' नाथांची गुरुभक्ती इतकी होती की, गुरू सेवेच्या गौरवाच्या असंख्य ओव्या नाथांच्या साहित्यातून पावलोपावली दिसतात. नाथ म्हणतात-
सैराट धावता पाय। श्री जनार्दन निजमाय। पदोपदी कडीये घेत जाय। रीते पाऊल पाहे पडो नेदी॥
सर्वदा तिष्ठे सर्वांगे। मीची निर्भय सदा आचार्य संगे। जनार्दन जननी अंगसंग। भयतेची निर्भय होऊ लागे॥
या वरून नाथांच्या अंतर्यामी गुरुप्रेमाच्या गूढ अनुभूतीचे तरंग निर्माण होऊन त्यांचे सारे भावविश्व व्यापून टाकल्याचे दिसते. परमेश्वराने आपल्याला दिलेल्या मनुष्य देहाचे सार्थक झाले असे नाथांना वाटू लागले. जगण्यासाठी मिळालेला प्रत्येक क्षण त्यांनी लोकोद्धारासाठी कामी आणला होता. जवळपास प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी अनेक प्रकारच्या प्रसंगांना तोंड देत भागवत धर्माची पताका महाराष्ट्रात फडकावित ठेवली. सनातनांच्या पैठण बालेकिल्यात त्यांनी समाज व्यवस्थेशी आजीवन संघर्ष केला. प्रचंड साहित्यनिर्मिती केली.
लोकांना शहाणे करण्याचा प्रयत्न केला. परमेश्वराने बहाल केलेल्या मनुष्यजीवनाप्रती ते कृतज्ञ होते. आता त्यांना महानिर्वाणाचे वेध लागले होते. ब्रह्मसभेने दिलेल्या देहान्त प्रायःश्चिताने ते व्यथित होते. वैकुंठाच्या प्रवासाची ते तयार करू लागले. त्याचे सुतोवाच त्यांनी कधी प्रत्यक्ष तर अप्रत्यक्षपणे केले. त्यांच्या निकटच्या मंडळींना त्यांच्या निर्वाणाची जाणीव झाली. हा शांतीब्रह्म आपल्या निर्णयापासून यत्किंचितही ढळणार नाही. या संकल्पनेने सर्वांनाच धक्का बसला. आपल्या गुरूचा म्हणजे जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीचा दिवस त्यांनी प्रस्थानासाठी मुक्रर केला. जलसमाधीचा निर्णय जाहीरपणे सर्वांना कळला. समस्त सज्जन मंडळी शोकाकूल झाली. सर्व सामान्यांना अन्नपाणी गोड लागेना. ही घटना साधीसुधी नव्हती. नाथांचा विरह पचविणे ही गोष्ट सर्वांसाठी अवघड गोष्ट होती. अखेर फाल्गुन वद्य षष्ठीस देहत्याग करण्याचे नाथांनी ठरविले.
अखेर फाल्गुन वद्य ॥६॥ शके १५२१ हा दिवस उजाडला. सर्वत्र गडबड सुरू झाली होती. नाथांनी आपल्या गुरूचा पुण्यतिथीचा दिवस म्हणून मोठा उत्सव साजरा केला. सकाळी पूजा वगैरे आटोपून सर्वांनी भोजन घेतले. दुपारी नाथांनी दिंडीसह गोदावरीच्या कृष्णकमल तिर्थाच्या वाळवंटाकडे प्रयाण केले. तेथे नाथांचे अखेरचे कीर्तन झाले. पुंडलिक वरदाचा गजर झाला. असंख्य लोक भक्तमंडळी कृष्णकमल तीर्थावर जमा झाले होते. लोकांच्या डोळ्यात अश्रूधारा वाहात होत्या. आकाशाला भगवा रंग चढला. अभीर, बुक्याची उधळण, चंदन उटीचा सुगंध सुटलेला, टाळ मृदंगाचा गजर होत होता. नाथ स्थितप्रज्ञ होते. त्यांच्या चेहर्यावर स्मित विलसत होते. कीर्तनात सर्वजण इतके रंगून गेले होते. भक्त मंडळी देहभान विसरलेली असताना नाथ गंगेच्या उदरात दिसेनासे झाले. गळ्यातील हार आणि विणा पाण्यावर तरंगता नाथ-नाथ म्हणत जमलेल्या मंडळींना अश्रू अनावर झाले. एक महापर्व संपले होते. सहासष्ट वर्षांचे आयुष्य शांतपणे, संयमाने वसमाधानाने पूर्ण करून नाथांनी आपले अवतारकार्य संपविले.
''शरण शरण एकनाथा।
पायी माथा ठेवीला।
नका पाहू गुण दोष।
झालो दास पायांचा॥''