जो सुख भोगतो त्याला दु:ख भोगावे लागतेच
श्री सद्गुरूचा अनुग्रह जोपर्यन्त होत नाही तोपर्यंत जीवन शुद्ध आणि पवित्र होत नाही. प्रत्यक्ष परमात्मा जेव्हा भूतलावर अवतार घेतो तेव्हा सद्गुरूकडून अनुग्रह घेण्यास त्याला शरण जातो. श्री सद्गुरूच या संसार सागरातील मगराच्या जबड्यातून मनुष्याची सुटका करतो. परंतु आजकाल तर अशा सद्गुरूची उपेक्षाच होते. केवळ पुस्तकी ज्ञानाचा प्रसार होतो. म्हणून माणसाचे डोके रिकामे खोकेच झाले आहे. पुस्तकाने ज्ञान प्राप्त होईल पण ज्ञान आणि जाणीव यांचा समन्वय सद्गुरूकृपेनेच साधतो. प्रयत्नाने मिळविलेले ज्ञान अभिमानाला कारणीभूत होते व साधकाला कुमार्गाकडे वळविते. श्री सद्गुरूकृपेने मिळालेले ज्ञान विनय, विवेक व सदाचाराकडे नेते.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)