Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जावयाची गाढवावरून धिंड

धुलिवंदनाची अशीही परंपरा

जावयाची गाढवावरून धिंड

महेश जोशी

जावईवेडे गाव म्हणून ओळखल्या जाणार्‍या बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या विडा गावात धुलिवंदनाच्या दिवशी जावयाला ‘सन्मानपूर्वक’ गाढवावरून मिरवले जाते.ही परंपरा ७५ वर्षांपासून सुरू आहे.विशेष म्हणजे सर्व जातीधर्माच्या जावयांची याप्रसंगी मिरवणूक काढली जाते. एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. आजघडीला गावात जावयांची संख्या शंभराच्या पुढे आहे, तरी धुलिवंदनाची चाहूल लागताच गदर्भ धिंडीच्या धसक्याने जावई भूमिगत होतात. असे असले तरी कोणत्याही परिस्थितीत एका जावयाला पकडून परंपरा कायम राखण्यात येथील युवक आतापर्यंत यशस्वी राहिले आहेत. दरवर्षी गदर्भ धिंडीचा मानकरी कोण ठरतो याकडे लोकांचे लक्ष लागून आहे.
विडा हे गाव जहागीरदाराचे गाव म्हणून आळखले जाते.पंच्चाहत्तर वर्षांपूर्वी तत्कालीन जहागीरदार ठाकूर आनंदराव देशमुख यांच्या जावयांची धुलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून धिंड काढण्यात आली होती. तेव्हापासून जावई धिंड ही गावाची परंपराच होऊन गेली आहे. गावातीलच मुलींशी विवाह केलेले गावजावई, काही घरजावई तर व्यवसायानिमित्त विडातच तळ ठोकून बसलेले जावई अशा एकूण जावयांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे.
विडेकर आपल्या लाडक्या जावयाला धुलिवंदनादिवशी गाढवावरून सन्मानपूर्वक गावभर मिरवतात व त्याला मनपसंत आहेर करतात.धुलिवंदनादिवशी एकदा मिरवलेला जावई पुन्हा मिरवला जात नाही. गाढव धिंडीसाठी निवडलेला जावई हा कोणत्याही समाजातील असतो. तसेच तो गरीब-श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नसतो. ऐनवेळेला तावडीत सापडलेल्या जावयांना गाढवावरून मिरवले जाते. मागच्या दोन वर्षांपूर्वी गावातीलच मुलीशी विवाह केलेले मुस्लिम समाजातील शिक्षक असलेले सादेक कुरेशी यांची धिंड काढण्यात आली. यातून विडेकरांनी एकतेचाही संदेश दिलेला आहे. चपलांचा हार घातलेल्या गाढवावरून जावयाला मिरवले जाते. त्याच्यासमोर भालदार चोपदार रंगाचे पिंप भरलेले असतात. बँडबाजा, ढोलताशा तसेच डॉल्बीच्या गाण्यांच्या आवाजात जावयाला मिरवले जाते. ही मिरवणूक गावभर फिरून शेवटी येथील ग्रामदैवत हनुमान मंदिराच्या पारावर विसर्जित होते. तेथे जावयाला युवकांनी गोळा केलेल्या वर्गणीतून मनपसंत आहेर केला जातो. आतापर्यंत जावयाला मिरवण्यामुळे कुठलाही भांडण तंटा झाला नाही हे विशेष. गावात शंभरावर जावई असले तरी हे चतुर जावई धुलिवंदन जवळ येताच पलायन करतात. मात्र येथील युवक कसल्याही परिस्थितीत एका जावयाला पकडतातच. यंदा या धिंडीचा मान कोण्या जावयाला मिळतो याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi