Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हे रंग? नव्हे बेरंग

हे रंग? नव्हे बेरंग

वेबदुनिया

रंग पंचमी म्हणजे रंगाचा सण. सर्वजण या रंगात न्हाऊन निघतात. मात्र यंदा बाजारातून महागडे रंग आणणार असाल तर सावधान. या रंगांमध्ये आरोग्यास घातक अशी रसायने असण्याची शक्यता आहे. यामुळे कॅन्सर, तात्पुरता आंधळेपणा आणि मुत्रसंस्थेच्या कार्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती असते.
रंगपंचमीचा सण देशभरात मोठा उत्साहात साजरा केला जातो. यंदा शनिवारी दि. २२ रोजी हा सण येत आहे. या निमित्ताने बाजारात रंगांची दुकाने सजली आहेत. पूर्वी होळी म्हटले, की फुलांच्या पाकळ्या, मेंदी, गुलमोहराची पाने, टोमॅटो, हळद, डाळीचे पीठ अशा हर्बल पदार्थांपासून रंग तयार केले जायचे. या रंगांमुळे रंग पंचमीचा आनंद द्विगुणीत व्हायचा. सोबतच शरीरासाठीही हे रंग फायदेशीर ठरायचे.
काळ बदलला तशी रंगपंचमी साजरी करण्याची पध्दतही बदलली. नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रासपणे विकले जाऊ लागले. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल. या रंगांमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक अशी ऑक्साईड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनिअम ब्रोमाईड, पर्शियन निड, मर्क्युरी सल्फाईड अशी विषारी रसायने टाकलेली असतात. या रसायनांमुळेच हे रंग अधिक गडद होतात व दीर्घकाळ टिकतात. मात्र या रंगांचे काही परिणाम तात्काळ दिसून येतात तर काही दीर्घकाळाने जाणवतात.
या रंगांमुळे त्वचेची आग होते तर डोळ्यांची जळजळही तत्काळ जाणवते. मात्र दूरगामी परिणाम यापेक्षा गंभीर आहेत. रासायनिक रंगांमुळे मुत्रसंस्थेचे कार्य बिघडण्याची भीती आहे. त्वचेचा कर्करोगही या रंगांमुळे होऊ शकतो. त्वचेचे अन्य आजार, डोळ्यांना सुज व तात्पुरतेच आंधळेपणा यासारखे घातक परिणाम या रंगांमुळे होऊ शकतो. वास्तविक पाहता रंगांच्या डब्यावर 'केवळ औद्योगिक उपयोगासाठी' असा स्पष्ट उल्लेख असतो. मात्र जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यंदा उत्साहात रंगपंचमी साजरी करा. मात्र आरोग्याचीही काळजी घ्या, असा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi