Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माळव्यातील भगोरीया अर्थातच सातपुड्यातील वैशिष्ट्यपूर्ण होळी

माळव्यातील भगोरीया अर्थातच सातपुड्यातील वैशिष्ट्यपूर्ण होळी
, सोमवार, 18 मार्च 2019 (13:29 IST)
महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत होळीच्या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. सातपुडा पर्वताच्या कुशीत राहणार्‍या आदिवासी (महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश यांना जोडणारा भाग) समाजात या सणाचे दिवाळसणापेक्षाही जास्त महत्त्व आहे. होळीच्या आठ दिवस आधी आणि आठ दिवस नंतर चालणार्‍या या उत्सवात आदिवासी समाजातील जनतेचा भोंगर्‍या बाजार भरतो. त्याभागातील प्रत्येक गावात एकेक दिवस हा बाजार भरतो. या बाजारातून आदिवासी संस्कृती दिसून येते. 
 
या दिवशी हे आदिवासी कुलदेवतेला नमस्कार करून पारंपरिक नृत्य सादर करतात. रात्रभर आजूबाजूचे लोक एकत्र येऊन नाचगाणी करतात. दारू पितात आणि होळीचा सण साजरा करतात. रात्री कुलदेवतेचा आशीर्वाद घेऊन बोकड कापले जाते. बोकड कापण्याचेही एक वैशिष्ट्य आहे. आपल्या जवळील धारदार शस्त्राने एकाच घावात बोकडाचे धड वेगळे केले जाते. त्यानंतर मरून पडलेल्या बोकडांभोवती रात्रभर नृत्य करत गाणी म्हटली जातात. या बोकडाचे मांस सकाळी शिजवून प्रसाद म्हणून खाल्ले जाते. 
 
विशेषतः तरुण-तरुणी या सणाची आतुरतेने वाट बघत असतात. कारण या दिवशी त्यांचे विवाह ठरणार असतात. कुलदेवतेचा आशीर्वाद घेतल्याशिवाय विवाह करणे ते अपशकून मानतात. या निमित्ताने मोठ्या संख्येने मुले-मुली पारंपरिक वेषभूषेत आलेले असतात. या प्रसंगी प्रत्येकजण आपल्या आवडीने जोडीदार पसंत करतात. या क्षणी मुलगा मुलीला मागणी घालतो. मुलाने दिलेला पानाचा विडा मुलीने स्वीकारला आणि त्याला गुलाल लावू दिला तर ती मुलगी त्या मुलाशी लग्न करण्यास तयार आहे हे गृहीत धरले जाते. त्या रात्री ते दोघेही जण अज्ञात ठिकाणी पळून जातात. त्या ठिकाणी ते चार ते पाच दिवस राहतात. त्यानंतर मुलीच्या माहेरी परत येतात. तिथे समाज पंच ठरवतील तेवढी रक्कम मुलाला मुलीच्या आई-वडिलांना द्यावी लागते. त्याला झगडा असे म्हणतात. ती रक्कम कमीत कमी साडे तेरा हजार रुपये असावी अशी पद्धत आहे. समाज पंचांनी ठरवून दिलेली रक्कम जर मुलाने मुलीच्या आई-वडिलांना दिली तर लग्न निश्चित करून त्यांचे लग्न लावून दिले जाते. आदिवासी समाज आजही मागासलेला समजला जातो. तरीही ते मुला-मुलींना आपल्या आवडीचे जोडीदार निवडू देण्यास प्राधान्य देतात. मात्र आपल्या पांढरपेशा समाजात आजही तरुणांना त्यांच्या पसंतीने जोडीदार निवडू दिले जात नाही. आदिवासींकडून आपण हे नक्कीच शिकायला हवे.
 
माळव्यातील भगोरीया 
मध्यप्रदेशातील माळवा भागातल्या आदिवासी भागातही होळी अशीच साजरी केली जाते. हा उत्सव या भागात भगोरिया नावाने ओळखला जातो. या उत्सवासाठी आदिवासी लोक सजून धजून येत असतात. भगोरियाचा शाब्दिक अर्थ आहे, पळून जाऊन लग्न करणे. येथेही मुला-मुलींनी जोडीदार निवडण्याची पद्धत वरीलप्रमाणेच आहे. पूर्वी या उत्सवाच्या वेळी बरीच भांडणे, मारपीट व्हायची. मात्र आता प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेमुळे काही वर्षांपासून कोणतीच अनुचित घटना घडलेली नाही. 
 
भगोरीया आणि आधुनिकता 
भगोरीया बाजारातही आता आधुनिकता अवतरली आहे. मुले चांदीच्या दागिन्यांसोबतच मोबाईल बाळगताना दिसतात. ताडी आणि मोहाच्या दारूची जागा आता विदेशी दारूने घेतली आहे. त्याप्रमाणे लस्सी-लिंबूपाण्याऐवजी कोल्ड ड्रिंक दिसते. आदिवासी युवक नृत्य करताना काळा गॉगल घालतात तर तरुणी देखील आधुनिक रंगात रंगलेल्या दिसतात. 
 
शिकलेली तरुण पिढी भगोरियात सामील होताना दिसत नाही. त्यामुळे भगोरिया दरम्यान होणार्‍या लग्नांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आधुनिकतेच्या रेट्यात ही परंपरा लोप होणार तर नाही ना ही भीती आदिवासी बांधवांना सतावते आहे. 
 
तुमच्या भागात होळी कशी साजरी करतात? ते इथे जरूर लिहा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

होळी खेळण्यापूर्वी केवळ हे एक काम करा, जीवनात रस भरेल