Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फिल्मी होळी ....

filmi holi
होळीचे रंग म्हणजे आयुष्यातील इंद्रधनुच.. आयुष्य रंगीबेरंगी कसे करावे, हे शिकवणारा सण.. त्या सणाविषयी कलाकारांना काय वाटते..? ते हा सण कसा साजरा करतात..? त्यांच्या भावना जाणून घेण्याचा हा प्रयत्न..



शिल्पा शिरोडकर : 'एक मुठ्ठी आसमान'मधील कमलाबाई
 
लग्नानंतर लंडनमध्ये राहताना मला होळी साजरी करण्याची फारच आठवण यायची; पण आता मी भारतात परत आले आहे. मी माझ्या सर्व नातेवाईकांना भेटणार आहे आणि माझ्या लहानपणच्या दोस्तांसोबत होळी खेळणार आहे. लहानपणीच्या होळीच्या अशा खूप छान आठवणी आहेत माझ्या. घरी गुजियासुद्धा बनवणार आहे. माझ्या नवर्‍याला त्या फार आवडतात. सेटवरही सगळ्यांसाठी घेऊन जाण्याचा माझा प्लान आहे. सर्वांना होळीच्या शुभेच्छा. 
 
परिधी शर्मा : 'जोधा अकबर'मधील जोधा
 
एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की स्त्रियांच्या सुरक्षिततेबाबत आपण काहीतरी करायला हवं. होळीच्या वेळेस छेडछाडीच्या अनेक घटना होत असतात. त्यामुळे लोकांनी जागरूक राहून अशा घटना होत असतील तर त्याची तक्रार नोंदवायला हवी. काही लोकांना होळी खेळायला आवडत नाही आणि अशा लोकांना फोर्स करणे बरोबर नाही. मी तुम्हा सर्वांना सुरक्षित होळीच्या शुभेच्छा देते.

कांची सिंग : 'और प्यार हो गया' मधील अवनी
 
यावर्षी मी माझा ऑनस्क्रीन मोठा भाऊ अक्षतच्या लग्नाच्या शूटिंगमध्ये असेन त्यामुळे घरच्यांसोबत कदाचित वेळ घालवता येणार नाही; पण आम्ही सेटवर सेलिबेट्र करू. आमच्याकडे दरवर्षी होळीला पांढर्‍या रंगाचे कपडे घेतात. लहान असताना माझ्या बाबांनी शुभ्र पांढरा कुडता आणला होता आणि होळीच्या आदल्या रात्री मी त्यावर रंग टाकला. ते पाहून दुसर्‍या दिवशी माझे बाबा माझ्यावर फार रागावले होते. मी माझी चूक मान्य करेपर्यंत ते पूजेला आले नाहीत.

रूपल त्यागी : 'सपनें सुहाने लडकपन के' मधील गुंजन
 
होळीचे रंग आपल्यासोबत आनंद, खट्याळपणा आणि उत्साहाच्या छटा आणतात. आपल्या हृदयाच्या जवळ असलेल्यांवर रंग उधळण्याची मजा काही और असते. या सणाच्या निमित्ताने आपल्यातली सगळी नकारात्मकता, भेदभाव आणि समाजातील जुने बुरसटलेले विचार दूर व्हावेत. जबाबदार नागरिक म्हणून आपण पाण्याचा अपव्यय टाळून ऑर्गेनिक रंग वापरायला हवेत. मी सर्वांना रंगीबेरंगी आणि सुरक्षित होळीच्या शुभेच्छा देते.

अरहान बहल : 'दो दिल बंधे एक डोरी से' मधील रघु
 
मी आणि माझे मित्र एकत्र भेटून होळी खेळल्याला आता बराच काळ लोटला आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना आम्ही एखाद्या मित्राच्या घरी आदल्या रात्री जायचो आणि आमच्या कॉलेज हॉस्टेलमध्ये राहणार्‍या सुमारे ५0 मित्रांवर होळी अँटॅक करण्याची तयारी करायचो. ते दिवस खूप आठवतात. या वर्षी 'दो दिल बंधे एक डोरी से'च्या सर्व कलाकारांसोबत मी होळी साजरी करणार आहे. तुम्हांला सर्वांना होळीच्या शुभेच्छा.

मानसी श्रीवास्तव : 'दो दिल बंधे एक डोरी से' मधील शिवानी
 
मला होळी हा सण अतिशय आवडतो कारण मला माझ्या अख्ख्या परिवारासोबत राहायला मिळते, रंगांसोबत खेळायला मिळते आणि होळीच्या वेळी बनवले जाणारे गोड पदार्थ खायला मिळतात. लहान असतानाच्या होळीच्या खूप छान आठवणी आहेत माझ्या. आम्ही येणार्‍या जाणार्‍यांवर पाण्याचे फुगे मारायचो आणि सर्वांना भिजवून टाकायचो. यावर्षी आम्ही पाण्याचा अपव्यय करणार नाही, सुरक्षित रंगांनी खेळू आणि टीव्ही बघू. झी टीव्हीच्या होळी स्पेशल एपिसोडमध्ये माझा परफॉर्मन्स आहे.

राकेश वशिष्ठ : 'कबूल है'मधील असद अहमद खान
 
आमच्या घरी येणार्‍या पाहुण्यांसाठी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात ही गोष्ट मला सणांच्या वेळेस सर्वाधिक आवडते. मला गोड फार आवडतं आणि गुजिया तर माझ्या अतिशय आवडत्या आहेत. लहानपणी दरवर्षी होळीच्या वेळेस मी आमच्या स्वयंपाकघरातून गुजिया चोरून माझ्या कपाटात ठेवत असे. सेटवरही इतर सगळे शूटिंगमध्ये व्यस्त असताना मी काही ना काही गोड खात असतो. यावर्षी आम्ही होळीच्या दिवशी 'कबूल है'च्या शूटिंगमध्ये असू; पण तरीही मी सेटवर रंग घेऊन जाईन आणि शूटिंगनंतर होळीचा सण आम्ही सेलिब्रेट करू.

सुरभी ज्योती : 'कबूल है'मधील झोया अहमद
 
लहानपणी आम्ही होळीच्या वेळेला आमच्या गच्चीवर जाऊन एकमेकांवर रंग उडवायचो. तेव्हा आम्ही पाणी फुकट घालवतोय वगैरे आमच्या लक्षातही आलं नाही; पण आता मात्र एक जबाबदार नागरिक म्हणून मला वाटतं सर्वांनी पाण्याचा होणारा अपव्यय थांबवायला पाहिजे आणि नैसर्गिक गुलालाचा वापर करायला हवा, म्हणजे त्वचेवर त्याचा परिणाम होणार नाही. मी सर्वांना होळीच्या शुभेच्छा देते.

मिश्कत वर्मा : 'और प्यार हो गया' मधील राज आपले प्रेम व्यक्त करण्याचा होळी ही उत्तम वेळ आहे. जर तुमच्या भावना कोणी दुखावल्या असतील तर त्यावर रंग उधळून लावा. हा प्रेमाचा सण आहे, केवळ पिचकारीने एकमेकांवर रंग आणि पाणी उडवण्याचा नाही. सर्वांच्या आयुष्यात रंगांच्या वेगवेगळ्या छटा येवोत. रंगांनी भरलेली होळी खेळा.

Share this Story:

Follow Webdunia marathi