Article Hollywood Marathi %e0%a4%ab%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0 %e0%a4%a4%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a6%e0%a4%a8 %e0%a4%ac%e0%a5%89%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a5%81%e0%a4%a1 %e0%a4%aa%e0%a4%9f 110120900014_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फास्टर - तद्दन बॉलीवुड पट

- चंद्रकांत शिंदे

फास्टर तद्दन बॉलीवुड पट
WD
आजपर्यंत आपण बॉलीवुड हॉलीवुडची नक्कल करीत असल्याचे ऐकत आणि वाचत आलो आहोत. हॉलीवुडकरांना आपल्या चित्रपटांचा प्रचंड अभिमान असल्याने आपल्या नाचगाण्याच्या चित्रपटांची ते टिंगल टवाळी करतात. परंतु गेल्या काही वर्षांतील हॉलीवुडचे चित्रपट पाहिले तर जाणवते की त्यांच्यावर आता बॉलीवुडचा प्रभाव पडू लागलेला आहे. शुक्रवारी प्रदर्शित होत असलेला फास्टर हासुद्धा तद्दन एखाद्या एक्शनपॅक्ड बॉलीवुडपटासारखाच आहे. चित्रपटाच्या शेवटी नायक आपल्या मारल्या गेलेल्या भावाची राख पाण्यात सोडतो. बॉलीवुडमध्ये आपण हे दृश्य अनेक वेळा पाहिले आहे पण हॉलीवुडपटात हे दृश्य प्रथमच पहायला मिळाले. हॉलीवुडवर बॉलीवुडपटाचा किती प्रभाव आहे हे दाखवण्यासाठी हे एक उदाहरण पुरेसे आहे.

गाडी चालवण्यात एक्सपर्ट असलेला ड्वेन जॉन्सन दहा वर्षांनंतर जेलमधून सुटतो. बँकेवर दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केलेली असते. जेलमधून सुटल्यानंतर त्याचे एकमेव ध्येय असते आणि ते म्हणजे आपल्या भावाच्या मारेकर्‍यांना संपवणे. मारेकर्‍यांची यादी आणि त्यांचे पत्ते घेऊन ड्वेन गाडी घेऊन निघतो. यादीतील एकेकाला तो शोधून ठार मारू लागतो. त्याचवेळेस ड्वेनला मारण्याची सुपारी एका निष्णात सुपारी किलर (ऑलिवर जॅकसन-कोहेन) ला देण्यात येते. ड्वेनला शोधण्यासाठी निवृत्तीकडे आलेला पोलीस अधिकारी (बिली बॉब थॉरनटन) मोहिम आखतो. ड्वेनला एकीकडे आपल्या भावाच्या मारेकर्‍यांना यमसदनी पाठवायचे असते त्याचवेळेस पोलीस अधिकारी आणि सुपारी किलरचाही सामना करावा लागतो. भावाच्या काही मारेकर्‍यांना मारताना त्यांचे कुटुंबिय पाहून ड्वेनला पाझरही फुटतो आणि तो त्यांना सोडून देतो. ड्वेन सगळ्यांना मारतो परंतु त्याची सुपारी देणारा कोण आहे हे त्याला ठाउक नसते. ड्वेनची सुपारी देणार्‍यानेच ड्वेनच्या डोक्यात गोळी मारलेली असते. शेवटी त्याचा शोध लागतो आणि ड्वेन आपल्या भावाच्या मारेकर्‍यांना मारून आपला सूड पूर्ण करतो. सूड पूर्ण झाल्यानंतर तो गाडीतून मडके काढतो आणि नदीच्या पात्रात भावाची राख सोडतो आणि चित्रपट संपतो.

ड्वेन जॉनसन ने आपल्या बलदंड शरीरयष्टीचा पूरेपूर वापर करीत उत्कृष्ट भूमिका सादर केली आहे. एकेकाळचा डब्ल्यूडब्ल्यूएफ पैलवान असलेला ड्वेन द रॉक नावाने चांगलाच लोकप्रिय आहे. ड्वेनचा वॉकिंग टॉल चित्रपटही चांगलाच लोकप्रिय झाला होता. रनडाऊन, स्कॉर्पियन किंग, डूम हे त्याचे आणखी काही गाजलेले चित्रपट. ड्वेनला बिली बॉब आणि ऑलिवर जॅकसन यांनी चांगली साथ दिली आहे.

दिग्दर्शक जॉर्ज टिलमन ज्युनियरने चित्रपटाचा वेग चांगला राखला आहे. मध्ये-मध्ये चित्रपट रेंगाळतो परंतु ते खटकत नाही. चित्रपट पहाताना सतत एखाद्या हिंदी चित्रपटाचीच आठवण येत राहाते. सुपारी किलरची प्रेयसी त्याला वाईट कामे सोडून द्यायला सांगत असते. तिच्याच सांगण्यावरून तो तिच्याशी लग्नही करतो. आणि शेवटी वाईट कामे सोडूनही देतो. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. चांगला हिंदी चित्रपट नसेल तर फास्टर बघायला हरकत नाही. मसाला हिंदी चित्रपट पाहिल्याचे पूरेपूर समाधान फास्टर देईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi