‘माय नेम इज बाँड.. जेम्स बाँड’ असे म्हणत दर्शकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्या जेम्स बाँडबद्दल एक मनोरंजक माहिती समोर आली आहे. बाँड हा मद्यपि होता आणि मद्याच्या आहारी गेल्यानेच साठी उलटण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला, असा निष्कर्ष एका नव्या अभ्यासातून काढण्यात आला आहे. जेम्स बाँड हा ‘मार्टिनी’ (मद्याचा एक प्रकार) पित असे. मात्र, तो मार्टिनी हलवून पित असे, ढवळून नाही. ‘शेकन, नॉट स्टर्ड’ असे त्याचे प्रसिद्ध वाक्य आपण त्याच्या सिनेमातून ऐकले आहे. त्याचे कारण शोधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. तेव्हा तो एवढा मद्य प्राशन करीत असे, की त्याच्या हातात ढवळण्याएवढी ताकद राहात नसे, असे संशोधकांनी म्हटले आहे. तो प्रमाणापेक्षा किमान चारपट अधिक मद्य प्राशन करीत असे. त्यामुळे त्याला सोरायसिस, नपुंसकत्व, झटके यांसारख्या अनुषंगिक रोगांसह अकाली मृत्यूचा धोका अधिक होता.
बाँडची पुस्तके वाचताना तो अतिमद्यपान करीत असल्याचे डॉ. पॅट्रिक डेव्हिस आणि त्यांच्या सहकार्यांच्या लक्षात आले. एवढे मद्यपान करूनही तो सर्वच क्षेत्रांत एवढी अचाट कामगिरी कसा करू शकत होता, असा प्रश्न त्यांना पडला. त्यानंतर त्यांनी संशोधनाला सुरुवात केली. बाँडची 14 पुस्तके सहा महिन्यांच्या कालावधीत वाचण्यात आली. वाचताना त्याच्या नोट्स काढण्यात आल्या. त्याने घेतलेल्या मद्यासंबंधात निरीक्षण नोंदविण्यात आले. तेव्हा तो प्रति आठवडा 92 युनिट्स म्हणजे प्रमाणापेक्षा चारपट अधिक मद्यपान करीत असल्याचे दिसून आले.