Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लालबहादुर शास्त्री

लालबहादुर शास्त्री
जन्म: २ ऑक्टोबर, १९०४
मृत्यू: ११ जानेवारी, १९६

भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री म्हणजे साधेपणा आणि महानतेची प्रतिकृती होते. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग प्रेरणादायी आहेत. ते देशाचे पंतप्रधान असतानाची गोष्ट आहे. एका दिवशी ते कापड गिरणी पाहण्यासाठी गेले. त्यांच्याबरोबर गिरणीचा मालक, उच्च अधिकारी व इतर महत्त्वाचे लोक होते. गिरणी पाहिल्यानंतर शास्त्रीजी गिरणीच्या गुदामात गेल्यानंतर त्यांनी साड्या दाखवायला सांगितले. गिरणी मालक आणि अधिकार्‍याने एकापेक्षा एक सुंदर साड्या त्यांना दाखवल्या. शास्त्रीजी साड्या पाहून म्हणाले,' साड्या तर खूप सुंदर आहेत, यांची किंमत काय आहे?'

' ही साडी ८०० रूपयांची आहे आणि हिची किंमत एक हजार रुपये आहे,' गिरणी मालकाने सांगितले. ही तर खूप महाग आहे, मला कमी किमतीच्या साड्या दाखवा, शास्त्रीजी म्हणाले. ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट होती की ही घटना १९६५ ची होती, यावेळी एक हजार रुपयांची किंमत खूप होती.

'बरं, ही पाहा. ही साडी पाचशे रुपयांची आहे आणि ही चारशे रुपयांची,' गिरणी मालक दुसर्‍या साड्या दाखवत म्हणाला. 'अरे बाबा, यादेखिल खूप महाग आहेत. माझ्या सारख्या गरीबासाठी कमी किमतीच्या साड्या दाखवा, ज्या मी खरेदी करू शकेल,' शास्त्रीजी म्हणाले. ' वा सरकार, आपण तर आमचे पंतप्रधान आहात, तुम्हाला गरीब कसे म्हणता येईल? आम्ही तर या साड्या तुम्हाला भेट देत आहोत,' गिरणी मालक बोलला.

' नाही बाबा, मी भेट घेऊ शकत नाही', शास्त्रीजी म्हणाले. यावर तो गिरणी मालक अधिकाराने म्हणाला की, 'आम्ही आमच्या
पंतप्रधानांना भेट देणे, हा आमचा अधिकार आहे.'

' हो, मी पंतप्रधान आहे,' शास्त्रीजी शांतपणे म्हणाले.' परंतु, याचा अर्थ असा नाही की ज्या वस्तू मी खरेदी करू शकत नाही त्या वस्तू मी भेट म्हणून स्वीकारू आणि आपल्या पत्नीला देऊ. बाबा, मी पंतप्रधान असलो तरी आहे गरीबच ना. तुम्ही मला स्वस्त साड्याच दाखवा. मी ऐपतीप्रमाणेच साडी खरेदी करेन.'

गिरणी मालकाच्या सार्‍या विनवण्या व्यर्थ गेल्या. देशाच्या पंतप्रधानांनी स्वस्त भावाच्या साड्याच खरेदी केल्या. शास्त्रीजी एवढे महान होते की मोह त्यांना स्पर्शही करू शकत नव्हता.

Share this Story:

Follow Webdunia marathi