15 ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्यदिन म्हणून आपण साजरा करतो. 1947 साली भारतभूमी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाली. भारताच्या स्वातंत्र्याला आता पासष्ट वर्षे उलटून गेली आहेत. परंतु अजूनही आपणास स्वातंत्र्याचा खरा अर्थ कळला असे म्हणणे धाडसाचेच ठरेल. पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी हे दोन दिवस भारतीय नागरिकांसाठी राष्ट्रीय सण आहेत. भारत आज एक प्रबळ प्रजासत्ताक म्हणून जगामध्ये दमदारपणे वाटचाल करताना दिसते. स्वातंत्र्य मिळण्यासाठी असंख्य हुतात्म्यांची आहुती पडली, अनेक क्रांतिकारक फासावर गेले तेव्हा भारतीयांना स्वातंत्र्याचा प्रकाश दिसू शकला आहे. परंतु स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या देशभक्तांच्या बलिदानाची आज कुणालाच फिकीर नाही याचा अनुभव वारंवार येतो. राजकीय सत्ता व त्या माध्यमातून मिळणारी अफाट संपत्ती जमा करण्याकडेच राजकारणी मंडळी लक्ष ठेवून आहेत.
स्वातंत्र्यदिनदिवशी तिरंगा ध्वजापुढे अभिवादन केले की आपली इतिकर्तव्यता संपली अशी मनोधारणा झालेल्या पुढार्यांचे काय करणार? लोकशाहीमध्ये जनता हीच खरी मालक असते, हेच हे राजकारणी विसरत चालले आहेत. देशावर प्रेम करणे म्हणजे भ्रष्टाचार न करणे, हिंसाचार न करणे, प्रामाणिक वागणे या गोष्टी मनावर ठसणे आवश्यक असताना आजच्या काळात देशभक्तीचीच तीव्र टंचाई निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या देशावर सदासर्वकाळ प्रेम केले पाहिजे. देशावर प्रेम म्हणजेच येथील परंपरा, संस्कार आणि सर्वसामान्य लोकांवरही प्रेम करणे आलेच.