Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेहरूंनी १७ वेळा फडकवला तिरंगा!

नेहरूंनी १७ वेळा फडकवला तिरंगा!
PIB
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गेल्या सहा दशकांमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करताना दिल्लीतील लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवण्याचा विक्रम भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावावर आहे. त्यांनी तब्बल १७ वेळा लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. कणखर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेल्या इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या पाठोपाठ १६ वेळा लाल किल्ल्यावरून तिरंगा फडकवला. पं. जवाहरलाल नेहरू यांनी देश स्वतंत्र झाल्यावर पहिल्यांदा १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. २७ मे १९६४ पर्यंत ते पंतप्रधान होते. या कालावधीत त्यांनी १७ स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केले. गुलझारीलाल नंदा आणि चंद्रशेखर या नेत्यांचे दूर्दैव म्हणजे हे दोघेही भारताचे पंतप्रधान तर झाले, मात्र त्यांना स्वातंत्र्यदिनाला ध्वजारोहण करण्याची संधीच प्राप्त झाली नाही. नेहरू यांचे निधन झाल्यावर २७ मे १९६४ रोजी गुलझारीलाल नंदा पंतप्रधान झाले. मात्र, १५ ऑगस्टपूर्वी ९ जून १९६४ रोजी त्यांनी हे पद सोडले. त्यांची जागा लाल बहादूर शास्त्री यांनी घेतली. यानंतर गुलझारीलाल नंदा यांनी १९६६ मध्ये केवळ ११ ते २४ जानेवारी या १३ दिवसांत पंतप्रधानपद सांभाळले होते.

त्यांच्याप्रमाणे चंद्रशेखर १० नोव्हेंबर १९९० रोजी पंतप्रधान झाले. मात्र, २१ जून १९९१ रोजी त्यांना पंतप्रधानपद सोडावे लागले. लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर नंदा काही दिवस पंतप्रधानपदावर होते. यानंतर २४ जानेवारी १९६६ रोजी इंदिरा गांधी यांनी सत्तेची सूत्र सांभाळली. नेहरू यांच्यानंतर सर्वाधिक वेळा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्याचा मान इंदिरा गांधी यांनी पटकवला आहे.

इंदिरा गांधी १९६६ ते २४ मार्च १९७७ पर्यंत आणि १४ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर १९८४ पर्यंत भारताच्या पंतप्रधान होत्या. पहिल्या कार्यकाळात त्यांनी ११ वेळा तर दुसर्‍या कार्यकाळात ५ वेळा ध्वजारोहण केले. २८ जुलै १९७९ ते १४ जानेवारी १९८९ या कालावधीत पंतप्रधान असलेले चौधरी चरणसिंग यांनी एक वेळा ध्वजारोहण केले. त्यांच्याप्रमाणे २ डिसेंबर १९८९ ते १० नोव्हेंबर १९९० या कालावधीत पंतप्रधान असलेले विश्वनाथ प्रतापसिंग यांनी एकदा, १ जून १९९६ ते २१ जुलै १९९७ या कालावधीतील पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी एकदा आणि २१ एप्रिल १९९७ ते २८ नोव्हेंबर १९९७ या कालावधीतील पंतप्रधान आय.के. गुजराल यांनी एकदा लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण केले.

लाल बहादूर शास्त्री आणि मोरारजी देसाई यांनी दोन वेळा ध्वजारोहण केले. स्वातंत्र्यदिनाला ५ वेळा किंवा त्यापेक्षा अधिक ध्वजारोहण करण्याची संधी राजीव गांधी, पी.व्ही. नरसिंहराव, अटलबिहारी वाजपेयी आणि वर्तमान पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग यांना मिळाली आहे. राजीव गांधी यांनी ३१ ऑक्टोबर १९८४ ते १ डिसेंबर १९८९ पर्यंत आणि नरसिंहराव २१ जून १९९१ ते १० मे १९९६ पर्यंत पंतप्रधानपदावर होते. या दोन्ही नेत्यांना प्रत्येकी ५ वेळा ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली.

रालोआचे नेतृत्व केलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांनी १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत सत्तेची सूत्र सांभाळली या कालावधीत त्यांनी ६ वेळा ध्वजारोहण केले. यापूर्वी ते १ जून १९९६ साली पंतप्रधान झाले; परंतु २१ एप्रिल १९९७ रोजी त्यांचे सरकार कोसळले. २००४ साली रालोआचा पराभव करून संपुआ सत्तेत आली व २२ मे २००४ रोजी डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तेव्हापासून पाच वेळा त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. आज ६३ वा स्वातंत्रदिन पंतप्रधान डॉ.मनमोहनसिंग सहाव्यांदा ध्वजारोहण करून राष्ट्राला उद्देशून भाषण केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi