नुकतेच पंख फ़ुटलेले ते पाखरू आभाळात विहरतांना स्वत:शीच म्हणाले, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?
त्याची नजर खाली असलेल्या एका मुलाकडे गेली, त्याने मुलास विचारले, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?
खपाटीला गेलेल्या पोटावरून हात फ़िरवत मुलगा म्हणाला, दोन वेळचं पोटभर जेवण म्हणजे स्वातंत्र्य, मित्रा. पाखराचं समाधान झालं नाही. ते जवळच्या झाडावर जाऊन बसलं. तोच त्याच्या शेजारी एक पाखरू येवून बसलं. आपल्या पाखराने या दुसरया पाखराला विचारलं, स्वातंत्र्य म्हणजे काय बरे?
दुसरं पाखरू म्हणालं, चल तुला दाखवतो, स्वातंत्र्य म्हणजे काय ते.
दोघेही उडाले, पेरूच्या बागेत आले. दुसर्या पाखराने एका पेरूवर झेप घेवून, चोचीत मावेल तेवढा तुकडा तोडला, तोच राखणदार त्यांना मारायला धावला. चपळाईने दोघे भुर्रकन उडाले, त्याच झाडावर येऊन बसला.
दुसरं पाखरू गर्वाने हसत पहिल्याला म्हणालं, आपल्याला हवं ते, हवं तेव्हा मिळवता येणं, म्हणजे स्वातंत्र्य.
पहिल्या पाखराला हेही उत्तर पटलं नाही. ते पुन्हा उडालं, आणि दुसऱ्या झाडावर जाऊन बसलं.
त्या झाडाला नुकतच एक फळ आलं होतं. भुकेल्या पाखराने फळावर झेप घेतली, ते आता खाणार इतक्यात खाली उभ्या त्या भुकेल्या मुलाकडे त्याचे लक्ष गेले, क्षणार्धात पाखराने मुलाच्या दिशेने झेप घेतली, आणि चोचीतले फळ त्याच्या हातात टाकले.
पाखराने आता आभाळात उंच भरारी घेतली. मोकळी हवा छातीत भरून घेतली आणि त्या अथांग निळाईत स्वत:ला झोकून दिले.
स्वातंत्र्याचा अर्थ कुणाला विचारायची गरज आता त्याला राहिली नव्हती.