भारताविरूद्ध युद्ध झाल्यास पाकिस्तानी सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढण्याचे तालिबानी अतिरेक्यांनी जाहीर केल्यानंतर आता उलेमांनीही त्यांच्या सूरात सूर मिसळला आहे. भारताने युद्ध लादल्यास आम्ही तुमच्या पाठिशी असून असे त्यांना पाकिस्तानी सैन्याला सांगितले आहे.
उलेमांची संघटना असलेल्या रूयत ए हिलाल समितीचे अध्यक्ष मुफ्ती मुनीबुर रहमान, भारताने लादलेल्या या युद्धातून रक्त आणि विध्वंसाशिवाय काहीही निष्पन्न होणार नाही, असा आगाऊ निष्कर्ष काढूनही मोकळे झाले आहेत. भारताने असे कोणतेही पाऊल उचलू नये यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ व जागतिक समुदायाने दबाव आणावा असे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुस्लिमांमधील विविध पंथीय उलेमांनी आज पाकिस्तानी सरकारचे गृह सल्लागार रहमान मलिक यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुनीब यांनी पाकिस्तान गेल्या दशकापासून दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरला आहे, असे सांगून आगामी काळात सर्व पंथीयांमध्ये सौहार्द पाळण्याचे आवाहन त्यांनी उलेमांना केले.
दरम्यान, बेनझीर भुट्टो यांना मारल्याचा आरोप असलेल्या बैतुल्ला मसूद या पाकिस्तानी तालिबानी नेत्याने युद्ध झाल्यास पाकिस्तानला पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. भारताने युद्ध लादल्यास आमचे हजारो सशस्त्र अतिरेकी व आत्मघाती पथके सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैन्याच्या खांद्याला खांदा लावून लढतील, अशी दर्पोक्ती त्याने केली.