Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे धाव

पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय समुदायाकडे धाव
इस्लामाबाद , बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:47 IST)
आपल्याच भूमीत थारा दिलेल्या दहशतवाद्यांविरूद्ध कारवाई करण्यास अनुत्सुक असलेल्या पाकिस्तानने आता या प्रश्नावरून भारताशी निर्माण झालेला तणाव निवळावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे मध्यस्थीसाठी धाव घेतली आहे. भारताने लष्करी कारवाई करण्यापूर्वी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू केले असताना पाकही तोच मार्ग चोखाळत आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सलमान बशीर यांनी अमेरिका, रशिया, जर्मनी, इराण, जपान यांच्या राजदूतांची तसेच ब्रिटन व भारताच्या उच्चायुक्तांची भेट घेऊन तणाव निवळण्यासाठी प्रयत्नांचे आवाहन केले. मुंबई हल्ल्याला जबाबदार असणार्‍या जमात उद दवावर संयुक्त राष्ट्रसंघाने बंदी घातल्यानंतर तातडीने आम्ही या संघटनेच्या आणि तिच्या नेत्यांच्या मुसक्या कशा आवळल्या हे बशीर यांनी या सर्व देशांच्या प्रतिनिधींना सांगितले.

उभय देशांचे सध्या ताणलेले संबंध निवळण्यासाठी या देशांनी हस्तक्षेप करावा असे आवाहनही त्यांनी केले. शिवाय युद्ध हे कोणत्याही देशाच्या हिताचे नाही, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

विशेष म्हणजे बशीर यांनी भारतीय उच्चायुक्त सत्यव्रत पाल यांचीही भेट घेतली. उभय देशातील तणाव निवळण्यासाठी राजनैतिक स्तरावरील चर्चा पुन्हा सुरू करण्याची विनंतीही त्यांनी केली.

मुंबईवरील हल्ल्यात पाकिस्तानी नागरिक सहभागी असल्याचे पुरावे दिल्यास या प्रकरणाच्या तपासात आपला देश भारताला सर्वतोपरी सहकार्य करेल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत. गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीत घाईगडबड टाळण्याचा सल्ला देऊन पाकिस्तानी पोलिस यंत्रणेला भारताने त्वरीत सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi