Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उच्चशिक्षित युवकही दहशतवादाकडे

उच्चशिक्षित युवकही दहशतवादाकडे

वेबदुनिया

, बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:09 IST)
पाकिस्तानातून कारवाया करणारी लष्कर ए तोयबा आता आपला 'बेस' वाढविण्याच्या प्रयत्नात गुंतली आहे. त्यासाठी युवकांची मोठ्या प्रमाणात भरती केली जात असून हे युवकही उच्चशिक्षित आहेत.

वॉशिंग्टन टाईम्सने ब्रिगेडियर जनरल महमूद शहा या पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. तोयबामध्ये भरती होणार्‍या युवकांमध्ये मोठा बदल शहा यांना दिसला आहे. त्यांच्या मते पूर्वी अफगाणिस्तान सीमेलगतचे युवक या संघटनेत सामील होत होते. आता मात्र, पूर्ण पाकिस्तानमधून युवक या संघटनेत सामील होताना दिसत आहेत. श्री. शहा हे बराच काळ अफगाणिस्तान सीमेवर तैनात होते. त्यामुळे त्यांच्या मताला महत्त्व आहे.


दक्षिण पंजाबमधून मोठ्या प्रमाणात युवक दहशतवादाकडे वळले आहेत. वास्तविक हा भाग पाकिस्तानमधील समृद्ध प्रांत असून तेथे शिक्षणाची व्यवस्थाही चांगली आहे. असे असूनही हे उच्चशिक्षितही आहेत.

मुंबईत झालेल्या हल्ल्यातील आरोपी अजमल कसाब फक्त चौथी पास असला तरीही इतर काही आरोपी मात्र, एमबीए व कम्प्युटर सायन्सची पदवी घेतलेले आहेत, असे एका लष्करच्या कमांडरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. हे उच्चशिक्षित युवक थेट दहशतवादी कारवायात सहभागी नसले तरी आमचा संदेश पोहोचविण्यासह इतर महत्त्वाची अनेक कामे करतात, असेही या कमांडरने सांगितले.

लाहोरमधील एका धार्मिक संघटनेच्या कार्यकर्त्याने तरूणांनी दहशतवादाकडे वळण्याला पाकिस्तानी अर्थव्यवस्थेला जबाबदार धरले. शिक्षण घेऊनही बेरोजगारी असल्याने हे तरूण शस्त्रे उचलत असल्याचे मत त्याने नोंदवले. कुटुंबातील एका सदस्याला 'जिहाद'साठी पाठवले तर कुटुंबातील एकाची जबाबदारी तरी कमी होते, अशी अनेकांची धारणा असल्याचे त्याने सांगितले.

मुंबई हल्ल्यानंतर सरकारने तोयबाच्या अतिरेक्यांवर कारवाईचे सत्र आरंभले असले तरीही आजही पाकव्याप्त काश्मीरमधील अनेक तरूण दहशतवादी बनत असल्याचेही निदर्शनाला आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi