दहशतवादांविरोधात लढाईची भाषा करणारा पाकिस्तान दुतोंडी असल्याचेच आता स्पष्ट होत आहे. दहशतवादविरोधी लढाईत अमेरिकेला साथ देणार्या पाकिस्तानने आता तालिबानी अतिरेक्यांविरोधातील लक्ष कमी केले असून सारी ताकद भारतीय सीमेवर लावली आहे. अफगाण सीमेवरील बरेचसे सैन्य भारताला लागून असलेल्या सीमेवर हलविले आहे.
अफगाणिस्तानला लागून असलेल्या स्वात व बाजौर या भागात अतिरेक्यांवरील हवाई हल्ले मोठ्या प्रमाणात कमी झाले असून येथील हवाई दलाच्या कर्मचार्यांना पूर्व सीमेवर हलविले आहे, असे वृत्त बीबीसीने वरिष्ठ पाकिस्तानी लष्करी अधिकार्याच्या हवाल्याने दिले आहे.
भारताच्या हवाई दलातील लढाऊ जेट विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीत कथित घुसखोरी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे या अधिकार्याने सांगितले. लष्कर ए तोयबाच्या मुख्यालयावर हल्ले करण्याच्या दृष्टिकोनातून भारताच्या विमानांनी या भागात गस्त घातल्याचा पाकिस्तानचा कयास आहे.
खैबर परिसरातील अतिरेक्यांविरूद्ध सुरू असलेली पायदळाची मोहिमही पुढे ढकलण्यात आली आहे. आता त्यांना भारताच्या सीमेवर हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पाकिस्तानी लष्कर ढिले पडल्यानेच या भागात दडलेल्या अफगाणिस्तानात मदत घेऊन चाललेले नाटोचे डझनभर ट्रक अतिरेक्यांनी उडवले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदायाला याची कल्पना असल्याचे एका लष्करी अधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. येथून सुरू असलेल्या सैन्याच्या हालचालींना अन्य एका अधिकार्यानेही पुष्टी दिली.