Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सरकारी दडपशाहीमुळे ओबामांवरील विश्वास उडाला

सरकारी दडपशाहीमुळे ओबामांवरील विश्वास उडाला
, गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (12:27 IST)
अमेरिकेच्या मिसौरी प्रांतातील फर्गुसन शहरात कृष्णवर्णीय तरुणाच्या हत्येनंतर उसळलेला हिंसाचार अद्यापही शमलेला नाही. हिंसाचाराला आवर घालण्यासाठी नॅशनल गार्डची तुकडी तैनात करण्यात आली आहे. मात्र सरकारी दडपशाहीमुळे कृष्णवर्णीय नागरिकांचा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांवरील विश्वासही उडाला आहे. आणीबाणी, संचारबंदी आणि नॅशनल गार्डच्या तैनातीनंतरही हिंसाचार थांबलेला नाही.
 
दरम्यान, मायकेल ब्राऊन या तरुणावर गोळ्या झाडणारा गोरा पोलीस अधिकारी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. सोमवारी रात्रीपासून ते मंगळवार सकाळपर्यंत संतप्त निदर्शकांनी सोडावॉटरच्या बाटल्या, पेट्रोल बॉम्ब पोलिसांवर फेकले. प्रत्युत्तरात पोलीस व इतर सुरक्षा दलांनीही जमावाला काबूत आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडल्या. नॅशनल गार्डची कडक निगराणी सुरू असून या भागातून विमानांना अधिक उंचीवरून उड्डाण करण्यास सांगण्यात आले आहे. कृष्णवर्णीय तरुणांच्या हत्येच्या निषेधार्थ विविध राज्यांमधून कृष्णवर्णीयांसोबतच श्वेतवर्णीय नागरिकही फगरुसनला दाखल झाले आहेत. यापैकी 31 जणांना मंगळवारी अटक करण्यात आली. एका व्यक्तिच्या तर 12 पोलिसांनी मुसक्या आवळल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेचा एक छायाचित्रकार स्कॉट ऑलसन यालाही पोलिसांनी पकडून नेले. परिस्थिती गंभीर असल्याने फगरुसन फ्लोरेसेंटच्या सर्व शाळा आणखी आठवडाभर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिसौरीचे गव्हर्नर जे.निक्सन, ओबामा आणि संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस बान की मून यांनी लोकांना शांततेचे आवाहन केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi