Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हमासच्या हल्ल्यात 100 मृत्युमुखी आणि 985 जखमी, ओलीस नागरिक आणि सैनिकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू

हमासच्या हल्ल्यात 100 मृत्युमुखी आणि 985 जखमी, ओलीस नागरिक आणि सैनिकांना सोडवण्याचे प्रयत्न सुरू
, रविवार, 8 ऑक्टोबर 2023 (10:10 IST)
इस्रायलवर पॅलेस्टिनी कट्टरवादी गट हमासने रॉकेटने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत 100 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 985 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.
हा हल्ला करण्यासाठी अनेक सशस्त्र कट्टरवादी इस्रायलमध्ये घुसले आहेत आणि आता 22 जागांवर चकमक सुरू आहे. इस्रायल सैन्याने दिलेल्या माहितीनुसार दोन ठिकाणी ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
 
हमासने इस्रायलच्या सैनिकांना पकडल्याचा दावा केला आहे आणि त्यांना गाझापट्टीत घेऊन गेले आहेत. इस्रायलच्या लष्कराने याला दुजोरा दिला आहे की काही सैनिक आणि नागरिक ओलीस आहेत. मात्र त्यांचा ठोस आकडा सांगितलेला नाही.
 
तिकडे स्थानिक पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी सांगितलं की इस्रायलने उत्तरादाखल केलेल्या कारवाईत 198 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि एक हजार लोक जखमी झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे.
 
इस्रायलचे पंतप्रधान नेत्यान्याहू म्हणाले की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि सांगितलं की इस्रायलच्या आत्मसंरक्षणाला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे.
 
इस्रायलमध्ये भारताच्या दुतावासाने सुद्धा एक निवेदन जारी केलं आहे. “इस्रायल ची सध्याची परिस्थिती पाहता इस्रायलमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना विनंती आहे की त्यांनी सतर्क रहावं आणि स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशांचं पालन करावं.”
 
इस्रायलच्या सैन्याचं म्हणणं आहे की त्यांनी गाझापट्टीवर हल्ले सुरू केले आहेत. त्याबरोबरच राखीव सैन्य दलाला पाचारण करण्यात आलं आहे. हमासच्या 17 लष्करी तळांवर आणि चार मुख्यालयांवर त्यांनी हल्ले केले आहेत.
 
हल्ल्याची निंदा करताना अमेरिकेने म्हटलं, “कट्टरतावाद कोणत्याच अर्थाने न्यायसंगत नाही.”
 
अमेरिकेच्या नॅशनल सिक्युरिटी काऊंसिल च्या प्रवक्त्या एड्रियन वॉट्सन म्हणाल्या, “आम्ही इस्रायल सरकार आणि लोकांबरोबर ठामपणे उभे आहोत. या हल्ल्यात मारल्या गेलेल्या लोकांप्रती आम्ही शोकसंवेदना व्यक्त करतो.”
 
इस्लामी कट्टरवादी गट 'हमास'ने इस्रायलवर अचानक हल्ला करून देशात प्रवेश केला होता.
 
शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5 हजार रॉकेट्स डागण्यात आल्याचा हमास या इस्लामी कट्टरतावादी गटाने दावा केला.
 
या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे.
 
पॅलेस्टिनी कट्टरतावादी गट हमासने या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या हमास गटाची गाझावर सत्ता आहे.
 
इस्रायलच्या हवाई हल्ल्यात गाझा पट्टीत 198 जणांचा मृत्यू झाला असून हजाराहून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती स्थानिक पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आम्ही युद्धात असून आम्हीच जिंकू अशी प्रतिक्रिया दिली आहे.
 
रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नेत्यानाहू म्हणाले, आमच्या शत्रूला कळणारही नाही इतकी याची किंमत मोजावी लागेल.
 
इस्रायल 'युद्धाच्या तयारीत'
इस्रायल संरक्षण मंत्र्यांनी लष्करातील राखीव सैनिकांनाही तयार राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.
 
तर इस्रायली लष्कराने प्रत्युत्तरासाठी गाझा पट्टीवर ताबडतोब हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहे.
 
परिस्थितीचं मुल्यांकन करूनच आम्ही प्रतिहल्ला करू असा इस्रायलने इशारा दिला आहे.
 
इस्त्रायली लष्कराने सीमेजवळ राहणाऱ्या लोकांना घरातच राहण्यास सांगितले आहे.
या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंनी लष्करी अधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक बोलावली.
 
दरम्यान हा संघर्ष आणखी काही दिवस चालू शकतो, असं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलॉन यांनी इस्रायलमध्ये सध्या सामान्य परिस्थिती नसल्याचं सांगितलं आहे.
“ज्यू लोकांच्या सुटीच्या दिवशी इस्रायलवर गाझाकडून एकत्रित हल्ला झाला. हमासच्या दहशतवाद्यांची रॉकेट हल्ला केला आणि जमिनीवरून घुसखोरी केलीय. ही सामान्य परिस्थिती नाहीये. पण यात इस्रायचाच विजय होईल,” असं गिलॉन यांनी म्हटलं आहे.
 
'दक्षिण इस्रायलमध्ये रस्त्यावर गोळीबार'
इस्रायलमधील बीबीसी प्रतिनिधी योलांद नेल यांनी दिलेल्या माहितीनुसार :
 
शनिवारी पॅलेस्टिनी कट्टरतावादी दक्षिण इस्रायलच्या रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांवर गोळीबार करताना सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये दिसले.
 
हमासच्या कट्टरतावाद्यांनी शनिवारी सकाळी इस्रायलच्या सेडेरोट भागातील घरे ताब्यात घेतल्याचंही वृत्त आहे.
शनिवारच्या पहाटेपासूनच इस्रायलवर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा हल्ला सुरू झाला आहे.
 
यातील बहुतेक रॉकेट्स हवेतच नष्ट करण्यात इस्रायलला यश आलं आहे.
 
पण रॉकेट हल्ल्यामुळे या भागात अनेक ठिकाणी आग लागल्याचं दिसत आहे.
 
दुसरीकडे हमासच्या वरिष्ठ कमांडरने आपण इस्रायलवर हल्ल्या केल्याचं सांगितलं आणि सर्व पॅलेस्टिनीं लोकांना एकत्र लढण्याचं आवाहन केलं आहे.
 
इस्रायली सैन्याने म्हटले आहे की, ते इस्रायली नागरिकांचे रक्षण करतील आणि हमासला त्यांच्या कृतीची मोठी किंमत मोजावी लागेल.
 
जागतिक नेते काय म्हणाले?
इस्रायल पॅलेस्टाइन संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर जागतिक नेत्यांनी यावर चिंता व्यक्त केली आहे.
 
अमेरिकेने या हिंसाचाराचा निषेध केला. 'दोन्ही बाजूंनी ही हिंसा तातडीने थांबवावी,' असं म्हटलं आहे.
इस्रायलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वृत्ताने खूप धक्का बसला. आमच्या प्रार्थना निष्पाप पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. या कठीण प्रसंगी आम्ही इस्रायलच्या पाठीशी उभे आहोत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
फ्रान्स राष्ट्राध्यक्ष इमॅनुअल मॅक्रॉन यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. ‘मृत्यू झालेल्या कुटुंबियासोबत मी माझी संवेदना व्यक्त करतो,’ असं मॅक्रॉन म्हणाले.
जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी ‘सामान्य नागरिकांवरील रॉकेटहल्ले ताबडतोब थांबेले पाहिजेत,’ असं म्हटलं आहे.
हा सर्वात घृणास्पद दहशतवाद असल्याचं युरोपियन कमिशनचे अध्यक्ष उर्सुला वॉन डर लेयन यांनी म्हटलं.
आम्ही नेहमी संयम ठेवण्याचे आवाहन करत आलो आहे असं रशियाने म्हटलं आहे.
इराणचा हमासला पाठिंबा
इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या सल्लागारांनी इस्रायलवरील पॅलेस्टिनी हल्ल्याचे समर्थन केल्याचं सांगितलं जात आहे.
 
जोवर पॅलेस्टाइन आणि जेरुसलेम स्वतंत्र होत नाही तोवर आम्ही या संघर्षाला पाठिंबा देत आहे, असं इराणने म्हटलं आहे.
 
इस्रायलमधील भारतीयांना सुचना
इस्रायलमधील भारतीय दुतावासाने आपल्या नागरिकांना महत्त्वाच्या सुचना दिल्या आहेत. तसंच स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सुरक्षा नियमावलीचं पालन करावं असं म्हटलं आहे.
"इस्रायलमधील परिस्थिती पाहता सगळ्या भारतीयांनी सतर्क राहावं. स्थानिक प्रशासनाने दिलेली सुरक्षा नियमावलीचं पालन करावं. विनाकारण बाहेर फिरण्याचं टाळावं. अधिक मदतीसाठी भारतीय दुतावासाशी संपर्क करावा," असं भारतीय दुतावासाच्या परिपत्रकात म्हटलं आहे.
इस्रायलवर रॉकेट हल्ला करणाऱ्या हमासचा इतिहास
हमास ही पॅलेस्टाईनच्या कट्टरवादी संघटनांपैकी सर्वांत मोठी संघटना आहे.
 
इस्लामिक रेजिस्टंस मूव्हमेंट या संघटनेच्या अरबी नावाच्या आद्याक्षरांना जोडून 'हमास' हे नाव ठेवण्यात आलं आहे.
 
1987 साली वेस्ट बँक आणि गाझा पट्टीत इस्रायलने केलेल्या कब्जाचा विरोध सुरू झाल्यावर पॅलेस्टाईनने पहिला विद्रोह केला. तिथूनच हमासची सुरुवात झाली.
 
इस्रायलला धुळीस मिळवण्यास कटीबद्ध असल्याचं या संघटनेच्या चार्टरमध्ये लिहिलं आहे.
 
हमासची सुरुवात झाली त्यावेळी या संघटनेची दोन उद्दिष्टं होती. पहिलं उद्दिष्टं म्हणजे इस्रायलविरोधात शस्त्र हाती घेणं. त्यांच्या इज्जदीन अल-कसाम ब्रिगेडवर ही जबाबदारी होती. याशिवाय या संघटनेचं दुसरं उद्दिष्टं समाजकल्याणाची कामं करणं हे होतं.
 
मात्र, 2005 नंतर इस्रायलने गाझातून आपलं सैन्य आणि वस्त्या मागे घेतल्या. तेव्हापासून हमासने पॅलेस्टाईनच्या राजकीय प्रक्रियेत सहभागी व्हायला सुरुवात केली.
 
2006 साली हमासने पॅलेस्टाईनच्या अंतर्गत येणाऱ्या भागातून निवडणुकीत विजय मिळवला आणि पुढल्याच वर्षी गाझाचे अध्यक्ष महमूद अब्बास यांच्या 'फतह' या प्रतिस्पर्धी गटाला बाजूला सारत तिथली सत्ता काबिज केली.
 
तेव्हापासून गाझाच्या या कट्टरवाद्यांनी इस्रायलसोबत तीन युद्ध केली आहेत. हमासला एकट पाडून त्यांच्यावर हल्ले बंद करण्याचा दबाव यावा, यासाठी इस्रायलने इजिप्तच्या सहकार्याने गाझापट्टीची नाकाबंदी केली आहे.
 
हमास किंवा किमान त्यांच्या सैन्य गटाला इस्रायलसह अमेरिका, युरोपीय महासंघ, ब्रिटन आणि इतर अनेक राष्ट्र एक अतिरेकी संघटना मानतात.
 
इस्रायल - पॅलेस्टाइन संघर्षाचा इतिहास
1948 च्या मे महिन्यात पॅलेस्टाइन प्रदेशातून ब्रिटनने माघार घेतली, आणि आपआपला देश बनवण्यासाठी अनेक वर्षं संघर्ष करणाऱ्या अरब आणि ज्यू लोकांमध्ये अंतर्गत युद्ध पेटलं. प्रश्न होता, ही भूमी नक्की कोणाच्या हातात जाणार. युद्ध तुल्यबळांचं नव्हतं. अरबांच्या तुलनेत ज्यूंची संख्या अतिशय कमी होती पण या दिवसाच्या तयारी गेले कित्येक वर्षं तिथे असणाऱ्या आणि इस्रायलचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक ज्यू ने अनेक वर्षांपासून केली होती.
 
14 मे 1948 साली इस्रायलने आपलं स्वातंत्र्य घोषित केलं. 2000 वर्षांत पहिल्यांदा पूर्णपणे ज्यूंचा देश अस्तित्वात आला होता. मुस्लीमबहुल प्रदेशाच्या मधोमध ज्यूंचा देश निर्माण झाला.
 
त्यानंतर इस्रायलनं जेरुसलेमचा पूर्व भाग 1967 साली आपल्या ताब्यात घेतला होता आणि संपूर्ण शहर आपल्या मालकीचं असल्याचा त्यांचा दावा आहे.
 
पण बहुतांश देशांना हा दावा मान्य नाही. दुसरीकडे पॅलेस्टिनी लोक स्वतंत्र देशाची आशा करत असून ईस्ट जेरुसलेम ही त्या देशाची राजधानी असेल असं त्यांना वाटतं.
 
या वादातूनच तिथे सतत संघर्ष होत असतो.
 






















Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

8th October Indian Air Force Day 2023: 8 ऑक्टोबर रोजी भारतीय वायुसेना दिन का साजरा केला जातो? त्याचा इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या