Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लिबियाच्या समुद्रकिनारी शरणार्थ्यांच्या जहाजाला जलसमाधी, 150 जण बुडाल्याची भीती

लिबियाच्या समुद्रकिनारी शरणार्थ्यांच्या जहाजाला जलसमाधी, 150 जण बुडाल्याची भीती
लिबियाच्या समुद्रकिनारी शरणार्थ्यांचं जहाज बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 150 जणांना जलसमाधी मिळाली असल्याची भीती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी एजन्सीने (UNHCR) व्यक्त केली आहे.
 
इतर 150 शरणार्थींना स्थानिक मच्छिमारांनी वाचवलं. लिबियाच्या तटरक्षक दलाच्या जवानांनी या 150 जणांना किनाऱ्यापर्यंत सुखरूप पोहोचवलं असल्याची माहिती यूनएनएचसीआरने दिली.
 
हे सर्व शरणार्थी एकाच जहाजात होते की वेगवेगळ्या जहाजात होते, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीये.
 
लिबियाच्या राजधानीपासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरातून हे जहाज प्रवासासाठी निघालं होतं.
 
"लिबियात सध्या संघर्ष सुरू आहे आणि तिथे शरणार्थींना अमानवी पद्धतीने वागवलं जात आहे. त्यामुळे ज्या लोकांना भूमध्यसागरातून वाचवलं जातं, त्यांना पुन्हा लिबियात पाठवणं योग्य नाही," असं संयुक्त राष्ट्राकडून सातत्याने सांगण्यात आलं आहे.
 
ट्युनिशियात मे महिन्यात समुद्रकिनारी जहाज बुडून सुमारे 65 जणांना जलसमाधी मिळाली होती. या दुर्घटनेतून वाचलेल्या 16 जणांना ट्युनिशियाच्या नौसेनेच्या जवानांनी किनाऱ्यापर्यंत आणलं होतं.
 
दरवर्षी हजारो शरणार्थी भूमध्यसागर पार करण्याचा प्रयत्न करतात. यातील बहुतांश शरणार्थी लिबियातील असतात.
 
शरणार्थ्यांना घेऊन प्रवास करणारी जहाजं अनेकदा बिकट अवस्थेत असतात. शिवाय जहाजांवर मर्यादेपेक्षा जास्त लोक चढतात. त्यामुळेही दुर्घटनेच्या घटना वाढतात.
 
2017 मध्ये शरणार्थींच्या स्थलांतराचं प्रमाण नाट्यमयरित्या कमी झाल्याचं पाहायला मिळालं. याचं कारण लिबियाच्या सैनिकांच्या मदतीने इटली शरणार्थींच्या स्थलांतराला रोखण्याचं काम करते आहे. समुद्रात शरणार्थी सापडल्यास पुन्हा लिबियात पाठवलं जात आहे.
 
जगभरातील मानवाधिकार संस्था इटली आणि लिबियाच्या या धोरणांवर टीका करत आहेत.
 
यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात जवळपास 15 हजार 900 शरणार्थी भूमध्यसागरातील तीन मार्गांनी युरोपात आले. शरणार्थींच्या स्थलांतराची 2018 सालातील आकडेवारी पाहता, ही संख्या 17 टक्क्यांनी घटली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

118 मुलांना दत्तक घेणाऱ्या ‘लव्ह मदर’ला का जावं लागलं तुरुंगात?