पाकिस्तानी रेल्वेच्या तेजग्राम एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत कमीतकमी 46 जणांचा मृत्यू झाला आहे. ही गाडी कराचीहून रावळपिंडीला जात होती. लियाकतपूर जवळ पोहोचत असताना गाडीच्या 3 बोगींना आग लागली.
पोलीस अधिकारी रहीम खान यांनी 65 जणांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचही त्यांनी सांगितलं आहे.
रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी दिलेल्या माहितीनुसार तबलीगी जमातीच्या लोकांचा समुह लाहोरला एका धार्मिक कार्यक्रमासाठी जात होता. त्यांच्या जवळ खाण्यापिण्याच्या वस्तू आणि गॅस सिलिंडर होते. सिलिंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे.
आग अटोक्यात आल्याचं रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं आहे. तसंच जखमींना रुग्णालयात दाखल केल्याचही त्यांनी सांगितलंय. गाडी रुळावरून घसरलेली नाही, त्यामुळे तिल लवकरच लियाकतपूरमध्ये पोहोचलं जाईल, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं आहे. तसंच पीडितांना योग्य उपचार आणि मदतीचे आदेश दिले आहेत. गाडी आणि प्रवाशांचा विमा काढण्यात आला होता, त्यामुळे नुकसान भरपाई करता येईल असं रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे एकाच नावावर या गाडीच्या काही बोगी बुक झाल्याच रेल्वे मंत्र्यांनी सांगितलं आहे.