कतारमध्ये अटक करण्यात आलेल्या आठ भारतीय नागरिकांना झालेल्या फाशीच्या शिक्षा ही दु:खद असल्याचं भारत सरकारनं म्हटलं आहे आणि या प्रकरणी सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार केला जाईल, असं स्पष्ट केलं आहे.
हे आठही भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी असून गेल्या वर्षी ऑगस्टपासून ते कतारच्या तुरुंगात आहेत. कतारनं त्यांच्यावरील आरोप सार्वजनिक केलेले नाहीत.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे की, "अल दाहरा कंपनीच्या आठ भारतीय कर्मचाऱ्यांशी संबंधित खटल्यात कतारच्या न्यायालयानं आपला निर्णय दिला असल्याची प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे."
भारतीय परराष्ट्र खात्यानं पुढे म्हटलंय की, "फाशीच्या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला असून सविस्तर निकालाची वाट पाहत आहोत. आम्ही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि कायदेविषयक टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही या प्रकरणाकडे सर्वोच्च प्राधान्याने पाहत आहोत आणि हे प्रकरण कतारच्या अधिकाऱ्यांसमोर मांडणार आहोत."
या प्रकरणात अधिक भाष्य करू शकत नाही, असंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सोशल मीडियावर लिहिलं की, " कतारमधील 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांशी संबंधित अत्यंत दुःखद घटनाक्रम हा वेदना देणारा आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनं याची दखल घेतली आहे.
"आम्ही आशा करतो की, भारत सरकार आपल्या राजकीय प्रभावाचा कतार सरकारसोबत जास्तीत जास्त वापर करेल. जेणेकरुन अधिकाऱ्यांना अपील करताना पुरेसं सहकार्य मिळेल, हे सुनिश्चित करता येईल. तसंच त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत."
गेल्या काही महिन्यांपासून या माजी अधिकाऱ्यांची सुटका करण्यासाठी भारत सरकारवर खूप दबाव होता आणि भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं ही बाब त्यांच्या 'सर्वोच्च प्राधान्य' असल्याचं सांगितलं होतं.
गेल्या जूनमध्ये अटक करण्यात आलेल्या एका निवृत्त नौदल अधिकाऱ्यांची बहीण मीतू भार्गव यांनी आपल्या भावाला परत आणण्यासाठी सरकारकडे मदत मागितली होती.
मीतू भार्गव यांनी 'एक्स' वर लिहिलं होतं की, "नौदलाचे हे निवृत्त अधिकारी देशाची शान आहेत आणि मी पुन्हा एकदा माननीय पंतप्रधानांना हात जोडून आवाहन करते की, या अधिकाऱ्यांना कोणताही विलंब न करता तत्काळ भारतात परत आणावं."
काय आहे प्रकरण ?
सप्टेंबर 2022 मध्ये, कतार सरकारनं 8 माजी भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना अटक केली. मार्चमध्ये त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप ठेवण्यात आले होते.
अटक करण्यात आलेले 8 भारतीय नागरिक माजी नौदलाचे अधिकारी असून ते कतार मधील झाहिरा अल आलमी नावाच्या कंपनीत काम करत होते.
ही कंपनी कतार नौदलासाठीच्या पाणबुडी योजनेसाठी काम करत होती. रडारला टाळू शकणार्या हायटेक इटालियन तंत्रज्ञानावर आधारित पाणबुड्या घेणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कंपनीत 75 भारतीय नागरिक कर्मचारी होते. त्यापैकी बहुतांश भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी होते. मे महिन्यात कंपनीनं सांगितलं होतं की, ती 31 मे 2022 पासून कंपनी बंद करणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीचे प्रमुख खमिस अल अजामी आणि अटक करण्यात आलेल्या 8 भारतीयांवरील काही आरोप सामान्य आहेत, तर काही विशेष स्वरूपाचे आहेत.
हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आठ कर्मचाऱ्यांना यापूर्वीच बडतर्फ करण्यात आलं असून त्यांच्या पगाराचा निपटारा करण्यात आला आहे.
गेल्या मे महिन्यात कतारनं कंपनी बंद करण्याचे आदेश दिले आणि मे 2023 च्या अखेरीस आपल्या 70 कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे निर्देश दिले.
हेरगिरीचा आरोप?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी इस्रायलला संवेदनशील माहिती दिली होती.
भारतीय मीडिया आणि इतर जागतिक प्रसारमाध्यमांमधील वृत्तांनुसार, या निवृत्त नौदल अधिकाऱ्यांवर कतारच्या अत्यंत प्रगत इटालियन पाणबुड्या खरेदी करण्यासंबंधीच्या गुप्तचर कार्यक्रमाविषयी इस्रायलला माहिती पुरवल्याचा आरोप आहे. म्हणजे या निवृत्त भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोपही होऊ शकतो.
कतारच्या गुप्तचर संस्थेने दावा केला आहे की, त्यांच्याकडे या हेरगिरीचे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. कतारच्या खाजगी सुरक्षा कंपनी झाहिरा अल आलमीसाठी काम करणारे हे निवृत्त भारतीय नौदलाचे अधिकारी कतारच्या नौदलाला विविध प्रकारचे प्रशिक्षण देत असत.
भारत आणि कतार यांच्यात झालेल्या करारानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
झाहिरा अल आलमी कंपनीचं काम काय होतं?
कंपनीनं आपल्या वेबसाईटवर स्वत:ची ओळख ही कतारचं संरक्षण मंत्रालय, सुरक्षा आणि इतर सरकारी संस्थांचे स्थानिक व्यवसाय भागीदार म्हणून दिली आहे.
ही खाजगी कंपनी कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि सेवा पुरवत असे. संरक्षण उपकरणं चालवणे, दुरुस्त करणं आणि त्यांची देखभाल करणारी तज्ज्ञ कंपनी असा उल्लेख करण्यात आला आहे.
कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि त्यांच्या पदांची संपूर्ण माहिती या वेबसाईटवर दिली आहे.त्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे.
कंपनीच्या लिंक्डइन पेजवर लिहिलंय की, "संरक्षण उपकरणं चालवण्यात आणि लोकांना प्रशिक्षण देण्यात ते कतारमध्ये अग्रेसर आहे. "सुरक्षा आणि एरोस्पेसच्या बाबतीत अल झाहिरा कंपनी कतारमध्ये विशेष स्थानावर आहे."
Published By- Priya Dixit