बेकायदेशीरपणे गोपनीय कागदपत्रे बाळगल्याप्रकरणी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फ्लोरिडाच्या एका कोर्टाने सोमवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील फौजदारी खटला फेटाळून लावला आहे.
खटल्याचे नेतृत्व करणारे विशेष वकील जॅक स्मिथ यांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करण्यात आल्याचा निकाल न्यायाधीश आयलीन कॅनन यांनी दिला होता. विशेष वकील जॅक स्मिथ यांना खटला न्यायालयात नेण्याचा अधिकार नव्हता. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्या वकिलांनी ॲटर्नी जनरल मेरिक गार्लंड यांच्या 2022 मध्ये जॅक स्मिथ यांची चौकशीचे नेतृत्व करण्याच्या निर्णयाला आव्हान दिले होते. मात्र, सरकारी वकील या निकालावर अपील करण्याची शक्यता आहे.
वास्तविक अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पदावर असताना त्यांच्या खाजगी निवासस्थानी अनेक गोपनीय कागदपत्रे बेकायदेशीरपणे ठेवल्याचा आरोप आहे. सध्या, न्यायाधीश आयलीन कॅनन यांचा आदेश ट्रम्प यांच्यासाठी मोठा कायदेशीर विजय आहे.