फ्रान्सहून इंग्लंडकडे निघालेल्या निर्वासितांची बोट उलटल्यामुळं 27 निर्वासित पाण्यात बुडून ठार झाल्याचा प्रकार घडला आहे. कलाईस चॅनलजवळ हा प्रकार घडल्याची माहिती फ्रान्सच्या प्रशासनानं दिली आहे.
बुडाल्या गेलेल्या निर्वासितांना वाचवण्यासाठी आणि मृतदेह मिळवण्यासाठी फ्रान्स आणि इंग्लंडमधील यंत्रणा मदतकार्य राबवत आहे. सागरी आणि जलमार्गे त्यांना वाचवण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी मृतांमध्ये पाच महिला आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचं म्हटलं आहे. तर दोन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती दिली आहे.
इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युनल मॅक्रॉन यांनी अपघातानंतर फोनवरून चर्चा केली. यासाठी जबाबदार टोळ्यांना रोखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यावर त्यांची सहमती झाली.
2014 पासून माहिती मिळवायला सुरुवात केली, तेव्हापासूनची माहिती मिळवली असता आतापर्यंतची या चॅनलमधली ही सर्वात मोठी जीवित हानी असल्याचं निर्वासितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेनं म्हटलं आहे.
फ्रान्समधील घटनेनंतरचा प्रकार
फ्रान्समधील उत्तर किनाऱ्यावरील एक निर्वासितांची छावणी उद्ध्वस्त केल्यानंतर आठवडाभरात ही घटना घडली आहे. या उत्तर किनाऱ्यावरून इंग्लंमध्ये जाणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे.
याठिकाणी फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी निर्वासितांचे तंबू काढले आणि त्याठिकाणाहून जवळपास 1500 निर्वासितांना गेल्या आठवड्यात बाहेर काढलं. डुनकिर्कजवळच्या एका छावणीत हा प्रकार घडला.
निर्वासितांच्या छावण्यांमध्ये बोटमधील निर्वासित वाहून गेल्याचं वृत्त पसरल्यानंतर याठिकाणी दुःखाचं वातावरण निर्माण झालं आहे. पण याठिकाणी असणाऱ्या सर्वांनीच अशाप्रकारचा धोका मान्य केला आहे.
भीती आहे पण पर्याय नाही
याठिकाणी भीती नक्कीच आहे. तसंच धोकाही आहे. मात्र आम्ही प्रयत्न करतच राहणार आहोत, असं एका सुदानधील तरुणानं म्हटलं आहे.
या तरुणानं मंगळवारी एका लहान बोटीमधून या ठिकाणाहून जाण्याचा प्रयत्न केला होता. पण लाटांचा आकार मोठा असल्यानं त्यानं माघार घेतली. परिस्थिती सुधारल्यानंतर तो पुन्हा प्रयत्न करणार आहे.
या ठिकाणी गेल्या वर्षभरात अनेक लोकांना इंजीन बंद पडल्याने किंवा बोट उलटल्यामुळे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, असंही त्यानं सांगितलं.
या दुर्घटनेमध्ये 31 जण ठार झाल्याचं वृत्त आधी आलं होतं. पण हा आकडा 27 असल्याचं फ्रान्समधील प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
photo: symbolic