फाऊंटन पेनाचा शस्त्रासारखा उपयोग करून एका विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न एका माथेफिरूने केला. चीनमध्ये चांग्शा ते बिजींगला जाणारे एअर एशिया कंपनीचे विमान झेन्गझाउपासून दुसरीकडे वळवण्यात आले. अपहरणकर्त्याने विमानातील कर्मचाऱ्याला फाऊंटन पेनाच्या धाकाने ओलिस धरले होते, असे चीनच्या नागरी हवाई वाहतुक विभागाने सांगितले. या प्रकारामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नाही आणि अपहरणकर्त्याला पकडण्यात आले आहे.
संबंधित विमान चीनच्या दक्षिणेकडील हुनान प्रांताची राजधानी चांग्शा येथून बिजींगला निघाले होते. मात्र सकाळी 9 वाजून 58 मिनिटांनी वाटेत मध्य हेनान प्रांताची राजधानी असलेल्या झेन्गझाऊ आंतराष्ट्रीय विमानतळावर अचानक हे विमान उतरले. दुपारी 1 वाजून 17 मिनिटांनी सर्व प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना विमानाच्या मागच्या दरवाज्याने सुखरूप सोडवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 41 वर्षीय अपहरण कर्ता हा मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे. या प्रकारानंतर विमान वाहतुक सुरळीतपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.