पाकिस्तानच्या काळजीवाहू पंतप्रधानपदी बलुचिस्तान अवामी पक्षाचे सिनेटर अन्वर उल-हक काकड यांची निवड करण्यात आली आहे.14 ऑगस्ट 2023 रोजी त्यांचा शपथविधी पार पडला.
इस्लामाबादमधील ऐवान-ए-सदर येथिल समारंभात राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी त्यांना शपथ दिली. योगायोगाने 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिनही आहे.
गेल्या आठवड्यात राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली होती.
अन्वर उल-हक काकड हे पाकिस्तानचे आठवे काळजीवाहू पंतप्रधान असतील.
तसंच ते या देशाच्या इतिहासातील सर्वांत तरुण काळजीवाहू पंतप्रधान असतील.
येत्या नोव्हेंबरला पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. तोवर काकड हे पाकिस्तानचे काळजीवाहून पंतप्रधान म्हणून काम पाहतील.
निवडणुका होईपर्यंत ते काळजीवाहू सरकारचं नेतृत्व करतील. पाकिस्तानची संसद विसर्जित झाल्यानंतर तीन दिवसांनी त्यांच्या नावावर एकमत झालं.
पाकिस्तानच्या राज्यघटनेत अशी अट आहे की संसद (नॅशनल असेंब्ली) आणि राज्यांच्या विधानसभा विसर्जित केल्यापासून 90 दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्यात.
अन्वर उल-हक कक्कड हे बलुचिस्तानमधील काकड जमातीचे आहेत.
कोण आहेत अन्वर उल-हक काकड?
बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा इथं 1971 मध्ये जन्मलेल्या अन्वर उल-हक काकड यांचे वडील एहतशाम-उल -हक काकड यांनी तहसीलदार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.
पुढे त्यांनी सरकारमध्ये वेगेवेगळ्या पातळीवर अधिकारी म्हणून कार्य केलं.
अन्वर उल-हक काकड यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण क्वेट्टा येथून पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी कोहट येथील कॅडेट कॉलेजमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं.
ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी काकड बलुचिस्तान विद्यापीठात गेले. त्यानंतर त्यांनी लंडनमध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केलं.
अन्वर उल-हक काकड यांना पहिल्यापासून राजकारणात रस होता. त्यामुळे ते पाकिस्तानात परतले आणि त्यांनी मुस्लिम लीगमध्ये प्रवेश घेतला.
कक्कड यांना साहित्याची आवड आहे.
1999 मध्ये मुस्लिम लीग (नवाझ) सरकार पडल्यानंतर ते मुस्लिम लीग (क्यू-कायद-ए-आझम) मध्ये सामील झाले.
2002 मध्ये त्यांनी मुस्लिम लीग (क्यू) च्या तिकिटावर क्वेटा येथून नॅशनल असेंब्लीच्या जागेसाठी निवडणूक लढवली. पण त्यांना यश मिळालं नाही.
पुढे 2013 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. तेव्हा बलुचिस्तानमध्ये मुस्लिम लीग (नवाझ) आणि इतर पक्षांचं युतीचं सरकार स्थापन झालं.
अन्वर उल-हक काकड यांनी मुख्यमंत्री सरदार सनाउल्लाह जहरी यांच्या सरकारमध्ये बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते म्हणून काम पाहिलं.
2018 मध्ये मुस्लिम लीग (नवाझ) निवडणुकीत पराभूत झाला. बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान अवामी पार्टी नावाचा एक नवीन पक्ष स्थापन झाला. अन्वर उल-हक काकड हे या पक्षाच्या संस्थापकांपैकी एक आहेत.
त्यानंतर (2018) ते बलुचिस्तान अवामी पार्टीचे सिनेटर म्हणून निवडून आले होते.
बलुचिस्तानमध्ये जेव्हा वेगळ्या देशाची मागणी सुरू होती तेव्हा काकड यांनी सरकारची बाजू नेटाने लावून धरली. तसंच वेगळ्या बलुचिस्तानच्या विरोधात खंबीरपणे उभे राहिले.
बलुचिस्तानमधून आलेले ते देशाचे दुसरे काळजीवाहू पंतप्रधान आहेत. याआधी बलुचिस्तान उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश मीर हजार खान खोसा हे देशाचे काळजीवाहू पंतप्रधान होते.
पाकिस्तानच्या इतिहासात आतापर्यंत एकूण आठ काळजीवाहू पंतप्रधान झाले आहेत. कोण किती काळ या पदावर राहिले हे जाणून घेऊयात.
1) गुलाम मुस्तफा जतोई
06 ऑगस्ट 1990 ते 6 नोव्हेंबर 1990
गुलाम मुस्तफा जतोई हे पाकिस्तानचे पहिले काळजीवाहू पंतप्रधान झाले होते. त्यांच्या देखरेखीखाली 1990 मध्ये देशाच्या इतिहासातील पाचवी सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यानंतर नवाझ शरीफ पहिल्यांदाच पंतप्रधान झाले.
2) बल्ख शेर मजारी
18 एप्रिल1993 ते 26 मे 1993
बल्ख शेर मजारी हे देशाचे दुसरे काळजीवाहू पंतप्रधान झाले, त्यांचा कार्यकाळ एक महिना आठ दिवसांचा होता.
त्यांच्या देखरेखीखाली निवडणूक होऊ शकली नाही.
प्रकरण असं की 19 एप्रिल 1993 रोजी राष्ट्रपती गुलाम इशाक खान यांनी आठव्या दुरुस्तीद्वारे नवाझ शरीफ यांचे सरकार बरखास्त केलं आणि बल्ख शेर मजारी यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
पण सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफ यांचे सरकार पुन्हा बहाल केलं आणि अशा प्रकारे काळजीवाहू सरकार संपुष्टात आलं. शेर मजारी केवळ 39 दिवस पंतप्रधान राहिले.
3) मोईनुद्दीन अहमद कुरेशी
18 जुलै 1993 ते 19 ऑक्टोबर 1993
पाकिस्तानमध्ये 1990 मध्ये स्थापन झालेलं सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही. त्यानंतर 1993 मध्ये नवीन निवडणुका झाल्या.
यावेळी काळजीवाहू पंतप्रधान होते मोईनुद्दीन अहमद कुरेशी. त्यांना देशाबाहेरून आणून हे पद देण्यात आलं होतं.
त्यामुळे त्यांना आयात केलेले पंतप्रधान असंही म्हणतात. निवडणुकीनंतर बेनझीर भुट्टो दुसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान झाल्या.
4) मलिक मेराज खालिद
5 नोव्हेंबर 1996 ते 17 फेब्रुवारी 1997
1993 मध्ये स्थापन झालेल्या बेनझीर भुट्टो सरकारला आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही आणि 1997 मध्ये पुन्हा देशात सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
यावेळी मलिक मेराज खालिद यांना काळजीवाहू पंतप्रधान करण्यात आलं. मेराज खालिद यांची प्रतिमा सभ्य आणि सुशिक्षित राजकारणी अशी होती.
निवडणुकीनंतर नवाझ शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान झाले. पण हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकलं नाही.
त्यानंतरच्या काही वर्षांत देशात काळजीवाहू पंतप्रधान नेमण्याची पद्धत काही काळ स्थगित राहिली.
1999 मध्ये सत्तापालट झाल्यानंतर जनरल परवेझ मुशर्रफ यांनी देशात मार्शल लॉ लागू केला.
पुढे ते राष्ट्रपती झाले आणि काळजीवाहू पंतप्रधानांची परंपरा पुन्हा सुरू झाली.
मुशर्रफ यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना बडतर्फ करून देशात आणीबाणी लागू केली. त्यानंतर देशभरात त्यांच्याविरोधात निदर्शने झाली.
5) मोहम्मद मियाँ सूमरो
15 नोव्हेंबर 2007 ते 25 मार्च 2008
या परिस्थितीत मोहम्मद मियाँ सूमरो हे काळजीवाहू पंतप्रधान होते. 2008 च्या सार्वत्रिक निवडणुका त्यांच्या देखरेखीखाली झाल्या.
पाकिस्तान पीपल्स पार्टीने निवडणुकीत विजय मिळवला आणि युसूफ रझा गिलानी पंतप्रधान म्हणून निवडून आले.
डिसेंबरमध्ये निवडणूक रॅलीनंतर बेनझीर भुत्तो यांची हत्या करण्यात आली, ज्यामुळे निवडणुका घेण्यास विलंब झाला. यामुळे मियाँ सुमरो हे सर्वाधिक काळ म्हणजे चार महिने आठ दिवस काळजीवाहू पंतप्रधान राहिले.
6) मीर हजार खान खोसो
25 मार्च 2013 ते 5 जून 2013
पाकिस्तान पीपल्स पार्टी सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला. (युसूफ रझा गिलानी चार वर्षं आणि तीन महिने पंतप्रधान झाले, त्यानंतर रझा परवेझ अश्रफ सुमारे नऊ महिने).
2013 मध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने बलुचिस्तानचे मीर हजार खान खुसरो यांना काळजीवाहू पंतप्रधान बनवलं.
या निवडणुकांमध्ये नवाझ शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले.
7) नासेर मुल्क
1 जून 2018 ते 18 ऑगस्ट 2018
2013 मध्ये स्थापन झालेल्या पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ) सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला, त्यानंतर 2018 मध्ये देशात 11व्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या.
पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी आणि विरोधी पक्षनेते सय्यद खुर्शीद अहमद शाह यांच्या संमतीने, निवडणूक आयोगाने या निवडणुकांच्या देखरेखीसाठी माजी सरन्यायाधीश नासिर मुल्क यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली.
या निवडणुकांमध्ये पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचा विजय झाला आणि इम्रान खान पंतप्रधान झाले. परंतु अविश्वास प्रस्तावामुळे त्यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही आणि शाहबाज शरीफ यांची हंगामी पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आता देशात पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी अन्वर उल-हक काकड यांची काळजीवाहू पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.
Published By- Priya Dixit