Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अर्जेंटिनाच्या उपराष्ट्राध्यक्षांवर गोळीबाराचा प्रयत्न, ट्रिगर अडकल्यानं जीव वाचला

webdunia
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2022 (18:36 IST)
अर्जेंटिनाच्या उपराष्ट्राध्यक्ष क्रिस्टिना फर्नांडिज डी किर्चनर यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी आहे. क्रिस्टिना या हल्ल्यातून थोडक्यात बचवल्या आहेत.
 
क्रिस्टिना फर्नांडिज अर्जेंटिनाची राजधानी असलेल्या ब्यूनस आयर्स येथील आपल्या घराबाहेर लोकांना भेटत होत्या. त्यांच्याशी हस्तांदोलन करत होत्या. तेवढ्यात एका इसमाने त्यांच्यावर पिस्तुल रोखलं.
 
अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिज यांच्या माहितीनुसार, हल्लेखोराने ज्या बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्यात पाच गोळ्या होत्या. ट्रिगर अडकल्याने त्याला गोळीबार करता आला नाही.
 
किर्चनर या 2007 ते 2015 दरम्यान अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष होत्या. याच काळात त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. पण त्यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाची सुनावणी अजूनही सुरू आहे. गुरुवारी त्या कोर्टातून घरी परतत असतानाच ही घटना घडली.
 
पोलिसांनी या हल्लेखोराला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. या हल्ल्याचं एक फुटेज सोशल मीडियात व्हायरल झालं आहे. हा हल्लेखोर 35 वर्षीय असून ब्राझिलचा असल्याचं स्थानिक मीडियाच्या हवाल्याने सांगितलं जातंय. तसेच हल्ल्याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
 
'हत्येचा प्रयत्न'
या घटनेनंतर अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस देशवासीयांना संबोधित करताना म्हणाले की, "हल्लेखोराने ज्या बंदुकीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यात पाच गोळ्या होत्या. ट्रिगर अडकल्याने त्याला गोळीबार करता आला नाही. त्यामुळे क्रिस्टिना यांचा जीव वाचला."
 
राष्ट्राध्यक्षांनी हल्ल्याचा आणि हल्लेखोराचा निषेध केला आहे. देशात लोकशाही प्रस्थापित झाल्यानंतरची ही सर्वात गंभीर घटना असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.
 
राष्ट्राध्यक्ष म्हणाले, "कोणत्याही व्यक्तीबरोबर आपले एकदम टोकाचे मतभेद असले, तरीही आपण यांच्याविषयी द्वेषयुक्त बोलणं योग्य नाही. यामुळे हिंसाचाराला खतपाणी मिळतं. हिंसा आणि लोकशाही एकत्र नांदणं कदापि शक्य नाही."
 
या हल्ल्यानंतर देशात एक दिवसीय सुट्टी जाहीर करण्यात आली. जीवन, लोकशाही आणि आपल्या उपराष्ट्राध्यक्षांविषयी आत्मीयता दर्शवण्यासाठी ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अर्जेंटिनाचे अर्थमंत्री सर्जियो मासा यांनी हा हत्येचा प्रयत्न असल्याचं म्हटलंय.
 
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, "जेव्हा समाजात हिंसाचार आणि द्वेष निर्माण होतो तेव्हा अशा घटना घडतात. हा हत्येचा प्रयत्न होता."
 
कॅमेऱ्यात कैद झाली घटना
या हल्ल्याचं एक फुटेज स्थानिक मीडियामध्ये दाखवलं जात आहे. या व्हिडिओत हल्ला कसा झाला हे स्पष्ट दिसत आहे.
 
क्रिस्टिना या लोकांशी हस्तांदोलन करत गर्दीतून निघत असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने पिस्तुल रोखल्याचं दिसून येत आहे.
 
दरम्यान नेम चुकवण्यासाठी उपराष्ट्राध्यक्षांनी आपलं डोकं खालच्या दिशेने झुकवलं, तेवढ्यात पिस्तूलाचा ट्रिगरही जाम झाला आणि गोळीबार झाला नाही.
 
सोशल मीडियावर आणखीन एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात गर्दीतले काही लोक या हल्लेखोरापासून उपराष्ट्राध्यक्षांना वाचवताना दिसत आहेत.
 
पोलिसांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, हल्लेखोराला अटक केली असून घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर बंदूकही जप्त करण्यात आली आहे.
 
भ्रष्टाचाराचे आरोप
69 वर्षीय क्रिस्टीन किर्चनर या 2007 ते 2015 दरम्यान अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्ष होत्या.
 
2019 मध्ये ही त्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणार होत्या. मात्र त्यांनी आपला निर्णय बदलत त्यांचे माजी चीफ-ऑफ-स्टाफ अल्बर्टो फर्नांडिस यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. पुढे क्रिस्टीन यांनी उपराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
 
 
सरकारी निधीमध्ये अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तसेच दक्षिण अर्जेंटिनाच्या सांताक्रूझ प्रांतात रस्त्यांच्या टेंडरमध्ये फायदा व्हावा या उद्देशाने मित्र असलेल्या लाझोर बेझ यांना मदत केल्याचा आरोपही किर्चनर यांच्यावर करण्यात आला.
 
त्यांच्यावरील भ्रष्टाचाराची सुनावणी सुरू झाल्यावर त्यांचे समर्थक घराबाहेर रॅली काढत होते.
 
भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात दोषी आढळल्यास क्रिस्टिना यांना 12 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागू शकतो. तसेच त्यांच्यावर राजकीयदृष्ट्या आजीवन बंदी घातली जाऊ शकते.
 
उपराष्ट्राध्यक्ष असलेल्या किर्चनर राष्ट्रपती असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे झाले होते. तसेच येत्या काही महिन्यांत भ्रष्टाचाराची ही प्रकरण निकाली निघू शकतात. मात्र सिनेटच्या अध्यक्ष असल्याने किर्चनर यांना एक विशेष सूट मिळेल.
 
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात त्यांची शिक्षा मंजूर होत नाही अथवा त्या 2023 च्या निवडणुकीत पराभूत होत नाहीत तोपर्यंत त्यांना तुरुंगात पाठवता येणार नाही.
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asia Cup 2022 : रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आशिया कपमधून बाहेर