अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शिकागो येथे राष्ट्राध्यक्ष म्हणून शेवटचे भाषण केले. ओबामा हे अमेरिकेचे पहिले अश्वेत राष्ट्राध्यक्ष ठरले पण त्याचबरोबर प्रत्येक अमेरिकन व्यक्तीच्या मनात घर करायलाही ते तितकेच यशस्वी झाले. म्हणूनच आपल्या शेवटच्या भाषणात ते भाऊक झाले. अमेरिकन जनतेला उपदेश केल्यानंतर त्यांनी पत्नी मिशेल आणि दोन्ही मुलींचे कौतुक केले. ओबामा यांना निरोप देण्यासाठी सगळे तिथे जमले होते पण ओबामा यांची धाकटी कन्या नताशा म्हणजे साशा मात्र अनुपस्थित होती. त्यामुळे सगळ्यांच्या नजरा तिचा शोध घेत होते.
आपल्या भाषणात ओबांमांनी आपल्या दोन्ही मुलींचे भरभरून कौतुक केले पण यावेळी मात्र त्यांची मोठी मुलगी मालियाच उपस्थित होती. ‘अत्यंत कठीण काळातही तुम्ही हुशार, सुंदर मुली म्हणून तयार झाल्या. पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे तुम्ही विचार करणा-या तरुण मुली आहात. प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा दबाव तुमच्यावर होता. पण तुम्ही कधीच याचा दुरूपयोग केला नाही.’ एक पिता म्हणून मला तुमचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचे हे कौतुकाचे बोल ऐकून तिथे उपस्थित असलेली त्यांची मुलगी मालिया भाऊक झाली. पत्नी मिशेल आणि साशाचे आभार मानत ओबामांना अश्रू आवरता आले नाही.
वडिलांच्या डोळ्यातील आपल्याप्रती असलेला अभिमान, कौतुक आणि अश्रू बघून मलियालाही रडू कोसळले. त्यामुळे कॅमेराच्या नजरा ओबामांच्या पत्नी आणि मुलीकडे वळल्या. पण यात त्यांची छोटी मुलगी साशा मात्र कुठेच दिसत नव्हती. आठ वर्षांपूर्वी जेव्हा ओबामा निवडून आले तेव्हा मिशेल यांनी आपल्या दोन्ही मुलींचा हात पकडून त्यांना जगासमोर आणले होते. आता वडिलांच्या आयुष्यातील एवढा महत्त्वाचा क्षण आणि छोटी मुलगी मात्र अनुपस्थितीत त्यामुळे सगळ्यांच्याच चेह-यावर प्रश्नचिन्ह होते.