Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लेडी डायनाने 1995 साली दिलेल्या मुलाखतीची बीबीसी करणार चौकशी

लेडी डायनाने 1995 साली दिलेल्या मुलाखतीची बीबीसी करणार चौकशी
, शुक्रवार, 20 नोव्हेंबर 2020 (16:26 IST)
लेडी डायना यांनी 1995 साली बीबीसीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवर काही आरोप करण्यात आल्याने बीबीसी आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.
 
मुलाखतीसाठी होकार मिळवण्यासाठी बीबीसीचे पत्रकार मार्टीन बशीर यांनी बँकेची खोटी कागदपत्रं वापरल्याचा आरोप डायना यांचे भाऊ अर्ल स्पेंसर यांनी केला आहे.
 
यासाठी बीबीसीने ब्रिटनच्या सर्वांत वरिष्ठ न्यायमूर्तींपैकी एक असलेले लॉर्ड डायसन यांना चौकशी प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. लॉर्ड डायसन ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.
 
बीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी याविषयी सांगताना म्हणाले, "या प्रकरणातलं सत्य समोर आणण्यासाठी बीबीसी वचनबद्ध आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र चौकशीचे आदेश दिले आहेत. लॉर्ड डायसन विख्यात आणि सन्माननीय व्यक्ती आहेत. ते या चौकशीचं नेतृत्त्व करतील."
डायना यांचे भाऊ अर्ल स्पेंसर यांनी याच महिन्याच्या सुरुवातीलाच 'अत्यंत बेईमानीने' ही मुलाखत मिळवण्यात आली आणि याची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी, अशी मागणी केली होती.
डेली मेलने यासंदर्भातलं एक वृत्त प्रकाशित केलं आहे. त्यात अर्ल स्पेंसर यांनी टिम डेवी यांना लिहिलेलं पत्रही देण्यात आलं आहे. मार्टिन बशीर यांनी बँकेची खोटी कागदपत्रं दाखवून लेडी डायना यांची माहिती मिळवण्यासाठी राजघराण्यातल्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना पैसे पुरवले जात असल्याचं सांगितल्याचं सांगितलं होतं, असं या पत्रात म्हटलेलं आहे.
 
स्पेंसर लिहितात, "मला ती कागदपत्रं दाखवली नसती तर मी मार्टिन बशीर यांना डायना यांना कधीच भेटू दिलं नसतं."
 
डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत अर्ल स्पेंसर म्हणतात, "माझा विश्वास संपादन करण्यासाठी आणि लेडी डायना यांना भेटण्यासाठी मार्टिन बशीर यांनी राजघराणातल्या अनेक वरिष्ठांविरोधात खोटे आणि मानहानी करणारे आरोप केले होते."
 
डायना यांचे खाजगी पत्रव्यवहार तपासले जात असल्याचं, त्यांच्या कारचा पिच्छा केला जात असल्याचं आणि त्यांचे फोन टॅप केले जात असल्याचं बशीर यांनी सांगितलं होतं.
 
57 वर्षीय मार्टिन बशीर बीबीसीमध्ये धार्मिक विषयाचे संपादक आहेत.
 
सध्या हृदयासंबंधीचे आजार आणि कोव्हिड-19 मुळे ते या आरोपांवर उत्तर देऊ शकत नाहीत.
कोणत्या मुद्द्यांवर तपास होणार?
1995 साली घेतलेली ही मुलाखत मिळवण्यासाठी बीबीसी आणि विशेषतः मार्टिन बशीर यांनी कोणती पावलं उचलली. यात अर्ल स्पेंसर यांनी दावा केलेल्या 'खोट्या बँक कागदपत्रांचीही' चौकशी होईल.
मुलाखत मिळवण्यासाठी जी काही पावलं उचलण्यात आली ती बीबीसीच्या तत्कालीन मार्गदर्शक तत्त्वांना अनुसरून होती का, हेदेखील तपासलं जाईल.
लेडी डायना मुलाखत देण्यासाठी तयार होण्यात मार्टिन बशीर यांच्या कृतीचा कितपत प्रभाव होता.
1995 आणि 1996 साली बीबीसीला या पुराव्यांची माहिती होती का? विशेषतः 'खोट्या बँक कागदपत्रांविषयी'.
बीबीसीने मुलाखतीच्या परिस्थितीची किती प्रभावी पडताळणी केली होती?
लॉर्ड डायसन यांनी हे मुद्दे निश्चित केले आहेत आणि बीबीसीने त्याला मंजुरी दिली आहे.
चौकशी सुरू झाली असून कागदपत्रं गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं बीबीसीने कळवलं आहे. गेल्या आठवड्यात बीबीसीने डायना यांची एक नोट तपास अधिकाऱ्यांना दिली आहे. यात बीबीसी पॅनोरामाची मुलाखत ज्या पद्धतीने दाखवण्यात आली त्यावर आपण खूश असल्याचं डायना यांनी कळवलं आहे.
 
चौकशीचं नेतृत्त्व करणारे लॉर्ड डायसन कोण आहेत?
या चौकशीसाठी बीबीसीने लॉर्ड डायसन यांची निवड केली आहे. ते मास्टर ऑफ रोल्स होते. इंग्लंड आणि वेल्समध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या न्यायाधीशांना हे पद बहाल केलं जातं. त्यांनी 4 वर्षं हा पदभार सांभाळला. 2016 साली ते निवृत्त झाले.
 
याशिवाय ते ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशही होते.
आजपासून 25 वर्षांपूर्वी 1995 साली घेण्यात आलेली ही मुलाखत त्यावेळी तब्बल 2.3 कोटी लोकांनी बघितली होती. या लग्नात तीन लोक सहभागी असल्याचं डायना यांनी मुलाखतीत म्हटलं होतं.
 
या मुलाखतीत डायना त्यांचे पती प्रिन्स चार्ल्स यांचे कॅमिला पार्कर यांच्याशी असलेल्या संबंधांबाबतही मोकळेपणाने बोलल्या होत्या.
 
ही मुलाखत घेतली त्यावेळपर्यंत डायना प्रिन्स चार्ल्सपासून विभक्त झाल्या होत्या. मात्र, घटस्फोट झालेला नव्हता. 31 ऑगस्ट 1997 रोजी लेडी डायना यांचा एका कार अपघातात मृत्यू झाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लस तयार करण्यासाठी विचित्र घटक पदार्थ का वापरले जातात?