एका विवाह समारंभामध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात किमान 9 जण ठार झाले. या विवाह समारंभाच्या निमित्ताने होणाऱ्या राजकीय एकत्रीकरणाला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने हा बॉम्बस्फोट घडवून आणला होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विवाह समारंभाच्या सभागृहामध्ये उत्तरेकडील बाल्ख प्रांताचे राज्यपाल आणि ताजिक बहुल जमैत ए इस्लामी पार्टीचे नेते अत्ता मोहम्मद नूर यांच्या समर्थकांचे एकत्रीकरण सुरु होते.
नूर हे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशर्रफ गनी यांचे टीकाकार मानले जातात. या सभागृहामध्ये घुसण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवल्यावर त्याने आपल्याजवळील स्फोटकांचा स्फोट घडवून आणला.
एकत्रीकरणादरम्यान भोजनानंतर सर्व उपस्थित बाहेर पडत असतानाच हा स्फोट झाला होता, असे काबुल पोलिसांचे प्रवक्ते अब्दुल बसीर मुजाहिद यांनी सांगितले. मृतांमध्ये सात पोलिस कर्मचारी आणि दोन नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय आणखी 9 जण स्फोटामध्ये जखमी झाले.
या एकत्रीकरणाला नूर हे स्वतः उपस्थित नव्हते. नूर यांनी अलिकडेच उपाध्यक्ष अब्दुल रशिद दोस्तम यांनी परत येण्याची मागणी केली होती. राजकीय विरोधकांवर बलात्कार केल्याचे आरोप झाल्याने दोस्तम तुर्कीला पळून गेले होते. यावर्षाच्या सुरुवातीला नूर यांनी अफगाणचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हजारा समाजाचे नेते मोहम्मद मोहाकिक आणि दास्तुम यांची भेट घेऊन आघाडी करण्याबाबत चर्चा केली होती.