Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मोहम्मद पैगंबरांचं वादग्रस्त कार्टून रेखाटणारे लॉश विल्क्स यांचं अपघातात निधन

webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (22:22 IST)
मोहम्मद पैगंबर यांचं वादग्रस्त कार्टून काढणारे स्वीडनचे कलाकार लॉश विल्क्स यांचं कार अपघातात निधन झालं.
 
या व्यंगचित्रावरून जगभरात त्यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रावरून गदारोळ झाला होता.
 
अपघातासंदर्भात प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार विल्क्स पोलिसांच्या गाडीतून जात होते. स्वीडनच्या दक्षिणेकडील मारकरद शहरात ट्रकशी टक्कर होऊन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
 
या अपघातात गाडीतील पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला. ट्रक ड्रायव्हर या अपघातात जखमी झाला आहे.
विल्क्स 75 वर्षांचे होते. मोहम्मद पैंगबरांचं व्यंगचित्र काढल्यानंतर त्यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्यांना पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली होती.
 
विल्क्स यांनी काढलेलं ते व्यंगचित्र 2007मध्ये प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे अनेक मुस्लीम नाराज झाले होते. मुस्लिमांच्या धारणेनुसार पैगंबरांचं चित्र किंवा व्यंगचित्र काढणं निषिद्ध आहे.
 
त्याआधी एक वर्ष डेन्मार्कमधील वृत्तपत्राने मोहम्मद पैगंबरांसंदर्भात व्यंगचित्रं प्रकाशित केली होती.
 
पोलीस काय म्हणाले?
विल्क्स यांच्या मृत्यूसंदर्भात पोलिसांनी पत्रक जारी केलं आहे. ट्रक आणि गाडी यांची टक्कर कशी झाली ते समजू शकलेलं नाही. सुरुवातीच्या तपासाप्रमाणे या अपघातात अन्य कोणाचा सहभाग दिसत नाहीये.
 
पोलिसांच्या प्रवक्त्यांनी एएफपीशी बोलताना सांगितलं की, अन्य केसप्रमाणेच या घटनेचा तपास करण्यात येत आहे. या अपघातात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. विशेष गुन्हे शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे.
स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, अपघातावेळी विल्क्स प्रवास करत असलेली गाडी प्रचंड वेगाने धावत होती. एका प्रत्यक्षदर्शीने अफटोनब्लैडेट वृत्तपत्राला सांगितलं की, विल्क्स् यांच्या गाडीचं संतुलन ढासळलं होतं. वेगामुळे गाडी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेली.
 
समोरून येणाऱ्या ट्रकला थांबण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि ट्रक आणि गाडीमध्ये जोरदार टक्कर झाली.
 
अपघातांतर गाडीला आग लागली. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आपात्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
 
व्यंगचित्रावरून वाद
विल्क्स यांनी तयार केलेल्या व्यंगचित्राने गदारोळ झाला होता. परिस्थिती सुरळीत करण्यासाठी स्वीडनचे तत्कालीन पंतप्रधान फ्रेडरिक रेनफेल्ड यांनी 22 मुस्लीमबहुल देशांच्या राजदूतांशी चर्चा केली होती.
 
यानंतर काही दिवसातच इराकमध्ये सक्रिय अल कायदा संघटनेनं विल्क्स यांचा जीव घेणाऱ्या व्यक्तीसाठी एक लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस जाहीर केलं.
 
2015 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आधारित परिसंवादात बोलत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हल्ल्याचं लक्ष्य मीच होतो असं विल्क्स यांनी म्हटलं होतं. त्या हल्ल्यात एका चित्रपट दिग्दशर्काचा मृत्यू झाला होता.
 
कारकीर्दीत विल्क्स यांना सर्वाधिक प्रसिद्धी पैगंबरांच्या व्यंगचित्रामुळे मिळाली. आपल्या चित्रांच्या माध्यमातून अधिकार मिळवण्याबाबत ते भाष्य करत.
 
स्वीडनच्या दक्षिणेकडील संरक्षित भागात विना परवानगी त्यांनी एका मुलीचं चित्र काढलं. त्यासंदर्भात त्यांना कायदेशीर लढाईला सामोरं जावं लागलं.
 
कर्ट वेस्टरगार्ड
याच वर्षी जुलै महिन्यात पैगंबरांचं व्यंगचित्र रेखाटणारे डेन्मार्कचे व्यंगचित्रकार कर्ट वेस्टरगार्ड यांचं निधन झालं होतं. ते 86 वर्षांचे होते. प्रदीर्घ काळापासून ते आजारी होते.
वेस्टरगार्ड यांनी पैगंबरांच्या काढलेल्या चित्राला काहींनी कलात्मक शैली म्हणून कौतुक केलं होतं. मात्र मुस्लिमांमधील मोठ्या वर्गाने याला आक्षेप घेतला होता.
 
2005मध्ये वेस्टरगार्ड यांनी पैगंबरांचं वादग्रस्त व्यंगचित्र काढलं होतं. त्याची जगभर चर्चा झाली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दरड कोसळून अडीच महिने उलटल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार