Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चीनचा आरोप, भारतीय सैनिकांनी केलं LACचं उल्लंघन

चीनचा आरोप, भारतीय सैनिकांनी केलं LACचं उल्लंघन
, मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (17:34 IST)
भारतातल्या चिनी दूतावासाने म्हटलंय की, भारतीय सैनिकांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) वर वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या सीमा ओलांडली आहे.
 
चीनच्या दूतावासाने ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. "चीनने अधिकृतरित्या भारताने आपल्या सैनिकांना सीमारेषेवर नियंत्रणात ठेवावं असं म्हटलंय," अशा आशयाचं ट्वीट त्यांनी केलंय.
 
त्याबरोबरच चीनच्या दूतावासाने आपल्या वेबसाईटचा एक स्क्रीनशॉटही टाकला आहे ज्यात म्हटलंय की दूतावासाचे प्रवक्ते जी रोंग यांनी भारत-चीन सीमेवरच्या परिस्थितीबद्दल मीडियाला ही माहिती दिली आहे.
 
त्यांना भारतीय सैनिकांनी पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावर अवैधरित्या घुसखोरी केली आहे का, याबद्दल प्रश्न विचारला गेला होता. याचं उत्तर देताना ते म्हणाले की 31 ऑगस्टला भारतीय सैनिकांनी भारत-चीन दरम्यानच्या सहमती रेषेचं उल्लंघन केलं आहे.
 
त्यांनी म्हटलं की भारताच्या या कृतीमुळे सीमेवर तणाव वाढला आहे. चीनने भारताला सांगितलंय की सीमाभागात आपल्या सैनिकांवर नियंत्रण ठेवा, चौक्या पहाऱ्यांचा सन्मान करा आणि ज्या सैनिकांनी अवैधरित्या सीमा पार केलीये त्यांना परत बोलवा.
 
दुसरीकडे भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन भारत-चीन सीमेवरच्या परिस्थितीचा आढावा घेतला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह याबाबतीत आज उच्चस्तरीय बैठक बोलवू शकतात. याआधी, सोमवारी भारताने म्हटलं होतं की चिनी सैनिकांनी पूर्व लडाखच्या सीमेवर झालेल्या सहमती रेषेचं उल्लंघन केलं आहे.
 
सरकारने म्हटलं होतं की चिनी सैनिकांनी चिथावणीखोर कृती करत सीमेवरची जैसे थी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैन्य संवादातून शांतता प्रस्थापित करण्याच्या बाजूने असलं तरी आपल्या देशाची अखंडता सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे.
 
भारतीय सैन्याचं म्हणणं पीआयबीकडून प्रसिद्ध केलं गेलं आहे. त्यानुसार चिनी सैनिकांनी 29-30 ऑगस्टच्या रात्री अवैधरित्या LAC ओलांडली. तेव्हा झटापटही झाली. मात्र चीनने अशा घुसखोरीचा इन्कार केला आहे.
 
भारत आणि चीन दरम्यान 3500 किलोमीटर लांब सीमा आहे आणि दोन्ही देशांमध्ये सीमावाद सुरू आहे. या वादावरून दोन्ही देशात 1962 साली युद्धही झालेलं आहे.
 
याआधीही लडाखच्याच गलवान व्हॅलीमध्ये 15 जूनला दोन देशांमध्ये चकमक झाली होती यात 20 भारतीय सैनिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये चर्चेच्या फेऱ्या होत आहेत पण अजूनही तणाव कायम आहे.
 
या चकमकीनंतर सैनिकांना मागे घेण्यासाठी दोन्ही देशांमध्ये करार झाले पण चिनी सैनिक अजूनही या भागात आहेत आणि भारताने चीनने पूर्ण सैन्य मागे घेतलं असं म्हटलेलं नाही.
 
चिनी सैनिक अनेक भागात, विशेषतः पँगाँग-त्सो या भागात ठाण मांडून आहेत.
 
भारताचं म्हणणं आहे की चिनी सैनिक पूर्व लडाखमधून मागे हटले पाहिजेत. मागच्या आठवड्याच परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं होतं की चीनने आपलं सैन्य मागे घेतल्यानंतरच परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रकाश आंबेडकर: 'कोरोनामुळे मृत्यू होत आहेत याला पुरावा काय आहे?'