Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनावॅक : चीनमधील कोरोना लशीची किंमत किती आणि ती किती परिणामकारक?

कोरोनावॅक : चीनमधील कोरोना लशीची किंमत किती आणि ती किती परिणामकारक?
, शनिवार, 12 डिसेंबर 2020 (13:05 IST)
कोव्हिड-19 आजारावर लवकारत लवकर लस विकसित करून ती बाजारात आणण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू आहेत. मात्र, चीनची 'कोरोनावॅक' ही कोरोना विषाणूवरची लस जगातल्या इतर देशांमध्ये निर्यातही होऊ लागली आहे. याचाच अर्थ कोरोना विषाणूवरील लशीच्या बाबतीत चीन इतरांच्या तुलनेत पुढे असल्याचं दिसतं.
 
सायनोवॅक या चीनच्या बायोफार्मा कंपनीने तयार केलेली 'कोरोनावॅक' ही लस वापरासाठी इंडोनेशियाला निर्यात करण्यात आली आहे. जानेवारीपर्यंत अतिरिक्त 18 लाख डोस देण्यात येतील.
 
मात्र, या लशीच्या शेवटच्या टप्प्यातली चाचणी अजून झालेली नाही. त्यामुळे ही लस किती परिणामकारक असेल, यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत.
 
कोरोनावॅक इतर लशींपेक्षा किती वेगळी आहे?
कोरोनावॅक लस शरीरात मृत कोरोना विषाणूचे काही अंश सोडते आणि शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा त्या विषाणूचा सामना करण्यासाठी जागृत होते. शरीर स्वतःच विषाणूचा सामना कसा करायचा ते शिकतं. शिवाय शरीरात सोडलेले विषाणू मृत म्हणजेच निष्क्रीय असल्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट होत नाही.
मोडर्ना आणि फायझर या लशी एमआरएनए प्रकारातल्या आहेत. याचा अर्थ कोरोना विषाणूचे जेनेटिक कोड शरीरात इंजेक्ट केले जातात. यामुळे शरीर स्वतःच व्हायरल प्रोटीन तयार करतो. मात्र, संपूर्ण व्हायरस तयार करत नाही. शरीरात व्हायरल प्रोटीन तयार झाल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती विषाणूचा मुकाबला करते.
ननयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीत सहप्राध्यापक असलेले लुओ दहाई सांगतात, "कोरोनावॅक पारंपरिक पद्धतीने तयार करण्यात आलेली लस आहे. यापूर्वीसुद्धा अनेक लशी बनवण्यासाठी याच पद्धतीचा वापर करण्यात आला आहे."
 
रेबीजच्या लशीचं उदाहरण देत ते सांगतात, "एमआरएनए लस नव्या पद्धतीची लस आहे आणि अशा प्रकारच्या लशीमुळे रोगाला आळा बसल्याचं इतर कुठलं उदाहरण आज तरी नाही."
ऑक्सफोर्डच्या लशीप्रमाणेच सायनोवॅक कंपनीची लसदेखील साध्या रेफ्रिजरेटरमध्ये 2 ते 8 अंश सेल्सिअसवर साठवून ठेवता येते.
 
मोडर्नाच्या लशीला उणे 20 अंश सेल्सिअस तर फायझरच्या लशीला उणे 70 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असते. याचाच अर्थ अतिशीतपेट्यांची व्यवस्था नसणाऱ्या विकसनशील देशांमध्ये ऑक्सफोर्ड आणि सायनोवॅक या लशी अधिक सोयीच्या ठरू शकतात.
 
कोरोनावॅक किती परिणामकारक आहे?
सध्या यावर ठामपणे सांगता येणार नाही. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलनुसार कोरोनावॅकच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांचीच माहिती सध्या उपलब्ध आहे.
 
लॅन्सेटमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या या पेपरचे लेखक झू फेंगकी यांनी दिलेल्या माहितीनुसार या लशीच्या पहिल्या चाचणीमध्ये 144 लोकांनी भाग घेतला, तर दुसऱ्या टप्प्यात 600 लोकांनी. या चाचण्यांच्या परिणांवरून आणीबाणीच्या परिस्थितीत ही लस वापरली जाऊ शकते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
सप्टेंबर महिन्यात सायनोवॅक कंपनीचे यिन म्हणाले होते, "हजारांहून अधिक लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली आहे. यापैकी अगदी मोजक्या लोकांमध्येच थकवा आणि इतर त्रास दिसून आले. अशांची संख्या 5 टक्क्यांहून जास्त नव्हती."
 
कोरोनावॅकच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणी ऑक्टोबर महिन्यात ब्राझिलमध्ये सुरू झाली. कोरोना संसर्गाच्या बाबतीत ब्राझिल जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, एका वॉलेंटिअरच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात चाचणी थांबवण्यात आली. मात्र, मृत्यूचं कारण लस नसल्याचं स्पष्ट झाल्यावर चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली.
 
ब्राझिलमध्ये बुटेनटेन ही संस्था सायनोवॅक कंपनीची पार्टनर आहे. सायनोवॅक आपल्या चाचण्यांचे निकाल 15 डिसेंबरपूर्वी प्रकाशित करेल, असं बुटेनटेनचं म्हणणं आहे.
 
सध्या फारशी माहिती उपलब्ध नसल्यामुळे लशीच्या परिणामाविषयी फार सांगता येणार नाही, असं प्रा. लुओ यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, "प्राथमिक डेटावरून कोरोनावॅक परिणामकारक लस आहे, असं म्हणता येईल. मात्र, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांच्या परिणामांची वाट बघायला हवी."
 
कंपनी एका वर्षात किती डोस बनवू शकते?
याविषयी सायनोवॅक कंपनीच्या प्रमुखांनी चीनच्या सीजीटीएन टीव्ही नेटवर्कशी बातचीत केली. 20 हजार चौरस मीटरवर पसरलेल्या प्रकल्पातून वर्षभरात 30 कोटी डोस तयार होऊ शकतील, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं.
 
प्रत्येक लशीचे दोन डोस दिले जातात. याचाच अर्थ वर्षभरात केवळ 15 कोटी लोकांनाच ही लस मिळू शकते. ही संख्या चीनच्या लोकसंख्येच्या एक दशमांश इतकी आहे.
असं असलं तरी इंडोनेशियात या लशीची पहिली खेप पोहोचली आहे. शिवाय, तुर्की, ब्राझिल आणि चिलीसोबतही चीनने या लशीचा करार केला आहे.
 
नुकतीच एक बातमी आली होती. त्यानुसार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी लस खरेदीसाठी आफ्रिकन देशांसाठी 2 अब्ज डॉलर्स, लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियन राष्ट्रांसाठी एक अब्ज डॉलर्सचा निधी कर्ज देण्यासाठी राखून ठेवला आहे. मात्र, कर्जासाठीच्या अटी काय असतील, याची फारशी माहिती सध्यातरी उपलब्ध नाही.
 
मॅरिक्सचे विश्लेषक जेकब मार्डेल यांनी एबीसी न्यूजला सांगितलं, "या लाईफ सेव्हिंग तंत्रज्ञानाचा वापर चीन स्वतःच्या व्यावसायिक आणि कूटनितीक फायद्यासाठी करेल."
 
या लशीची किंमत किती असेल, हे अजून सांगण्यात आलेली नाही. मात्र, बीबीसीने यावर्षीच्या सुरुवातीला चीनच्या यीवू शहरात पाहिलं, त्यावेळी तिथल्या नर्स 400 यूआन म्हणजेच 60 डॉलर्सना इंजेक्शन घेत होत्या.
 
इंडोनेशियामध्ये या लशीची किंमत 2 लाख रुपिया म्हणजे जवळपास 13.60 डॉलर्स असेल, असं बायो फार्मा या इंडोनेशियाच्या सरकारी कंपनीने सांगितलं आहे.
 
याचाच अर्थ ऑक्सफर्डच्या लशीपेक्षा कोरोनावॅक महाग आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या एका डोसची किंमत 4 डॉलर्स आहे. मात्र, मोडर्ना लशीपेक्षा ही लस बरीच स्वस्त आहे. मोडर्ना लशीच्या एका डोसची किंमत 33 डॉलर्स आहे.
 
2021 साली 50 कोटी डोस तयार करणार असल्याचं मोडर्नाने म्हटलं आहे. तर 2021 सालच्या पहिल्या तिमाहित 70 कोटी डोस तयार करू, असं ऑक्सफर्डचं म्हणणं आहे.
 
चीनमधल्या इतर लसींचं काम कुठल्या टप्प्यावर आहे?
चीनमध्ये इतर चार लशींवर काम सुरू आहे. या लशींचं कामही अंतिम टप्प्यावर आलं आहे. यापैकी सायनोफार्म नावाची लस आतापर्यंत 10 लाख लोकांना देण्यात आली आहे. सायनोफार्मनेही तिसऱ्या टप्प्याच्या चाचणी निष्कर्ष अजून सार्वजनिक केलेले नाहीत.
नॅशनल यूनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरचे प्राध्यापक डेल फिशर यांनी सीएनबीसीशी बोलताना सांगितलं, "लस विकसित करण्याचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत अधिकृत करण्याचा मार्ग अवलंबिला जाऊ शकतो. मात्र, त्याआधी तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांच्या परिणामांचा अभ्यास करणं सामान्य बाब आहे."
 
मात्र, अशा प्रकारचं पाऊल उचलणं, 'पारंपरिक नाही' आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ते स्वाकार्हदेखील नाही, असं प्रा. फिशर म्हणतात.
 
चीनमधली परिस्थिती पाहिल्यास विषाणू संसर्गाचं बहुतांश प्रमाण हे मर्यादितच होतं आणि जनजीवन नव्या पद्धतीने का होईना मात्र हळूहळू सामान्य होताना दिसतंय.
 
सायनोफार्मची 9 डिसेंबर रोजी यूएईमध्ये नोंदणी करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना जुलैमध्ये सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम निकालांमध्ये लस 86% परिणामकारक असल्याचं दिसून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. लशीचा वापर कसा करण्यात येईल, हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही.
 
लसीच्या शर्यतीतील इतर स्पर्धक कोणते?
ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस : ही व्हायरल व्हेक्टर प्रकारातली लस आहे. यात जेनेटिकली मॉडिफाईड (जनुकीयरित्या सुधारित) विषाणूचा वापर करण्यात आला आहे. फ्रिजमध्ये सामान्य तापमानाला ही लस साठवून ठेवता येते. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 62 ते 90% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं आहे. या लशीचा प्रत्येक डोस 4 डॉलर असेल.
मॉडर्नाची लस : ही एमआरएनए प्रकारातली कोरोना लस आहे. विषाणूच्या जेनेटिक कोडचे काही अंश वापरून ही लस तयार करण्यात आली आहे. ही लस साठवण्यासाठी उणे 20 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. शिवाय, ही लस जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंतच साठवून ठेवता येते. या लशीचेही दोन डोस घ्यावे लागतील. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 95% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं आहे. 33 डॉलर्स प्रति डोस, अशी या लशीची किंमत असणार आहे.
 
फायझरची लस : मोडर्ना लशीप्रमाणेच फायझरची लसही एमआरएनए प्रकारातली आहे. आतापर्यंतच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 95% यशस्वी ठरली आहे. ही लस उणे 70 अंश सेल्सिअसवर स्टोअर करावी लागते. या लशीचेही दोन डोस घ्यावे लागतील आणि प्रत्येक डोसची किंमत जवळपास 15 डॉलर्स एवढी असणार आहे.
 
गोमालेयाची स्पुतनिक-व्ही लस : ऑक्सफोर्डप्रमाणे ही व्हायरल व्हेक्टर प्रकारातील लस आहे. आतापर्यंतच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 92% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं आहे. फ्रिजमध्ये सामान्य तापमानावर ही लस साठवता येते. या लशीचेही दोन डोस घ्यावे लागतील. या लसीचा प्रत्येक डोस 7.50 डॉलर असणार आहे.
 
याशिवाय रशियाने स्पुतनिक नावाची लस वापरायला सुरुवात केली आहे. तर चीनच्या सैन्याने कॅनसायनो बायोलॉजिक्स या कंपनीने विकसित केलेल्या लसीला मंजुरी दिली आहे. या दोन्ही लशी ऑक्सफोर्डच्या लसीप्रमाणे व्हायरल व्हेक्टर प्रकारातील आहेत.
 
(स्रोत : लस विकसित करणारी कंपनी आणि जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार)
 
(इवेट टॅनच्या मदतीने रिपोर्ट तयार करण्यात आला आहे.)

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शरद पवार : 80 वर्षं, 8 निर्णायक घटना