पाकिस्तानच्या सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने देशातील चिनी गुंतवणुकीत घट होत असल्याची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. दुसरीकडे अमेरिकन गुंतवणूक वाढत असल्याचंही यामधून समोर आलं आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (जुलै-सप्टेंबर) पाकिस्तानातील चिनी गुंतवणूक ही 10 कोटी डॉलर इतकी होती, तर गेल्या वर्षी हीच रक्कम 20 कोटी डॉलर इतकं होती.
पाकिस्तानात चीनची सर्वात मोठी गुंतवणूक चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर (CPEC) आहे. याठिकाणी रस्ते, वीजप्रकल्प, रेल्वे मार्ग तसंच औद्योगिक क्षेत्र यांच्या बांधकामांचा समावेश आहे.
पाकिस्तानात मागच्या सरकारच्या म्हणजेच मुस्लीम लीगच्या कार्यकाळात CPEC प्रकल्पावर काम सुरू झालं होतं.
याअंतर्गत अनेक प्रकल्पांचं उद्घाटन झालं. त्यापैकी काही प्रकल्प पूर्णही झाले आहेत. पण पाकिस्तानमध्ये 'तेहरीक ए इन्साफ' पक्षाचं सरकार अस्तित्वात आल्यापासून याचा वेग मंदावल्याचं म्हटलं जात आहे.
कारण काय?
पीटीआय पक्षाच्या राजकीय विरोधकांनी सरकारवरच याचे आरोप लावले आहेत. तज्ज्ञ आणि आर्थिक विश्लेषकांचंही मत यासंदर्भात सारखंच आहे.
तज्ज्ञांच्या मते, पहिल्या टप्प्यातील इन्फ्रास्ट्रक्चर आणि ऊर्जा प्रकल्पांचं काम पूर्ण झालं आहे. सध्या काम सुरू असलेल्या प्रकल्पांची गुंतवणूक आधीच आली आहे. त्यामुळे सध्या गुंतवणुकीत घट पाहायला मिळत आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.
दुसरीकडे विद्यमान सरकारच्या कार्यकाळात सीपीईसी अंतर्गत कोणतीही नवी योजना सुरू केली नाही, हेसुद्धा एक कारण आहे.
सीपीईसीकरिता पंतप्रधानांचे विशेष सहायक असलेल्या खालिद मन्सूर यांनी हा आरोप फेटाळून लावला.
सीपीईसी मध्ये काम मंद गतीने सुरू आहे, हा बिनबुडाचा आरोप असल्याचं ते म्हणाले.
पाकिस्तानातील चिनी गुंतवणुकीत घट
चीनमधून पाकिस्तानमध्ये येणारी गुंतवणूक प्रामुख्याने सीपीईसी अंतर्गत असते. सरकारी आकडेवारीनुसार चीनकडून सर्वात मोठी गुंतवणूक 2019 मध्ये झाली होती. त्याची रक्कम 30 कोटी डॉलर इतकी होती.
यानंतर यामध्ये सातत्याने घट पाहायला मिळाली. पुढे ही गुंतवणूक 20 कोटी डॉलरपेक्षाही खाली आल्याचं दिसून येतं.
एप्रिल 2020 मध्ये ही रक्कम फक्त 80 लाख डॉलरपर्यंत खाली आली होती. याचं प्रमुख कारण कोरोना व्हायरस मानलं गेलं. त्यानंतर सप्टेंबर 2020 मध्ये गुंतवणुकीत पुन्हा वाढ होऊन ती 13 कोटी डॉलरपर्यंत गेली.
पुन्हा जानेवारी 2021 महिन्यात ही गुंतवणूक पाच कोटी डॉलरपर्यंत खाली आली, तर सप्टेंबर 2021 महिन्यात फक्त अडीच कोटी डॉलरची गुंतवणूक राहिली आहे.
सीपीईसीच्या योजना पूर्ण होत असल्यानेच ही घट पाहायला मिळत असल्याचं डार्सन सिक्युरिटीचे आर्थिक विश्लेषक युसूफ सईद यांनी सांगितलं.
अर्थतज्ज्ञ आबिद सिलहारी यांनीही तेच कारण यासाठी नमूद केलं.
अर्थतज्ज्ञ डॉ. इकराम उल हक यांनी आणखी एक कारण स्पष्ट केलं. चिनी इंजिनिअर्सवर पाकिस्तानात हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. संरक्षणविषयक कारणही यामागे असू शकतं, असं हक म्हणाले.
चीनची बहुतांश गुंतवणूक रस्ते आणि ऊर्जा प्रकल्पांमध्ये झाली आहे. ही कामे पहिल्या टप्प्यात नवाज सरकारमध्येच झाली होती. दुसरा टप्पा औद्योगिक क्षेत्रात आहे. पण त्याचं काम अजूनही सुरू झालं नाही, असं पाकिस्तानचे माजी योजना आणि विकास मंत्री अहसान इकबाल यांनी म्हटलं.
विद्यमान सरकारच्या कार्यकाळात औद्योगिक क्षेत्रात काहीच काम न झाल्यामुळेही ही घट पाहायला मिळत असल्याचा आरोप इकबाल यांनी केला आहे.
इम्रान खान सरकारचं स्पष्टीकरण
वरील सर्व आरोपांवर पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहायक खालिद मन्सूर यांनी स्पष्टीकरण दिलं.
"सीपीईसीमध्ये आतापर्यंत 25 अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात औद्योगिक क्षेत्रातील कामे वेगाने सुरू आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच जेसीसीची बैठक झाली. त्यामध्ये औद्योगिक, कृषि, टेलिकॉम आणि वैज्ञानिक क्षेत्रातील कामांना वेग देण्यात येणार आहे, " असं ते म्हणाले.
पण कोणत्या सरकारच्या काळात एकूण किती गुंतवणूक झाली, याची आकडेवारी त्यांनी दिली नाही.
चीनच्या तुलनेत अमेरिकन गुंतवणूक वाढली?
सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानच्या आकडेवारीनुसार चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील अमेरिकन गुंतवणूक चीनपेक्षाही जास्त आहे.
अमेरिकेने तेल, गॅस आणि टेलिकॉम क्षेत्रात गुंतवणूक केलेली असू शकते, असं युसूफ सईद म्हणाले.
त्यांच्या मते, अमेरिकन कंपन्यांकडून सातत्याने अशी गुंतवणूक होत असते. पण आताच याबाबत प्रतिक्रिया देता येणार नाही.
पण माजी मंत्री इकबाल यांनी वेगळाच दावा केला. अमेरिकेने दबाव टाकल्यानंतर त्यांच्याकडून काही ना काही मिळेल या अपेक्षेनेच सीपीईसी योजनेचं काम संथगतीने करण्यात येत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
त्यांच्या मते, सरकारच्या धोरणांमुळे चीनची गुंतवणूक कमी तर झाली. पण अमेरिकाही पाकिस्तानवर विश्वास ठेवत नाही, असं त्यांनी म्हटलं.
मात्र, पंतप्रधानांचे विशेष सहायक खालिद मन्सूर गुंतवणुकीबाबत सकारात्मकच आहेत.
त्यांच्या मते, पाकिस्तानात आगामी काळात चिनी गुंतवणूक वाढण्याची शक्यता आहे. सध्या पाच औद्योगिक क्षेत्रांमध्ये काम सुरू आहे. तिथं गुंतवणूक नक्की येईल, असं ते म्हणाले.