पुणे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मेणाचा पुतळा लंडनमधील नामांकित मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यासाठी बार्टीकडून प्रयत्न केले जात आहेत. यासाठी संग्रहालयाशी संपर्क साधण्यात आला असून हा मेणाचा पुतळा बनविण्यासाठी 30 ते 40 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत बोलताना वारे म्हणाले, डॉ. आंबेडकर यांनी 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पीएचडीची पदवी संपादन केली होती. त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हा प्रबंध त्याठिकाणी सादर केला होता. या घटनेच्या शताब्दीनिमित्त लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) तर्फे आंतरराष्ट्रीय परिषद घेण्यात येणार आहे. त्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. तसेच बाबासाहेबांच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान असलेले मुंबई, ऑक्सफर्ड व केंब्रिज विद्यापीठांनी या परिषदेत सहभागी व्हावे, यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor