Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'नोकरी लागल्यानंतर दीड महिन्यातच कामावरून काढलं, मेटाने चार महिन्यांचा पगार दिला पण...'

'Fired after one and a half months after getting the job
, रविवार, 20 नोव्हेंबर 2022 (17:06 IST)
ट्विटर, मेटा आणि अॅमेझॉनसारख्या टेक जायंट कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारी आता नव्या नोकऱ्यांच्या शोधात आहेत. नोकऱ्यांवर नजर ठेवून असणाऱ्या Layoffs.fyi नुसार, जगभरातील 120,000 लोकांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या आहेत.
 
अमेरिकेत एच 1 बी आणि इतर व्हिसावर काम करणाऱ्या भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. आता या भारतीयांच्या सुद्धा नोकऱ्या गेल्या आहेत.
 
अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात राहणाऱ्या पत्रकार सविता पटेल यांनी बऱ्याच भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधला. यातल्या अनेकांना एकतर नवी नोकरी शोधावी लागेल नाहीतर पुन्हा भारतात परतावं लागेल.
 
सौम्या अय्यर अमेरिकेतल्या एका मोठ्या टेक कंपनीत काम करत होती. तिचीही आता नोकरी गेलीय. ती सांगते, "मी याला टेक पॅंडेमिक म्हणेन. अमेझॉन मधून 10 हजार लोक, तर ट्विटर मध्ये काम करणाऱ्या अर्ध्या लोकांना कामावरून कमी करण्यात आलं."
 
अय्यर लिफ्ट नावाच्या एका कॅब कंपनीत चार वर्ष काम करत होती. आता तिला कामावरून कमी केलंय. ती सांगते, "माझा एक मित्र आणि त्याच्या बायकोला सुद्धा कामावरून कमी केलंय. टेक क्षेत्रातील ही महामारी आहे असं म्हणता येईल."
 
'आई वडिलांना माहिती नाहीये'
अय्यर त्या कंपनीत लीड प्रोजेक्ट डिझायनर म्हणून काम करत होती. नोव्हेंबर महिन्यात अमेरिकन टेक कंपन्यांनी ज्या कुशल कामगारांना कामावरून काढलंय त्यापैकी ती एक आहे. तिने अजूनही तिच्या आईवडिलांनी याबाबत काहीच कळवलेलं नाहीये.
 
तिचा तिच्यावर विश्वास आहे की, तिला नवी नोकरी मिळेल. पण तिला चिंता लागून राहिली आहे ती तिच्या एज्युकेशन लोनची. कारण अजून ते कर्ज फेडणं बाकी आहे. तिने भारतातील आणि अमेरिकेतील प्रतिष्ठित कॉलेजेस मधून डिग्री घेतलीय.
 
ती अमेरिकेत ओ-1 व्हिसावर काम करत होती. हा व्हिसा असाधारण क्षमता आणि कर्तृत्वाच्या आधारावर दिला जातो. पण जर हा व्हिसा असणाऱ्या व्यक्तीची नोकरी गेली तर तो फक्त 60 चं दिवस अमेरिकेत राहू शकतो. 
 
ती सांगते, "मला नवी नोकरी मिळेल याची खात्री करण्यासाठी त्यांनी मला आणखीन एक महिना वाढवून दिलाय. म्हणजे आता माझ्याकडे एकूण तीन महिने आहेत."
 
अमेरिकेच्या वर्कर एडजस्टमेंट अँड रिट्रेनिंग नोटिफीकेशन अंतर्गत, एखाद्या कंपनीला जर आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करायचं असेल तर त्यासाठी 60 दिवसांचा नोटीस पिरियड द्यावा लागतो.
 
कर्ज फेडण्याचं टेन्शन
या लोकांनी ठरवलेले सगळे प्लॅन्स बिघडलेत. त्यांच्याकडे आता वेळ कमी आहे, आणि त्यांना टेन्शन आलं आहे.
 
काही लोकांजवळ फॅमिलीचा सपोर्ट आहे. पण काहींना आजही हजारो डॉलर्सचं कर्ज फेडायचं आहे. नमन कपूरजवळ F-1 (OPT) व्हिसा आहे. तो मेटा मध्ये प्रॉडक्शन इंजिनीअर म्हणून काम करायचा. त्याने न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून मास्टर्स करण्यासाठी उसने पैसे घेतले होते.
 
तो अगदी निराश झालाय. त्याच्या आवाजातून ते जाणवत होतं. तो सांगतो, "अमेरिकेत शिक्षण करत असताना वर्क एक्सपीरियन्स देखील मिळतो. आणि इथं शिकायला यायचं हेच मुख्य कारण होतं. मी माझ्या खर्चासाठी काम केलंय."
मेटामधून 11 हजार लोकांना काढलं
मुलाखतीचे अनेक टप्पे पार पाडल्यानंतर त्याला मेटामध्ये नोकरी मिळाली. पण अवघ्या सात आठवड्यांत त्याला कामावरून कमी केलंय.
 
तो सांगतो, "9 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजता मला काढून टाकल्याचा ईमेल आला. मेटाने मला चार महिन्यांचा आगाऊ पगार दिला पण आता मला नवी नोकरी शोधण्यासाठी किंवा मग परत भारतात येण्यासाठी फक्त तीनच महिने उरलेत."
 
मेटाने जगभरातून 11 हजार लोकांना कामावरून कमी केलंय. पण कोणत्या देशातून किती लोकांना कमी केलंय याची माहिती कंपनीने दिलेली नाही. मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटलंय की, ज्यांना कामावरून कमी केलंय, अशांना 16 आठवड्यांची बेसिक सॅलरी आणि प्रत्येक वर्षासाठी 2 आठवड्यांचा पगार देण्यात येईल.
 
ज्या लोकांना कामावरून काढलंय त्यातले काही लोक हल्लीच काही वर्षांपूर्वी अमेरिकेत आलेत. त्यातल्या काही लोकांसाठी तर अमेरिका आता त्यांचं घर बनलंय. कारण ते बऱ्याच वर्षांपासून तिथं काम करतायत.
 
'मिस इंडिया' कॅलिफोर्निया स्पर्धेची विजेती असलेली सुरभी गुप्ता नेटफ्लिक्सच्या इंडियन मॅचमेकिंग सीरिज मध्ये झळकली होती. ती 2009 पासून अमेरिकेत राहते. ती मेटामध्ये प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत होती. या नोव्हेंबरमध्ये तिलाही कामावरून कमी करण्यात आलंय.
 
ती सांगते, "माझं सगळंच व्हिसावर अवलंबून आहे. मी 15 वर्षांपासून मेहनत करते आहे. मी आज कोणावरही अवलंबून नाहीये. आता मला नवी नोकरी शोधावी लागेल. आता डिसेंबर महिना आलाय, सुट्ट्या असल्यामुळे हायरिंग जास्त होत नाही. आता सततच्या परीक्षेला मी कंटाळले आहे."
 
ज्या लोकांच्या नोकऱ्या गेल्यात ते लोक फक्त नवी नोकरी शोधतायत असं नाही तर त्यांना अशी कंपनी हवी आहे जी त्यांच्या व्हिसाचं कामही करून देईल. व्हिसा ट्रान्सफरची प्रोसेस खूप गुंतागुंतीची आहे, यासाठी त्यांना वेळ मिळावा ही अपेक्षा आहे.
 
सॅन जोस मध्ये राहणाऱ्या इमिग्रेशन अॅटर्नी स्वाती खंडेलवाल सांगतात की, शेवटच्या क्षणी नोकरी शोधणं खूप अवघड असतं.
बरेच जण मदतीसाठी पुढे सरसावले
त्या सांगतात की, "जर तुम्हाला नोकरी देणारा 60 दिवसांच्या आत तुमचा व्हिसा ट्रान्सफर करू शकला नाही तर त्या व्यक्तीला अमेरिका सोडून जावं लागेल. जेव्हा कागदोपत्री प्रोसेस पूर्ण होईल तेव्हा त्यांना परत बोलावलं जाईल. पण खरी मेख अशी आहे की, हे लोक भारतातच अडकतील, कारण वाणिज्य दूतावासात अपॉइंटमेंट कमी आहेत."
 
खंडेलवाल यांच्या मते, "अशा निर्णयांचा परिणाम खासकरून भारतीयांवर होतो हे आम्ही पाहिलंय. सल्ले घेण्यासाठी जे फोन कॉल्स येतायत त्यात वाढ झालीय. प्रत्येकजण चिंतेत आहे, अगदी ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत ते देखील. त्यांना भीती वाटते की, आता पुढच्या टप्प्यात त्यांनाही कामावरून कमी केलं जाईल का." अभिषेक गुटगुटिया सारखे लोक मदत करण्यासाठी पुढे सरसावलेत. बरीच मित्रमंडळी आणि सोबत काम करणारे लोक मदतीसाठी पुढे आलेत.
 
तो सांगतो, "मी झिनोची निर्मिती केलीय, कारण ज्यांच्या नोकऱ्या गेल्यात त्यांना लवकरात लवकर एखादी नोकरी मिळेल. सध्या यावर 15000 व्हिजिट्स आल्यात. माझ्या लिंक्डइन पोस्टवर सहा लाखांहून जास्त व्ह्यूज आहेत. जवळपास 100 कंडिडेट्स, 25 कंपन्या, 30 मेंटर्सने साइनअप केलंय. बऱ्याच इमिग्रेशन अटॉर्नीने मदत देऊ केलीय." 
 
मेटामध्ये काम करणारी विद्या श्रीनिवासन सांगते की, 'मेटा अल्युमनाय गाईड मध्ये सोबत काम करणाऱ्या लोकांनी मन जिंकली आहेत. तिची ऑनलाइन पोस्ट जवळपास 13 लाख लोकांनी पाहिली आहे.
 
तिच्यासोबत जे काही झालं त्याबाबत ती सांगते, "माझं काम चांगलं सुरू होतं. मला आश्चर्य वाटलं की कंपनी एवढ्या सगळ्या लोकांना कामावरून कमी करते आहे. त्या रात्री मला झोप आली नाही. मला माझा कम्प्युटर वापरणं पण अवघड झालं होतं. मला हे ब्रेकअप प्रमाणे वाटत होतं."
 
सौम्या अय्यर सांगते, "आम्ही कंपनी चांगली राहावी यासाठी काही पावलं उचलली होती. आम्हाला हे माहीत नव्हतं की याचा परिणाम आमच्यावर होणार आहे ते. जोपर्यंत तुमच्यावर वेळ येत नाही तोपर्यंत तुम्हाला परिस्थितीची जाणीव होत नाही."
 
Published by- Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नासाची चंद्र मोहीम यशस्वी , ओरियन कॅप्सूलने पृथ्वीचे चित्र पाठवले