फ्रेन्च कंपनीने बनविलेल्या जगातील हायड्रोजन रेल्वेची चाचणी जर्मनीत सुरू झाली आहे. या रेल्वेचा आवाज तर कमी होतो, शिवाय त्यातून केवळ पाणी बाहेर पडते. हाइडरेल असे या रेल्वेचे नाव आहे.
त्यात डिझेल इंजिनचेच तंत्रज्ञान वापरले आहे. मात्र इंजिनची रचना आणि इंधन वेगळे आहेत. या रेल्वेत डिझेलऐवजी फ्यूएल सेल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन भरण्यात येतात. ऑक्सिजनच्या साहाय्याने हायड्रोजन नियंत्रित पद्धतीने जळत राहतो आणि त्या उष्णतेने वीज निर्माण होते.
ही वीज लिथियम आयन बॅटरी चार्ज करते आणि रेल्वे धावू लागते. या रेल्वेतून धुराऐवजी वाफ आणि पाणी बाहेर पडते. ही रेल्वे बनविणार्या अलस्टॉमचे अधिकारी येंस स्प्रोटे यांच्या मते, ही नवी रेल्वे पारंपरिक डिझेल इंजिनच्या तुलनेत ६० टक्के कमी आवाज करते. ती पूर्णपणे उत्सर्जनमुक्त आहे. हिचा वेग आणि प्रवाशांना घेऊन जाण्याची क्षमताही डिझेल रेल्वेच्या समान आहे. एकदा हायड्रोजन भरल्यावर ही गाडी ६५० किलोमीटरचा प्रवास करू शकते.
जर्मनीतील पाच राज्ये या कंपनीकडून अशा पाच रेल्वे विकत घेणार आहेत. डेन्मार्क, नॉर्वे, इंग्लंड आणि नेदरलँड यांनीही ही रेल्वे विकत घेण्यात स्वारस्य दाखवले आहे.