दक्षिण चीनमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या अनेक अपघातांमध्ये किमान 15 जण ठार झाले असून तीन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे. चीनच्या अधिकृत शिन्हुआ वृत्तसंस्थेने वुपिंग काउंटीच्या माहिती कार्यालयाचा हवाला देत फुजियान प्रांतात भूस्खलनामुळे दोन इमारती उद्ध्वस्त झाल्या असून त्यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
नॅशनल ब्रॉडकास्टर सीसीटीव्हीने आपल्या अहवालात म्हटले आहे की युनान प्रांतात इतर पाच लोकांचा मृत्यू झाला आहे आणि तीन बेपत्ता आहेत. गुआंग्शी प्रदेशातील झिनचेंग काउंटीमध्ये शुक्रवारी तीन मुले पुराच्या पाण्यात वाहून गेली, त्यापैकी दोन ठार झाले आणि एकाला वाचवण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चक्रीवादळामुळे युन्नान प्रांतातील क्यूबेई काउंटीमधील रस्ते, पूल, दूरसंचार आणि वीज प्रकल्पांचे नुकसान झाले. हे ठिकाण व्हिएतनाम सीमेपासून 130 किमी अंतरावर आहे. वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांना ये-जा करताना अडचणी येत आहेत. प्रशासनाकडून मदत केली जात आहे.