Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरुंगात कसे जगतायेत?

Imran Khan
, शनिवार, 8 जून 2024 (13:25 IST)
गेले अनेक महिने तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना एकांतवासात ठेवलं असून त्यांच्या वकिलांना भेटू दिलं जात नसल्याचा दावा केला जातोय. मात्र, हा दावा खरा नसल्याचं पाकिस्तान सरकारचं म्हणणं आहे.
 
हा दावा पाकिस्तान सरकारने पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात औपचारिकपणे सादर केलेल्या कागदपत्रात करण्यात आला असून, यावर डेप्युटी ॲटर्नी जनरल राजा मुहम्मद शफकत अब्बासी यांच्या नावाचा उल्लेख आहे. पाकिस्तानच्या डेप्युटी ॲटर्नी जनरलने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांवर अदियाला कारागृहाच्या अधीक्षकांचीही स्वाक्षरी आहे.
 
या दस्तऐवजातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातील छायाचित्रांमध्ये इम्रान खान यांचे तुरुंगातील जीवन आणि सरकारने त्यांना देऊ केलेल्या सुविधांचा समावेश आहे. त्याचबरोबर या कागदपत्रांमध्ये वकील, राजकारणी आणि इम्रान खान यांच्या कुटुंबीयांच्या भेटींचा तपशीलही देण्यात आला आहे.
 
सरकारी दस्तऐवजानुसार, माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं तुरुंगातील जीवन कसं आहे हे पाहण्याआधी, त्या दस्तऐवजाबद्दल सरकारचं काय म्हणणं आहे हे जाणून घेऊ.
 
सरकारी दस्तऐवजात काय म्हटलंय?
सर्वोच्च न्यायालयात एनएबी दुरुस्ती प्रकरणादरम्यान, इम्रान खान यांनी व्हिडिओ लिंकवर हजर असताना सांगितलं होतं की, त्यांना एकांतात ठेवण्यात आलं आहे आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिलेली नाही.
 
इम्रान खान यांच्या याच विधानाचा संदर्भ देत केंद्र सरकारने प्रतिक्रिया देताना म्हटलंय की, या प्रकरणातील तथ्य बाहेर आणण्यासाठी तुरुंगात झालेल्या बैठकींचे रेकॉर्ड आणि बॅरेक्सची छायाचित्रे दिली जात आहेत.
 
तसेच न्यायालयाला योग्य आणि आवश्यक वाटल्यास, सादर केलेल्या तथ्यांची पडताळणी करण्यासाठी आयोग म्हणून न्यायिक अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल असं म्हटलंय.
 
आता या कागदपत्रांमधील छायाचित्रांमधून इम्रान खान यांचं तुरुंगातील आयुष्य कसं आहे हे समजून घेऊ. बीबीसीने स्वतंत्रपणे या छायाचित्रांची आणि दस्तऐवजातील दाव्यांची पडताळणी केलेली नाही. मात्र तहरीक-ए-इन्साफने इम्रान खानच्या या तुरुंगातील खोलीच्या छायाचित्रांना दुजोरा दिला आहे.
 
लहानशी खोली
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पीटीआयच्या अधिकृत पेजवर टाकण्यात आलेल्या सरकारी कागदपत्रांमध्ये एका खोलीचे छायाचित्र शेअर केले आहे. त्यावर पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना तुरुंगाच्या एका लहानशा कोठडीत ठेवण्यात आलं असून कोणतीही सुविधा नसल्याचं लिहिण्यात आलं आहे.
 
हे छायाचित्र पाहिल्यास एका बाजूला पलंग आणि दुसऱ्या बाजूला टेबल खुर्ची असलेली एक छोटी खोली दिसते.
 
चित्रातील खोलीच्या शेवटी भिंतीवर कूलरसह टीव्ही स्क्रीन लावलेली आहे.
 
मात्र, त्याच खोलीत पलंगाच्या मागे लहान भिंती असलेली एक छोटी खोली असून, त्याच्या शेजारी बसवलेले वॉश बेसिन पाहून हे शौचालय असल्याचं वाटतं.
 
'इम्रान खान तुरुंगात आलिशान जीवन जगत असल्याचा समज चुकीचा'
 
इम्रान खान यांच्या कायदेशीर टीमचा भाग असलेले वकील नईम हैदर पंजुता यांनी सांगितलं की, इम्रान खान तुरुंगात कोणत्या अवस्थेत जगत आहेत हे आज स्पष्ट झालं. ते तुरुंगात विलासी जीवन जगत असल्याचा समज चुकीचा आहे.
 
बीबीसीशी बोलताना त्यांनी दावा केलाय की, 'आज न्यायालयात जी छायाचित्रे दाखवली गेली, ती अ किंवा ब वर्गाची नाहीत. इम्रान खान यांना डेथ सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे.'
 
ते म्हणाले की, इम्रान खान आठ खोल्या वापरत असल्याचा दावा सरकारने यापूर्वी केला होता, परंतु ते 8 बाय 10 च्या एका खोलीत राहत आहेत.
 
"या खोलीत एकही एअर कंडिशनर नाही, नवाझ शरीफ यांना मिळत असलेल्या सुविधाही नाहीत."
 
इम्रान खान यांना पुस्तकं पुरविण्यात आलेली आहेत. जुल्फिकार अली भुट्टो यांना पुस्तकांची सोय करण्यात आली होती. शिवाय त्यांना तुरुंगातूनच पुस्तके लिहिण्याची परवानगी होती. इम्रान खान आतून काहीही लिहू शकत नाहीत. ते त्यांचे संदेश वकिलांच्या माध्यमातून पाठवतात.
 
इम्रान खान यांना तुरुंगात भेटायला आलेल्या पाहुण्यांच्या यादीबद्दल बोलताना नईम हैदर पंजुता म्हणाले की, इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर इम्रान खान यांना राजकीय लोकांशी बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु इम्रान खान यांना त्यांच्या मुलांशी बोलण्याची परवानगी नाही.
 
इम्रान खान यांचं स्वयंपाकघर
सरकारने न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये इम्रान खान यांच्यासाठी तुरुंगात स्वतंत्र स्वयंपाकघर असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
 
दस्तऐवजातील एका छायाचित्रात एक कपाटं दिसत आहे. यात असा दावा केलाय की इम्रान खान यांच्यासाठी अन्न आणि कोल्ड्रिंक्स ठेवण्यात आली आहेत.
 
कागदपत्रांमधील छायाचित्रात कोल्ड्रिंक्स, दलिया आणि स्पॅगेटीसह इतर खाद्यपदार्थ दिसत आहे.
 
या दस्तऐवजात असा दावा करण्यात आला आहे की, जेवणाचा मेनू इम्रान खान स्वत: ठरवतात.
 
इम्रान खान तुरुंगात कोणती पुस्तकं वाचतात?
न्यायालयाच्या कागदपत्रांमध्ये असा दावा करण्यात आलाय की इम्रान खान यांना त्यांच्या मागणीनुसार अभ्यासासाठी पुस्तकं देण्यात आली आहेत. या कागदपत्रांमध्ये या पुस्तकांची छायाचित्रेही सरकारने न्यायालयात सादर केली आहेत.
 
या चित्रात तेराव्या शतकातील सुफी कवी मौलाना जलालुद्दीन रुमी, दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती आणि देशातील वांशिक भेदभावाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक मानले जाणारे नेते नेल्सन मंडेला यांची पुस्तकं दिसत आहेत. कवी अल्लामा इक्बाल यांच्या जीवनावरील पुस्तकांचाही समावेश आहे.
 
याशिवाय व्हाई स्टेट्स फेल, इब्न खलदुनचे शाहरा अफाक, अनातोले लेव्हिनचे पाकिस्तान अ हार्ड कंट्री, द ब्रिटीश इन इंडिया, द सील्ड नेक्टार, इस्लामच्या पैगंबरांच्या जीवनावरील पुस्तकं आणि बरंच काही आहे.
 
व्यायाम आणि पायी चालण्याची सुविधा
या कागदपत्रांनुसार, इम्रान खान यांच्या शारीरिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुरुंगात त्यांना व्यायामाची मशीनही देण्यात आली आहे.
 
यातील एका छायाचित्रात व्यायामाची सायकल दिसते तर दुसरीकडे स्ट्रेचिंग बेल्ट दिसतोय.
 
याशिवाय असाही दावा करण्यात आला आहे की, इम्रान खान यांना तुरुंगातील बॅरेकच्या विशेष कॉरिडॉरमध्ये दिवसातून दोनदा फिरण्याची परवानगी आहे.
 
इम्रान खान यांच्या तुरुंगातील भेटीगाठी
पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांना गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये इस्लामाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अटक तुरुंगातून अदियाला तुरुंगात हलवण्यात आलं होतं.
 
आज केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये, गेल्या वर्षी सप्टेंबर ते या वर्षी 30 मे पर्यंत, इम्रान खान यांना भेटण्यासाठी आलेल्या पाहुण्यांची महिना निहाय यादी देखील सादर केली आहे.
 
या यादीत इम्रान खान यांच्या बहिणी, वकील आणि पक्षाच्या नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.
 
अदियाला कारागृह कुठे आहे आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व काय आहे?
अदियाला कारागृह हे खरं तर रावळपिंडीतील मध्यवर्ती कारागृह आहे आणि त्याला अदियाला जेल असंही म्हणतात कारण रावळपिंडी जिल्ह्यातील अदियाला हे गाव तिथून चार किलोमीटर अंतरावर आहे. गावावरूनच हे नाव पडलं आहे.
 
हे कारागृह रावळपिंडी अदियाला रोडवरील जिल्हा न्यायालयापासून सुमारे 13 किमी अंतरावर देहगल गावाजवळ आहे आणि जुने जिल्हा कारागृह रावळपिंडीत आहे.
 
पाकिस्तानचे लष्करी हुकूमशहा जनरल मुहम्मद झिया-उल-हक यांच्या राजवटीत 1970 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 1980 च्या सुरुवातीस याचं बांधकाम झालं.
 
पूर्वी रावळपिंडीचे जिल्हा कारागृह आज जिना पार्क असलेल्या ठिकाणी होते आणि हे तेच कारागृह आहे ज्यात लष्करी हुकूमशहा जनरल झियाउल हक यांच्या राजवटीत देशाचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुत्तो यांना तुरुंगात टाकण्यात आलं आणि त्यांना फाशी देण्यात आली होती. या कारागृहाला लागूनच असलेल्या घाटावर त्यांना फाशी देण्यात आली.
 
झुल्फिकार अली भुट्टोच्या फाशीनंतरच्या काही वर्षांत, हे तुरुंग पाडण्यात आले आणि इथे एक उद्यान बांधण्यात आले आणि 1986 मध्ये तुरुंग अदियाला येथे हलविण्यात आले.
 
अदियाला तुरुंगाचं नाव पाकिस्तानच्या राजकारणात नेहमीच गाजत असतं. याच तुरुंगात देशातील तीन पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाचे राजकारणी यांना शिक्षा झाली. इम्रान खान हे चौथे पंतप्रधान आहेत ज्यांना या तुरुंगात राहावं लागलंय.
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना दोनदा या तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. 1999 मध्ये देशात झालेल्या लष्करी उठावानंतर त्यांना पहिल्यांदा काही काळ तुरुंगात ठेवण्यात आलं.जेव्हा त्यांना विमान कट प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं तेव्हा त्यांना अटक किल्ल्यातही कैदेत ठेवलं होतं.
 
नवाझ शरीफ पनामा प्रकरणात दोषी आढळल्यानंतर पुन्हा त्यांना अदियाला तुरुंगात ठेवण्यात आलं. नवाझ शरीफ यांना अदियाला कारागृहाव्यतिरिक्त लाहोरमधील कोट लखपत तुरुंगातही कैदेत ठेवण्यात आलं होतं.
 
यावेळी त्यांची मुलगी मरियम नवाज हिलाही अदियाला तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. माजी राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनीही आपल्या आयुष्यातील काही काळ अदियाला तुरुंगात घालवला आहे.
 
पीपल्स पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनीही सप्टेंबर 2004 ते 2006 या कालावधीत अदियाला तुरुंगात दीड वर्षांहून अधिक काळ घालवला आणि त्यांच्या वास्तव्यात त्यांनी एक पुस्तकही लिहिलं.
 
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनाही मुशर्रफ काळात अदियाला तुरुंगात कैद करण्यात आलं होतं. तर शाहिद खकान अब्बासी यांनाही काही काळ कैदेत ठेवलं होतं.
 
याशिवाय सध्याचे केंद्रीय मंत्री आणि मुस्लिम लीग-एनचे ज्येष्ठ नेते साद रफिक यांनाही मुशर्रफ काळात अदियाला तुरुंगात ठेवलं होतं. तर जावेद हाश्मी यांनाही काही महिने अदियाला तुरुंगात कैद करण्यात आलं होतं.
 
याशिवाय एनएबीचे माजी अध्यक्ष सैफुर रहमान, 8 नोव्हेंबरच्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड झकी-उर-रहमान लखवी आणि माजी गव्हर्नर सलमान तासीरचा मारेकरी मुमताज कादरी आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात प्रसिद्ध मॉडेल अयान अली यांनाही या तुरुंगात कैदेत ठेवलं होतं.
 
Published By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जे अखिलेश यादव यांना उत्तर प्रदेशात जमलं, ते तेजस्वी यादव यांना बिहारमध्ये का जमलं नाही?