जगभरात स्त्रिया आणि पुरुष यांच्या वेतनात कमालीची तफावत आढळते. मात्र 'आइसलँड' या देशानं स्त्री आणि पुरुषांना समान वेतन देणारा पहिला देश बनण्याचा बहुमान मिळवलाय. यापुढे या देशातील कोणत्याही कंपनीत काम करणाऱ्या स्त्री आणि पुरुषांना समान वेतन मिळणार आहे. त्यामुळे लिंग समानतेच्या बाबतीत 'आइसलँड' जगात अव्वल स्थानावर आहे.
आइसलँडमध्येही आजवर एक समान काम करण्यासाठी पुरुषांना महिलांहून सहा टक्के अधिक वेतन दिलं जातं होतं. परंतु, सरकारनं 'इक्वल पे स्टँडर्ड' नावानं एक नवीन गाईडलाईन जारी केलीय. या गाईडलाईन अंतर्गत कंपनीच्या प्रत्येक कामाचं मूल्यांकन केलं जाईल. त्यातून कोणतं काम किती महत्त्वाचं आहे, हे जाणून घेतलं जाईल. त्यानंतर प्रत्येक कामाला एक क्रमांक दिला जाईल. जर दोन व्यक्ती एकाच क्रमांक असलेलं काम करत असतील तर त्यांचं वेतनही समान असायला हवं. नव्या नियमानुसार, या दोन व्यक्तींचं वेतन मात्र समान नसेल तर कमी वेतन असलेल्या व्यक्तीचं वेतन वाढवलं जाणार आहे.