पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग दुसरा कार्यकाळ मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही त्यांचे अभिनंदन केले. निवडणुकीतील विजयाबद्दल मी मोदींचे अभिनंदन करतो. दक्षिण आशिया विभागातील शांतता आणि प्रगतीसाठी त्यांच्या समवेत कार्य करण्यास मी उत्सुक आहे, असे ट्विट खान यांनी केले.
जम्मू-काश्मीरच्या पुलवामात पाकिस्तानस्थित जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनेने फेब्रुवारीत भयंकर आत्मघाती हल्ला घडवला. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहचला. द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानने दहशतवादाचा पाठिंबा थांबवावा, अशी ठाम आणि रास्त भूमिका भारताने घेतली आहे. तर भारतातील निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर द्विपक्षीय संबंध सुधारतील, अशी आशा पाकिस्तानकडून काही दिवसांपासून व्यक्त केली जात आहे.